You are currently viewing गीतारहस्य

गीतारहस्य

टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात असताना गीतारहस्य लिहिलं हि गोष्ट सर्वांनाच माहित आहे. आज जाणुन घेऊ हे गीता रहस्य त्यांनी का लिहिलं. 

टिळकांचे वडील विद्वान पंडित होते. स्वतः टिळकांचा संस्कृत आणि धर्मग्रंथाचा फार गाढा अभ्यास होता. त्यांच्यावर महाभारत आणि भगवदगीता यांचा फार प्रभाव होता. ग्रंथांचा अभ्यास करणं, त्यावर विचार करून तर्क मांडणं याची त्यांना आवड होती.

टिळकांच्या वेळेस जर इंग्रजांचं राज्य नसतं आणि जर स्वराज्यासाठी लढण्याची एवढी निकड नसती तर कदाचित ते एक शिक्षण, अभ्यास, लेखन यात रमलेले चिंतक झाले असते. गणितातही त्यांना फार प्रगती करणे शक्य होते. आयुष्यभर राजकारण करूनही त्यांनी अनेक विषयांचा अभ्यास केला होता. धर्मग्रंथ, गणित, ज्योतिषशास्त्र, अर्थशास्त्र, कायदेशास्त्र हे सगळे त्यांच्या अभ्यासाचे विषय होते. 

त्यांनी लावलेल्या अर्थाच्या आधारे त्यांनी वेदिक संस्कृती आणि आर्य लोक हे मुळचे उत्तर ध्रुवावरच्या प्रदेशातुन इतरत्र पसरले असावेत असा सिद्धांत मांडणारा “दि आर्क्टिक होम इन दि वेदाज” असा ग्रंथ लिहिला. वेदांमधल्या श्लोकातले वर्णन, ज्योतिषशात्राच्या आधारे नक्षत्रांचे गणित मांडून वेदांच्या निर्मितीच्या कालखंडाबाबाबत विवेचन करणारा “ओरायन” हा ग्रंथ लिहिला. 

गणितात त्यांनी पदवी घेतली होती, आणि ते त्यांनी स्थापन केलेल्या शाळा कॉलेजांमध्ये गणित शिकवतही होते. सहकाऱ्यांशी मतभेद झाल्यावर त्यांनी चरितार्थ चालवण्यासाठी लॉ क्लासेस सुरु केले होते. अनेक भावी वकील त्यांच्याकडे शिकले. 

गीतेवरचा ग्रंथ त्यांनी अचानक तुरुंगात फावल्या वेळात करायचा उद्योग म्हणुन लिहिला नव्हता. असा ग्रंथ लिहिण्याचं त्यांच्या अनेक वर्षांपासुन मनात होतं. राजकारणामुळे त्यांना वेळ मिळत नव्हता. तो सलग वेळ त्यांना तुरुंगात मिळाला आणि त्यांनी तो सत्कारणी लावला. 

महाभारत आणि गीता यांचा टिळकांवर फार प्रभाव होता. आपल्या भाषण आणि लेखांमध्ये ते अनेकदा यातली वचने वापरत असत. गीतेचा जो अर्थ त्यांनी लावला तेच त्यांचं तत्वज्ञान होतं आणि आयुष्यभर ते ह्याच तत्वानुसार जगले. त्यांना तेच कागदावर मांडायचं होतं. 

गीतेमधल्या सर्वात प्रसिद्ध श्लोकांपैकी एक असलेला म्हणजे “कर्मण्येवाधिकारस्ते मां फलेषु कदाचन”. फळ काय मिळेल याची चिंता न करता कर्म करीत रहा असा याचा रूढ अर्थ आहे. गीतेवर अनेकांनी आपलं भाष्य केलं आहे, त्या आधारे तत्वज्ञान मांडलं आहे. 

कालांतराने या श्लोकाचा आणि एकंदर गीतेचा एक निष्क्रिय आणि काहीसा नकारात्मक सुर असलेला अर्थ प्रचलित झाला होता. फळाची अपेक्षाच करू नये, फक्त देवाला शरण जावे, भक्ती सोडुन काहीच करू नये, निरपेक्ष काम करत रहावे असा थोडा विरक्ती असलेला अर्थ लोकांमध्ये पसरला होता. 

उलट गीता हि कर्मप्रधान आहे. कृष्णाने अर्जुनाला युद्ध सोडुन माझी भक्ती कर असे सांगण्यासाठी गीता सांगितली नव्हती. त्याने अर्जुनाला युद्धाला म्हणजे त्याचं कर्तव्य असलेलं कर्म करण्यासाठी प्रवृत्त करायला लिहिली होती आणि कृष्णाची सर्व वचने हि त्याच दिशेने होती याचा विसर पडला होता. 

