अहो नागोबा, तुमची कहाणी ऐका.
आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणाला पाच-सहा सुना होत्या. श्रावणात नागपंचमीसाठी त्या कोणी आजोळी, कोणी पणजोळी; तर कोणी माहेरी गेल्या.
सर्वांत धाकटीला माहेरचं कुणीच नव्हतं. तेव्हा ती जरा नाराज झाली. पण मनात म्हणाली, माझे सर्व संबंधी नागोबा देव आहे. नागोबा मला माहेराहून न्यावयास येईल.
तिच्या मनातील तो दृढभाव पाहून शेषभगवानास तिची दया आली. ब्राह्मणाचा त्याने वेष घेतला व त्या मुलीला नेण्याकरिता आला. ब्राह्मण विचारात पडला. त्याने आपल्या सुनेला विचारलं. तिनंही हे माझे मामा आहेत, असं सांगितलं. ब्राह्मणानं तिला जाण्यास परवानगी दिली.
वेषधारी मामानी तिला आपल्या वारुळात नेले व खरी हकीगत तिला सांगितली आणि फणीवर बसवून आपल्या बिळात घेऊन गेला. आपल्या बायका-मुलांना ताकीद दिली की, हिला कोणी चावू नका.
एके दिवशी नागाची नागीण बाळंत होऊ लागली. तेव्हा हिला हातात दिवा धरायला सांगितला. पुढं ती व्याली. तिची पिल्लं वळवळ करू लागली.. हे पाहून ती घाबरून गेली व हातातील दिवा खाली पडला. पिलांच्या शेपट्या भाजल्या. नागिणीला राग आला.
तिनं नवऱ्याला सांगितलं. तो म्हणाला, “आपण तिला लवकरच सासरी पाठवू.”
पुढं ती पुनः आनंदानं वागू लागली. एके दिवशी त्याने मुलीला भरपूर धन-संपत्ती दिली व मनुष्यदेह धारण करून दिला आणि सासरी पोहोचवली.
इकडे नागाची मुलं मोठी झाली. त्यांनी आपल्या तुटक्या शेपटीबद्दल आईला विचारले. तिनं मुलीची गोष्ट सांगितली. त्यांना राग आला. सूड घ्यावा; म्हणून ते तिच्या घरी आले.
तो नागपंचमीचा दिवस होता. हिनं पुष्कळ वेळ भावांची वाट पाहिली. ते येत नाहीत; म्हणून पाटावर व भिंतीवर नागांची चित्रं काढली, मनोभावे पूजा केली व प्रार्थना केली, “हे नागोबा देवा, तुमचा जय हो. लांडोबा, पुंडोबा हे माझे भाऊ जिथं असतील, तेथे खुशाल असू देत, सुखी राहू देत.” असे म्हणून नमस्कार केला.
नागाच्या मुलांनी हे सर्व पाहिलं. ही आपली मनोभावे पूजा करते, श्रद्धायुक्त अंतःकरणाने प्रार्थना करते, याची त्यांना जाणीव झाली. त्यांच्या मनातील राग दूर झाला व तिच्याविषयी करुणा निर्माण झाली.
पुढं त्या दिवशी तिथं ते राहिले. दूध-पाणी ठेवतात, त्यात पहाटेस एक नवत्नांचा हार ठेवून आपण निघून गेले. दुसऱ्या दिवशी तिने हार उचलून गळ्यात घातला.
जसा तिला नागोबा प्रसन्न झाला, तसा तुम्हां-आम्हां होवो.
ही साठा उत्तराची कहाणी पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण.