You are currently viewing संजीवन समाधी

संजीवन समाधी

नामदेवांसोबत तीर्थयात्रेचा पंढरपुरात समारोप केल्यावर त्यांना घेऊन ज्ञानेश्वर आळंदीत परत आले. आपल्या भावंडांची अनेक महिन्यांनंतर भेट घेतली. सगळ्यांच्या भावना भरून आल्या. त्या भावंडांनी जन्मापासुन आजवर सोबतच आयुष्य काढले होते. इतका विरह कधी झाला नव्हता. 

पुन्हा भेट झाल्यावर आळंदीत गेल्यावर काही काळ आनंदात गेला. पण काही दिवसांनी ज्ञानेश्वरांनी आपला संजीवन समाधी घेण्याचा विचार निवृत्तिनाथांजवळ बोलुन दाखवला. संजीवन समाधी म्हणजे स्वतःहुन मृत्यूचे स्वागत करून हे जग सोडुन देणे. 

सामान्य माणसाला मृत्यूची भीती असते. जगण्यावर फार लोभ असतो. अनेक अपुऱ्या इच्छा असतात. त्यामुळे मृत्यूची कल्पना आपल्याला करवत नाही. सिद्ध योग्यांना मात्र जगण्याचा अजिबात मोह नसतो आणि मरणाची भीती नसते. 

त्यांच्या समाधीचे कारण कुठली निराशा नसुन विरक्ती म्हणता येईल. आपलं आयुष्यातलं कार्य पुर्ण झालं असं वाटल्यावर मग यापुढे कशाला उगाच जगण्याच्या मोहात दिवस काढायचे? असा तो विचार होता. 

वयाच्या २१ व्या वर्षी ज्ञानेश्वरांनी हा निर्णय घेतला. सामान्य माणसाची हि सहसा आयुष्यात कर्तबगारी दाखवण्याची सुरुवात होती. ज्ञानेश्वरांनी या वयात आपलं जीवित कार्य संपवलं होतं. 

एका चाकोरीत अडकुन बसलेल्या धर्माला आणि समाजाला आव्हान दिलं होतं. पंडितांच्या पोथ्यांमध्ये कैद झालेलं गीतेचं अध्यात्मिक ज्ञान सामान्यांसाठी ज्ञानेश्वरी लिहुन मराठीतुन मोकळं केलं होतं. त्यानंतर अमृतानुभव हाही ग्रंथ लिहिला. अभंग लिहिले. हरिपाठ लिहिला. 

लोकांना सर्व लोकांचा देवावर अधिकार आहे हे सांगुन भक्तीचं महत्व पटवुन दिलं होतं. ठिकठिकाणी फिरून लोकांना सन्मार्ग दाखवला. 

त्यांची स्वतःसाठी कोणती इच्छा नव्हती. त्यांनी लिहिलेल्या पसायदानात त्यांनी देवाला सगळ्यांचे भले व्हावे ज्याला जे हवे ते मिळावे अशी प्रार्थना केली आहे. अशी निस्वार्थ प्रार्थना एखादी आई आपल्या मुलांसाठी करते तशी त्यांनी सर्व जगासाठी केली. त्यामुळे त्यांना ज्ञानेश्वर माउली म्हणतात. 

त्यांची इच्छा असली तरी आपले गुरु आणि मोठे भाऊ निवृत्तीनाथ यांच्या परवानगीशिवाय त्यांनी ते पाऊल उचलले नसते. निवृत्तीनाथ आपल्या भावाला चांगले ओळखत होते. त्यांच्या मनातली तीव्र इच्छा, त्याचं कारण आणि निर्धार त्यांना समजला होता. त्यामुळे त्यांनी जड मनाने त्यांना परवानगी दिली. 

त्यांच्या ह्या निर्णयाने त्यांच्या भावंडांना, त्यांच्या अनुयायांना, भक्तांना साहजिकपणे फार दुःख झालं. समाधीचा दिवस ठरला कार्तिक वद्य त्रयोदशी. आळंदीत ज्ञानेश्वरांचे शेवटचे दर्शन घ्यायला लोकांची रीघ लागली. दर्शन घेऊनही तिथुन लोकांचा पाय निघत नव्हता. 

समाधीचा दिवस उजाडला. ज्ञानेश्वरांनी इंद्रायणीत स्नान केले. लोकांनी मोठ्या श्रद्धेने त्यांची पूजा केली. लहानपणापासुन आळंदीत अपमान सहन केलेल्या ज्ञानेश्वरांना निरोप देण्याची वेळ आली तोपर्यंत चित्र पार पालटलेलं होतं. आळंदीसोबतच इतर अनेक ठिकाणाहुन आलेले भक्त साश्रु नयनांनी ज्ञानेश्वर माउलींना शेवटचा नमस्कार करत होते. 

ज्ञानेश्वर अतिशय शांत होते. आपल्या निर्णयावर स्थिर होते. सगळ्यांना नमस्कार करत, आपल्या भावंडांना आलिंगन देऊन झाल्यावर ज्ञानेश्वर समाधीच्या ठिकाणी निघाले. सिद्धेश्वर मंदिरातली हि जागा लोकांनी देवाच्या गाभाऱ्यासारखीच सजवली होती. फुला पानांच्या माळा, समया, उदबत्त्या, यांनी सुशोभित आणि सुगंधित झाली होती. 