कृष्णाने ईश्वरप्राप्तीचे भक्ती आणि कर्म हे दोन्ही मार्ग सांगितले. ईश्वराचे स्मरण ठेवुन, त्याच्याप्रती आदरभाव ठेवुन, आजुबाजुला जे काही ते त्यानेच निर्माण केलं आहे, जे काही चाललंय ते त्याच्या मर्जीने चाललं आहे, मी केवळ निमित्तमात्र आहे आणि मला फक्त माझं कर्तव्य करायचं आहे ह्या भावनेने कर्म करत राहिलं तरीही ईश्वरप्राप्ती होईल. कर्माचं जे काही फळ, गुण, दोष असतील ते त्याला अर्पण करून मोकळं व्हायचं आणि पुढच्या कर्माला लागायचं. 

अर्जुनाला आपल्या स्वकीयांची युद्ध कशाला करायचं, काय मिळणार आहे, स्वकीयांना मारून मिळालेलं राज्य काय करायचं असे प्रश्न पडले होते आणि तो शस्त्रे टाकुन बसला होता. कृष्णाने त्याला आता या क्षणी युद्ध करणं हेच तुझं कर्तव्य आहे, ते सोडणं हेच अयोग्य आहे असं समजावलं होतं. 

कृष्णाचा अर्थ असा नव्हता कि फळाची अपेक्षाच करू नये. कुठलंही कार्य आपण सुरु करतो तेव्हा त्या कार्याचा काही तरी उद्देश, लक्ष्य असतंच. त्या उद्देशानेच कार्याची सुरूवात होत असते. कोणी एखादं दुकान उघडलं तर वस्तु विकुन पैसे कमावणे हा उद्देश असतो. त्या दृष्टीने विचार आणि तयारी न करता दुकान कोणीही टाकत नसतं. 

कृष्णाचा अर्थ असा होता कि माणसाच्या हातात कर्म करणं आहे, त्याचं फळ त्याच्या हातात नाही एवढंच. दुकान टाकुन ते चालेलच असं नाही, त्यामध्ये अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे दुकान चांगलं चालेल किंवा चालणार नाही. त्यातली प्रत्येक गोष्ट आपल्या हातात नाही. आपलं काम हे आहे कि जे आपल्या हातात आहे त्या सर्वांची काळजी घेणं, त्यासाठी मेहनत करणं. 

त्यापलीकडच्या गोष्टी आपल्या हातात नाही त्यामुळे शेवटी जे फळ मिळणार ते पूर्णपणे आपल्या नियंत्रणात नाही. पण त्याची खात्री नाही त्यामुळे कर्मच करू नये असे नाही. कधी फळ मिळेल कधी मिळणार नाही. त्याविषयी फार आनंद किंवा फार दुःख करत बसण्यापेक्षा पुढच्या कार्याकडे वळावे. 

टिळकांना ह्या प्रकारचा संदेश देऊन लोकांना कार्यास प्रवृत्त करायचे होते, त्यांच्यातली उदासीनता, निरुत्साह घालवुन त्यांच्यात स्वाभिमान आणि उत्साह जागवायचा होता. 

त्यांच्या काळात एक तर विरक्तीच्या विचाराने कुठल्याही गोष्टीत रस न घेणारे लोक किंवा ब्रिटिशांच्या प्रभावामुळे भारतीय इतिहास, तत्वज्ञान, अध्यात्म सगळेच टाकाऊ वाटणाऱ्या लोकांची संख्या बरीच होती. ब्रिटिशांनी तयार केलेल्या शिक्षण पद्धतीत भारतीय लोकांमध्ये एक न्यूनगंड हमखास तयार होत होता. तो दूर करणे गरजेचे होते. 

ह्या विषयावर टिळकांनी तुरुंगात जाण्याच्या काही वर्षे आधीपासुन तयारी सुरु केली होती. काही भाषणांमध्ये आपल्या मनात असे घोळत आहे हे बोलुन दाखवले होते. त्याचा आराखडा त्यांनी श्रीपतीबुवा भिंगारकर यांच्याशी चर्चा करून तयार करून ठेवला होता. 

ब्रिटिश सरकार भारतीय नेत्यांना, स्वातंत्र्यसैनिकांना मुद्दाम फार दूरच्या तुरुंगात नेऊन टाकत असे. त्यांचा इतरांशी संपर्क होऊ नये. ते एकटे पडावेत. त्यांना कोणाचाही आधार मिळु नये. आणि त्यांच्या अनुयायांना सुद्धा कसले मार्गदर्शन मिळु नये, त्यांना दिशाहीन वाटावे म्हणुन ते असे सगळ्यांचेच मनोधैर्य खचावे यासाठी असले प्रकार करत. 

