स्वराज्याचे दुसरे छत्रपती, शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ सुपुत्र संभाजी महाराज हे अत्यंत पराक्रमी, साहसी आणि तितकेच दुर्दैवी राजे होते.
त्यांचा जन्म १४-मे-१६५७ रोजी पुरंदर किल्ल्यावर शिवाजी महाराज आणि त्यांच्या पहिल्या राणी सईबाई यांच्या पोटी झाला. ते लहान असतानाच त्यांच्या मातोश्री आजारपणातुन देवाघरी गेल्या. शिवाजी महाराजांप्रमाणेच त्यांनाही मांसाहेब जिजाबाईंनी वाढवले.
ते लहान असताना शिवाजी महाराज सतत विविध मोहिमांमध्ये गुंतलेले असायचे. स्वराज्यावर जेव्हा मोगलांनी मिर्झा राजा जयसिंग यांना प्रचंड सैन्य देऊन पाठवले, तेव्हा शिवाजी महाराजांना नाईलाजाने तह करावा लागला. त्यांना तहानुसार संभाजी राजांना घेऊन आग्र्याला बादशहा औरंगजेबाच्या भेटीला जावे लागले.
तिथे झालेला अपमान शिवाजी महाराजांना सहन झाला नाही आणि त्यांनी सभेत राग व्यक्त करून सभेतुन निघुन गेले. त्यांना आणि संभाजी राजांना नजरकैदेत ठेवण्यात आले. औरंगजेबाचा त्यांना मारून टाकण्याचा इरादा होता. ते लक्षात घेऊन शिवाजी महाराजांनी चतुराईने स्वतःला व लहान संभाजीराजांना मिठाईच्या पेटाऱ्यात लपवुन सुटका करून घेतली.
तिथुन परत येताना मात्र त्या दोघांनी एकत्र परत येण्यात धोका होता. मोगल सैनिक मराठा बाप बेट्यांच्या शोधात उत्तर भारतातल्या सर्व शहरे आणि चौक्यांवर पहारा देत होते. शिवाजी महाराजांनी कोवळ्या वयातल्या संभाजी राजांना एका हितचिंतकांच्या घरी मथुरेत ठेवले आणि स्वतः वेष बदलत अनेक टप्पे खात स्वराज्यात एकटेच परतले.
संभाजी राजांच्या जीवाला धोका होऊ नये म्हणुन ते उत्तरेतच मरण पावल्याची बातमी पसरवण्यात आली. काही महिन्यांनी जेव्हा परिस्थिती निवळली तेव्हाच संभाजी राजांना स्वराज्यात परतत आले. इतक्या अवघड परिस्थितीत संभाजी राजे मोठ्या धीराने राहिले.
मोठे होत असताना संभाजी राजांनी सर्व शस्त्रांचे आणि शास्त्रांचे शिक्षण घेतले. त्यांना मराठी, संस्कृत, हिंदी, फारशी इत्यादी भाषा अवगत होत्या. त्यांनी बुधभूषणम, नखशिखा, नायिकाभेद असे ग्रंथ लिहिले. असे राजे फार दुर्मिळ असतात.
संभाजी राजांचे लग्न पिलाजीराव शिर्के यांची सुकन्या जिवुबाई यांच्याशी झाले होते. लग्नानंतर त्यांचे नाव येसूबाई असे ठेवले गेले. येसूबाईंनी संभाजीराजांना प्रत्येक प्रसंगात साथ केली. स्वतः शिवाजी महाराजांनी त्यांना कुलमुखत्यार हे पद दिले होते. पुढे स्वतः छत्रपती झाल्यावर त्यांनी येसूबाईंना आपल्या राज्यकारभारात महत्वाचे स्थान दिले होते. त्यांना राजाज्ञेवर वापरण्यासाठी “श्री सखी राज्ञी जयती” असा शिक्का बनवुन दिला होता.
तरुणपणी त्यांचे आणि मंत्रीमंडळातील काही लोकांचे वाद होत असत. ह्या वादांमुळे गैरसमज होत असत त्यांच्याविषयीचे मत खराब होत असे. ह्यातुनच शिवाजी महाराजांनी त्यांना काही दिवस पन्हाळ्यावर रोखुन ठेवले होते.
काही दिवस संभाजी राजे मोगलांना जाऊन मिळाले होते. याबद्दल वेगवेगळे मतप्रवाह आहेत. ते शिवाजी महाराजांशी होत असलेल्या गैरसमजाला वैतागुन गेले असावेत, किंवा स्वतःची कुवत सिद्ध करायला गेले असावेत, किंवा शिवाजी महाराजांनीच त्यांना गुप्त रित्या मोगलांच्या साम्राज्याचे आतमधुन नुकसान करायला पाठवले असावे अशा अनेक शक्यता लोक बोलुन दाखवतात.
ते कशामुळेही गेले असले तरी त्यापेक्षा ते परत आले आणि त्यानंतर त्यांनी मराठी साम्राज्यासाठी जो भीम पराक्रम गाजवला तो जास्त महत्वाचा आहे. त्यापुढे मोगल साम्राज्यातले एक वर्ष हे एका महान पर्वातले एक छोटेसे प्रकरण आहे.
ते स्वराज्यात परत आल्यावर काही दिवसांनी शिवाजी महाराजांचे निधन झाले. हा काळ स्वराज्यासाठी फार कठीण होता. औरंगजेब दक्षिणेकडे वळत होता. एक प्रचंड मोठे संकट येऊ घातले होते आणि त्यात स्वराज्यात दुफळी माजली होती.
संभाजी राजांशी पटत नसणाऱ्या मंत्री आणि सरदारांनी राजांची दुसरी राणी सोयराबाई आणि त्यांचे मुलगे राजाराम म्हणजेच संभाजी राजांचे धाकटे बंधु यांना आपल्या बाजूला करून त्यांना सिंहासनावर बसवले, आणि संभाजी राजांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला. राजाराम फक्त दहा वर्षांचे होते.
संभाजी राजांनी या बंडाचा बंदोबस्त करत राज्य कारभार आपल्या हातात घेतला. ते स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले.
त्यापुढचा ९ वर्षांचा काळ हा फार खडतर होता. अस्मानी म्हणजे दुष्काळ आणि सुलतानी म्हणजे मोगल, पोर्तुगीज, सिद्दी, आदिलशाही अशा अनेक शत्रूंना त्यांना तोंड द्यावे लागले. पण ते कुठेही कमी पडले नाहीत.
बादशाह औरंगजेब स्वतः दिल्ली सोडुन प्रचंड फौजा घेऊन दक्षिणेत आला. त्याने अनेक सरदारांना मोठमोठ्या सैनिकी तुकड्या देऊन स्वराज्यावर पाठवले. मराठे संभाजी महाराजांच्या आणि सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या नेतृत्वाखाली शौर्याने लढले. एक एक किल्ला महिनोन महिने लढवला. शिवाजी महाराजांनी सिद्ध केलेला गनिमी काव्याचा उपाय त्यांनी खुबीने वापरात मोगलांना सळो कि पळो करून सोडले.
सततच्या अपयशाने कंटाळुन औरंगजेबाने तात्पुरता आदिलशाही आणि कुतुबशाहीकडे लक्ष वळवले. त्यांना मोगलांनी संपवले पण स्वराज्याला संपवु शकले नाहीत.
सोबतच संभाजी राजे जंजिऱ्याचे सिद्दी, गोव्याचे पोर्तुगीज यांच्याशीही लढत होते. त्यांना संपवण्याच्या निर्णायक क्षणी पोहचत असतानाच त्यांचे दुर्दैव आड आले. दोन्ही वेळेस दुसऱ्या शत्रूने मागुन वेगळ्याच आघाडीवर हल्ला केल्याने त्यांना परतावे लागले.
