ख्रिस्ती धर्मात पोप, बुद्धांमध्ये दलाई लामा यांचे जसे धर्मगुरू म्हणुन स्थान आहे तसेच हिंदु धर्मात शंकराचार्यांचे स्थान आहेत. भारताच्या चारही दिशांना जी धर्मपीठे आहेत त्यांच्या प्रमुखांना शंकराचार्य हि उपाधी मिळते कारण या पीठांची स्थापना करणारे आद्यगुरू म्हणजे आदि शंकराचार्य.
आदि शंकराचार्य हे आठव्या शतकात होऊन गेलेले महान हिंदु धर्माचे तत्वज्ञ होते. ते अत्यंत अल्पायुषी होते तरीही त्यांनी तेव्हढ्याशा आयुष्यात प्रभावी कार्य केले.
असे म्हणतात कि त्यांच्या आई वडिलांना अनेक वर्षे मुल होत नव्हते. ते अतिशय पुण्यवान होते आणि देवाची सतत साधना करत. एकदा त्यांना देवाने त्यांना सांगितले मी तुम्हाला संततीचा वर देतो, पण मी तुम्हाला एक मुलगा असा देऊ शकतो जो अल्पायुषी असेल परंतु अत्यंत विद्वान असेल, धर्मात निपुण असेल आणि जो विख्यात होईल, अजरामर होईल, किंवा अनेक मुले देईन जी दीर्घायुषी असतील, परंतु बुद्धीने कमजोर असतील.
त्यांनी अर्थात एक विद्वान मुलगा जो विख्यात होईल पण अल्पायुषी असेल असाच निवडला आणि त्यांच्या पोटी आद्य शंकराचार्य जन्माला आले.
त्यांना लहानपणापासून अध्यात्माचे आकर्षण होते. ते लहान असताना त्यांचे वडील गेले आणि आईनेच त्यांना सांभाळले. आईचा त्यांच्यावर खुप जीव होता. तिने आपल्या एकुलत्या एक मुलाने संन्यास घेऊन घर सोडुन जाऊ नये म्हणुन बरेच प्रयत्न केले, पण मुलाने शेवटी आईचे मन वळवले.
संन्यास घेऊन त्यांनी वेद, उपनिषद यांचा सखोल अभ्यास केला, त्यावर भाष्य केले. उपनिषदात मांडलेले अद्वैत तत्वज्ञान त्यांनी आपलेसे केले आणि त्याचा प्रसार करायला भारतभर भ्रमण केले. तेव्हा भारतात, हिंदु धर्मात मरगळ आलेली होती, कर्मकांडाचे महत्व वाढले होते. वेदांच्या तत्वज्ञानाकडे दुर्लक्ष झाले होते.
शंकराचार्यांनी भारतभर अनेक विद्वानांशी चर्चा, वादविवाद करून आपले तत्वज्ञान पसरवले. भारताच्या चारही दिशांना प्रत्येक वेदासाठी एक अशी चार पीठे निर्माण करून तिथे आपले शिष्य नेमले. या पिठांमध्ये त्यांच्या तत्वज्ञानाची परंपरा आजवर चालत आली आहे.
असे म्हणतात कि शंकराचार्यांमुळेच भारतात हिंदु धर्माचे पुनरुज्जीवन झाले. समग्र भारतात फिरून आपले तत्वज्ञान शिकवल्यावर वयाच्या अवघ्या तेहतिसाव्या वर्षी त्यांनी केदारनाथ येथे जगाचा निरोप घेतला. तिथेच आजही त्यांची समाधी आहे.

लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take