You are currently viewing समुद्राचे लग्न

समुद्राचे लग्न

एकदा बादशहा अकबर बिरबलावर नाराज झाला आणि त्याने बिरबलाचा दरबारात अपमान करून त्याला कामावरून काढुन टाकले. बिरबल राजधानी सोडुन कोणालाही काही न सांगता निघुन गेला. 

असेच दिवस गेले आणि अकबराला बिरबलाची उणीव जाणवायला लागली. त्याच्या इतकं कोणी शिताफीने काम करत नसे, दरबारातले प्रश्न चुटकीसरशी सोडवत नसे, आणि दुसऱ्या कोणाशी गप्पा मारून अकबराला बिरबलाएवढी मजा येत नसे. 

त्याने आपल्या शिपायांना बिरबलाचा शोध घ्यायला पाठवले. पण त्याचा काही पत्ता लागला नाही. अकबराला बिरबलाच्या क्षुल्लक कारणावरून मोठा अपमान करून कामावरून काढून टाकल्याचा पश्चाताप झाला. आपल्या अशा कृतीमुळे बिरबल दुखावला गेला आणि काही न सांगता निघून गेला याची जाणीव झाली. 

काही दिवसांनी अकबराला बिरबलाला शोधुन काढण्यासाठी एक कल्पना सुचली. त्याने आपल्या साम्राज्यातील सर्व मांडलिक राजांना एक संदेश पाठवला. 

“बादशहा अकबराने आपल्या साम्राज्यातल्या समुद्राचे लग्न करण्याचे ठरवले आहे. या लग्नासाठी तुमच्या राज्यातील सर्व नद्या हजर असल्या पाहिजेत असा बादशहाचा आदेश आहे.”

हा संदेश मिळाल्यावर सर्व राजे कोड्यात पडले. समुद्राचं लग्न हा काय प्रकार आहे? नद्यांना पाठवावं तरी कसं आणि बादशहाचा आदेश टाळावा तरी कसा? 

घाबरून एकाही राजाचे उत्तर आले नाही. फक्त एका दूरच्या राजाचे पत्र अकबराला मिळाले. त्यात लिहिले होते 

“आमच्या नद्या या लग्नाला येण्यासाठी उत्साहित झाल्या आहेत, पण त्यांचे स्वागत करायला राजधानीच्या सीमेवर तुमच्या राज्यातील सर्व तलाव आणि विहिरी आल्या पाहिजेत अशी त्यांची अट आहे. 

तशी व्यवस्था झाली कि कळवावे, आम्ही आमच्या नद्यांना पाठवुन देऊ.”

अकबर हे उत्तर वाचुन खुश झाला. ज्या राज्यात बिरबल आहे फक्त तिथुनच असले उत्तर येईल अशी अकबराला खात्री होती. 

असा संदेश अकबराकडून आल्याचे कळल्यावर बिरबलालाही अकबराला आपल्या चुकीची जाणीव झाली असेल आणि तो आपल्याच शोधासाठी असली विचित्र मोहीम राबवतोय हे लक्षात आले होते. त्यामुळे त्याने तो जिथे होता त्या राजाच्या दरबारात जाऊन त्याला असे उत्तर सुचवले. 

अकबराने नजराण्यांसोबत मोठा ताफा त्या राज्यात पाठवुन बिरबलाला सन्मानाने पुन्हा दरबारात आणले. 

लेखक: आकाश खोत

व्यवसाय एक (संगणक अभियंता) 
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )

माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा! 

वैयक्तिक ब्लॉगskyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल:  Thats My Take

प्रतिक्रिया व्यक्त करा