सततची लढाई, दुष्काळ यामुळे मराठा स्वराज्यावर खुप मोठा ताण पडला होता. त्यात हंबीरराव मोहित्यांचा मृत्यू झाल्यामुळे फार मोठे नुकसान झाले.
संभाजी महाराज आणि त्यांचे मित्र कवि कलश हे दोघे फितुरीमुळे मोगलांच्या तावडीत सापडले. त्या दोघांना मोगलांच्या बहादूरगड येथे नेऊन त्यांची धिंड काढुन त्यांना औरंगजेबासमोर हजर करण्यात आले. औरंगजेबाने त्यांना धर्म बदलुन इस्लाम स्वीकारण्यास आणि स्वराज्य मोगल साम्राज्यात विलीन करण्यास सांगितले.
संभाजी महाराजांनी त्याला नकार दिला. त्यामुळे औरंगजेबाने त्यांना हाल हाल करून मारण्याचे आदेश दिले.
प्रश्न फक्त धर्म बदलण्याचा नव्हता. औरंगजेब आणि संभाजी महाराज दोघेही हे ओळखुन होते कि जर त्या कैदेत संभाजी महाराज छळामुळे कमजोर पडले असते आणि औरंगजेबाच्या मागण्यांना कबुल झाले असते तर स्वराज्यातल्या मराठी लोकांचे धैर्य खचले असते. शिवाजी महाराजांच्या कालापासून आतापर्यंत असंख्य बलिदाने वाया गेली असती.
त्यामुळेच संभाजी महाराज बधले नाहीत. अत्यंत राक्षसी आणि वेदनादायक छळ सोसुनही त्यांनी हार मानली नाही. शेवटच्या क्षणापर्यन्त स्वाभिमान सोडला नाही. आपल्या वडिलांच्या रक्ताला, नावाला, संस्कारांना जागले.
११-मार्च-१६८९ रोजी पुण्याजवळ तुळापुर-वढू येथे संभाजी महाराज आणि कवि कलश यांना क्रूरपणे मारण्यात आले.
औरंगजेबाला वाटले होते कि मराठ्यांच्या छत्रपतीला असे मारल्यावर मराठे जेरीस येतील आणि स्वराज्य काबीज होईल. पण उलटे झाले. मराठे संभाजी महाराजांच्या मृत्यूमुळे अजुन पेटले.
संभाजी महाराजांची पत्नी येसूबाई यांनी राजाराम राजे आणि ताराराणींना सुरक्षित स्थळी पाठवुन स्वतः रायगडावर राहिल्या. मोगलांच्या हल्ल्यात त्या आणि महाराजांचे अल्पवयीन पुत्र शाहु राजे पकडले गेले. पुढे अनेक वर्षे त्यांना कैदेत काढावी लागली.
संभाजी महाराजांनंतर त्यांचे धाकटे बंधु राजाराम महाराज, नंतर राजारामांच्या पत्नी राणी ताराबाई यांनी स्वराज्य जिवंत ठेवले. संपु दिले नाही.
स्वराज्याला संपवायला निघालेला औरंगजेब त्याच्या आयुष्यातली शेवटची २७ वर्षे दक्षिणेतच अडकला, त्याला पुन्हा आग्र्याला जाताच आले नाही. तो स्वतः दक्षिणेतच संपला, पण स्वराज्य तरीही जिवंत राहिले आणि नंतर अजुन बहरले. संभाजी महाराजांसारख्या महापुरुषाच्या बलिदानाची हीच किंमत असते.
लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take
लिखाण छान आहे.. शब्द जपून आणि व्यवस्थित वापरले आहेत..
आवडले, खूप छान
धन्यवाद 🙂
वाचत रहा आणि प्रतिक्रिया, सूचना कळवत रहा.
खूप छान लिहिलंय