दरवर्षी २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन / गणराज्य दिन म्हणुन साजरा होतो. या दिवशी राष्ट्रीय सुट्टी असते.
१५ ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन, २६ जानेवारी हा प्रजासत्ताक दिन, दोन्ही दिवशी झेंडावंदन केले जाते. असे दोन दिवस का, असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो.
१५ ऑगस्ट १९४७ ला भारताला ब्रिटिशांपासुन स्वातंत्र्य मिळाले. पंडित जवाहरलाल नेहरू स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान बनले.
हे सरकार ज्या नियम आणि कायद्यानुसार चालत होते, ती अंतरिम व्यवस्था होती. ब्रिटिशांनी भारतावर राज्य करताना वेगवेगळे नियम बनवले, प्रशासन सोपे व्हावे म्हणुन अनेक खाती आणि संस्था बनवल्या ज्यात बहुतांश भारतीय लोकच होते.
परंतु ब्रिटिशांचे जरी भारतावर नियंत्रण असले तरी संपूर्ण भारतावर एकछत्री अंमल नव्हता, कारण यात अनेक राजांची संस्थाने होती, ज्यात राजाकडेही बरेच अधिकार होते, त्या संस्थानामधले नियम आणि पद्धती वेगळी असे.
जेव्हा देश स्वतंत्र झाला, एक एक करत हि संस्थाने भारत राष्ट्रात विलीन झाली तेव्हा सर्व देशात लागु होईल अशी एकच व्यवस्था, नियम व कायदे आवश्यक होते. यासाठी देशाचे संविधान लागते.
हे संविधान परकीय राज्यकर्त्यांनी घालुन दिलेली व्यवस्था तशीच पुढे राबवण्यापेक्षा स्वतंत्र भारतीयांनी स्वतःच्या अभ्यासाने बनवणे, स्वतःच्या संमतीने स्वीकारणे आणि मग राबवणे महत्वाचे होते.
यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली ७ जणांची एक समिती नेमण्यात आली. या समितीने भारतात लागू असलेले कायदे, देशोदेशीचे कायदे, प्रशासन पद्धती यांचा सखोल अभ्यास केला.
नव्या भारतात कुठली व्यवस्था असावी, भारतासाठी काय चांगले याच्यावर सांगोपांग चर्चा झाल्या. अनेक फेरफार झाले. हे संविधान तेव्हाच्या संसदेत म्हणजे लोकप्रतिनिधींसमोर ठेवण्यात आले. अनेक चर्चा, बदल, सुधारणा असे करत १९४९ च्या शेवटास हे काम पूर्णत्वास आले आणि या संविधानाला मंजुरी देण्यात आली.
२६ जानेवारी १९५० पासुन हे संविधान लागु करण्यात आले आणि भारत एक स्वतंत्र प्रजासत्ताक देश म्हणुन उदयास आला. भारताने लोकशाही व्यवस्था अंगिकारली. प्रशासकीय अधिकार केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था यांमध्ये विभागण्यात आले.
संविधान २६ जानेवारी रोजीच लागु करण्याचे कारण म्हणजे याच दिवशी १९२९ मध्ये याच दिवशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पूर्ण स्वराज्याचा निर्धार करत स्वातंत्र्यलढा तीव्र केला होता.
प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता असलेला देश. प्रशासकीय कामे पार पाडण्यासाठी कायमस्वरूपी सरकारी संस्था (पोलीस, रेल्वे, विविध सरकारी खाती) जरी असल्या तरी या सर्वांवर नियंत्रण करण्यासाठी, जनतेसाठी योग्य धोरणे आखण्यासाठी सरकार असते, जे प्रजा म्हणजे सर्व लोकांनी निवडुन दिलेल्या प्रतिनिधींनी बनलेले असते.
या दिवशी सर्व सरकारी कार्यालये, शाळा कॉलेज येथे झेंडावंदन होते. सर्व राज्यांमध्ये राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळयांच्या उपस्थितितीत झेंडावंदन होते, त्यासोबत पोलीस संचलन होते. राज्य, जिल्हा, तालुका, गाव अशा प्रत्येक पातळीवर विविध कार्यक्रम पार पडतात.
मुख्य कार्यक्रम देशाची राजधानी दिल्ली येथे राष्ट्रपती, पंतप्रधान, सर्व केंद्रीय मंत्री, बऱ्याचदा मुख्य अतिथी म्हणुन भारताच्या मित्र देशांचे प्रमुख यांच्या उपस्थितीत होतो.
भारतीय सैन्य, नाविक दल, हवाई दल, इतर सुरक्षा दल, एनसीसीचे कॅडेट्स यांचे संचलन होते. यात भारताच्या सैन्यबळाचे, प्रमुख शस्त्रास्त्रांचे दर्शन जगाला होते. त्यानंतर सर्व राज्यांच्या संस्कृती, इतिहास, लोककला यांचा परिचय करून देणारे चित्ररथ यांची मिरवणुक होते.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशाचे राष्ट्रपती देशाला संबोधित करतात. वर्तमान परिस्थितीनुसार देशवासियांना संदेश देतात. याच निमित्ताने देशामध्ये विविध क्षेत्रांमध्ये अतुलनीय कामगिरी केलेल्या नागरिकांना पद्म पुरस्कारांची घोषणा होते. सैन्यात शौर्य गाजवणाऱ्यांना पदके देऊन सन्मान केला जातो.
असा हा दिवस भारत एक देश म्हणुन त्याचं सैन्यबळ, संस्कृती, इतिहास, लोककला, सैनिकांचे पराक्रम, नागरिकांचे कर्तृत्व हे सर्वकाही गौरवणारा दिवस आहे, म्हणूनच महत्वाचा आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हे वाचत असाल, तर तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. जय हिंद!!
लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take