टिळकांना मंडालेला पाठवण्याचा हाच उद्देश होता. पण खचतात ते टिळक कसले. तिथल्या तुरुंगात त्यांनी आपला अभ्यास चालु ठेवुन गीतारहस्याचे काम पूर्ण केले. ज्या स्थितप्रज्ञतेची, मनोधैर्याची शिकवण गीता देते त्यावर ग्रंथ लिहिणाऱ्या टिळकांनी स्वतः हे जगुन दाखवले. 

ते तुरुंगात गेले तेव्हा त्यांच्या बायकोची तब्येत म्हणावी तशी ठीक नव्हती. मुलांची शिक्षणे चालु होती. तुरुंगातुन ते जी पत्रे लिहीत असत त्यात त्यांच्या प्रकृतीची, मुलांच्या शिक्षणाची त्यांच्या प्रगतीची चौकशी असे. आणि दर वेळी नव्या पुस्तकांची यादी असे. ते आपली पुस्तके कोणालाही देऊ नका असे बजावत असत. टिळक एरवी दुसऱ्यांसाठी जीव देतील पण आपली पुस्तके कोणाला देणार नाहीत, उलट त्यासाठी जीव घेतील असे लोक गमतीने म्हणायचे. 

गीतेमध्ये त्यांनी संत ज्ञानेश्वर, तुकाराम, पाश्चात्य तत्वज्ञान आणि तिकडच्या तत्वज्ञांचे विचार या सर्वांचा संदर्भ घेतलेला आहे. वयाच्या पन्नाशी नंतर त्यांनी केवळ पुस्तके वाचुन फ्रेंच आणि जर्मन भाषा पुस्तके समजतील इतपर शिकली. मग हळू हळू या परदेशी भाषांमधल्या ग्रंथांचेही वाचन केले. 

ते तुरुंगात असतानाच त्यांच्या पत्नीचे निधन झाले. त्यांना हि बातमी कळली तेव्हा तेही हादरून गेले. पण तरीही त्यांनी स्वतःला सावरलं आणि मुलांना दुःखात फार वेळ न घालवता त्यातून बाहेर या आणि स्वावलंबी व्हा असा संदेश पाठवला. हे गीतेच्या शिकवणीनुसारच होते. 

या व्यतिरिक्त त्यांना गणित, अर्थशास्त्र आणि धर्माचा इतिहास यावरही ग्रंथ लिहायचे होते. राजकारणात आणि भारतभर प्रवासात व्यस्त असल्यामुळे हे शक्य झाले नाही. 

गीतारहस्य तुरुंगात लिहुन पूर्ण झाले असले तरी त्याचे प्रकाशन व्हायला त्यांना शिक्षा पुर्ण होईपर्यंत थांबावे लागले. तुरुंगातून निघताना त्यांना हस्तलिखित आधी सरकारी अधिकाऱ्यांकडे सोपवावे लागले. त्यांच्यावर चिथावणीखोर लेखनाचाच मुख्य आरोप असल्यामुळे अधिकाऱ्यांनी गीतारहस्याचा बारकाईने अभ्यास केला. शेवटी तो एक धार्मिक विषयावरचा ग्रंथ असल्यामुळे त्यातही प्रबोधनाची शक्यता असुनही त्यांना तो अडवता आला नाही. 

टिळक पुण्यात पोहोचल्यावर तो प्रकाशित झाला. टिळकांनी पहिल्या काही प्रति पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपती, पंढरपूरचा पांडुरंग आणि त्यांना गुरुस्थानी असलेल्या अण्णासाहेब पटवर्धन यांना अर्पण केल्या. पहिली आवृत्ती लगेच संपली. काही जणांनी तो ग्रंथ देव्हाऱ्यात ठेवला. 

असं म्हणतात मन शांत असेल, स्थिर असेल तर पण चांगला विचार करू शकतो, मांडु शकतो. आपल्या प्रिय लोकांपासुन दूर तुरुंगात टिळकांनी मनाची स्थिरता मिळवुन असा ग्रंथ लिहिला हे असामान्य आहे. त्यांनी हा ग्रंथ लिहुन इतिहास घडवला. 

लेखक: आकाश खोत

व्यवसाय एक (संगणक अभियंता) 
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )

माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा! 

वैयक्तिक ब्लॉगskyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल:  Thats My Take

प्रतिक्रिया व्यक्त करा