ज्ञानेश्वर तिथे जाऊन बसले. ध्यान लावले. निवृत्तीनाथांनी मनावर ताबा ठेवत समाधीचा शेवटचा दगड लावला. एका दिव्य पर्वाची अखेर झाली. 

ज्ञानेश्वरांच्या समाधीनंतर त्यांची भावंडे फार व्यथित झाली. आता त्यांचा लाडका भाऊ त्यांना कधीच भेटणार नव्हता. त्यांचं या जगात अजिबात मन रमत नव्हतं. काही दिवसांनी सोपानदेवांनी एक महिन्यांनीच मार्गशिर्ष वद्य त्रयोदशीला पुण्याजवळ सासवडला समाधी घेतली. 

निवृत्तीनाथ आणि मुक्ताबाई आता दोन भावांना गमावुन फार उदास झाले. आपल्या भक्तांसोबत त्यांनी काही काळ प्रवास केला आणि आपलाही अवतार संपवला. 

महतनगर या उत्तर महाराष्ट्रातल्या गावात मुक्ताबाई एक प्रचंड विजेचा लोळ पडला आणि त्यात त्या लुप्त झाल्या. लोक त्यांना ज्या आदिमायेचा अवतार समजायचे त्याला साजेशीच त्यांची अवतारसमाप्तीची घटना घडली. हा दिवस वैशाख शुद्ध दशमीचा होता. आज या गावाचे नाव मुक्ताईनगर ठेवण्यात आले आहे. 

निवृत्तीनाथांनी त्र्यंबकेश्वरात समाधी घेतली. ह्याच त्र्यंबकेश्वराजवळ एका गुहेत त्यांना त्यांचे गुरु गहिनीनाथ भेटले आणि त्यांचा अध्यात्मिक प्रवास सुरु झाला. तो प्रवास त्यांनी तिथेच ज्येष्ठ शुद्ध द्वादशीला संपवला. 

ह्या भावंडांमुळे आयुष्याला कलाटणी मिळालेले चांगदेव यांनीसुद्धा पुणतांबे येथे समाधी घेतली. 

या चारही भावंडांपैकी आज सर्वाधिक लिखाण ज्ञानेश्वरांचे उपलब्ध आहे. गीतेवर मराठीत लिहिलेली ज्ञानेश्वरी हि मराठी साहित्यातला, संत साहित्यातला मैलाचा दगड ठरली असल्यामुळे ती काळाच्या ओघात टिकुन राहिली. बाकी भावंडांनीही काही ग्रंथ लिहिले असल्याचे उल्लेख असले तरी ते आज उपलब्ध नाहीत. त्या सर्वांनी लिहिलेले अभंग मात्र उपलब्ध आहेत. 

लिखाण उपलब्ध नसले तरीही या चारही भावंडांचा हिंदु आणि विशेषतः मराठी समाजावरचा प्रभाव असामान्य आहे. करोडो लोक त्यांचे आज भक्त आहेत. 

ज्ञानेश्वरांच्या आळंदीतून ते विठोबाच्या पंढरपूरपर्यंत दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने वारी निघते. लाखो लोक ह्या वारीत सहभागी होतात. वाटेत ज्ञानेश्वरांची पालखी सासवडला आपल्या भावाच्या सोपानदेवांच्या समाधीला भेट देते. 

ज्ञानेश्वरांना जसे लोक माउली म्हणायचे तसेच ह्या सोहळ्यात सर्व एकमेकांना वय, लिंग, जात, पद असा कुठलाही भेद न ठेवता माउली याच नावाने हाक मारतात. सारखा मान आणि आदर देतात. ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या रूपात जे सर्वांमध्ये समान ईश्वर आहे हा जो संदेश दिला होता त्याचंच हे प्रतीक आहे. 

संतांच्या परंपरेत ज्ञानेश्वरांच्या पिढीला पाया आणि तुकारामांच्या पिढीला कळस मानतात. त्यामुळे “ग्यानबा तुकाराम” हे कीर्तन भजनात अनेकदा म्हटलं जातं. वारीत विठोबा रखुमाई सोबतच ह्या संतांच्या नावाने सुद्धा अनेक घोषणा आणि भजने म्हटले जातात. 

चालीत म्हणण्याच्या सोयीसाठी “ग्यानबा तुकाराम” सारखं संक्षिप्त स्वरूपात म्हटलं जात असलं तरी त्यात ज्ञानेश्वर ते तुकाराम ह्या माळेतल्या सर्वच संतांप्रती आदर अभिप्रेत असतो. त्यातल्याच काही ओळींनी ह्या चार महान संत भावंडांच्या गोष्टींचा शेवट करतो. 

जय विठोबा रखुमाई
जय विठोबा रखुमाई
जय विठोबा रखुमाई
जय विठोबा रखुमाई

तुकाराम तुकाराम 
तुकाराम तुकाराम
ग्यानबा माउली तुकाराम
ग्यानबा माउली तुकाराम

निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई 
एकनाथ नामदेव तुकाराम
निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई 
एकनाथ नामदेव तुकाराम

पुंडलिक वरदे हरी विठ्ठल 
श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ महाराज कि जय

लेखक: आकाश खोत

व्यवसाय एक (संगणक अभियंता) 
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )

माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा! 

वैयक्तिक ब्लॉगskyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल:  Thats My Take

This Post Has One Comment

  1. Omkar koli

    Khupch Sundar mahiti

प्रतिक्रिया व्यक्त करा