आटपाट नगरात एक ब्राह्मण राहत होता.
त्याच्या घरी श्रावण अमावस्येला वडिलांचं श्राद्ध असे. ज्या दिवशी श्राद्ध, त्या दिवशी सकाळपासून सुनेचं पोट दुखू लागे व ब्राह्मण जेवायला बसण्याच्या वेळेवर मूल मरून जाई. असं झालं, म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात.
सातव्या वर्षीही असंच झालं. तेव्हा सासरा रागावला. ते मेलेलं मूल तिच्या ओटीत घातलं व तिला हाकलून दिलं.
ती एका मोठ्या अरण्यात आली. तिथं तिला झोटिंगाची बायको भेटली.
तिची चौकशी केली. तिला म्हणाली, “आलीस तशी लवकर जा; नाहीतर झोटिंग येऊन तुला खाऊन टाकील.”
तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली, “तेवढ्यासाठी मी इथं आले आहे.” असे म्हणून तिनं आपली सर्व हकीगत सांगितली. “आता मला जगून तरी काय करायचं आहे ?” असं म्हणून ती रडू लागली.
तेव्हा झोटिंगच्या बायकोनं तिला धीर दिला. “अशीच थोडीशी पुढं जा. तिथं तुला शिवलिंग दिसेल. तिथं एका झाडावर बसून राहा. रात्री नागकन्या, देवकन्या, साती अप्सरा बरोबर घेऊन तिथं पूजेला येतील. खीर पुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील. तेव्हा मी आहे मी आहे, म्हणून म्हण. तुला पाहतील. तुझी चौकशी करतील, तेव्हा तू सगळी हकीगत सांग.”
ब्राह्मणाच्या सुनेनं ‘बरं’ म्हटलं व पुढं गेली. बेलाच्या झाडाजवळ उभी राहिली. शिवलिंग दिसलं. शेजारच्या झाडावर ती बसून राहिली. रात्र झाल्यावर नागकन्या, देवकन्या अप्सरांच्या सह आल्या. त्यांनी शिवलिंगाची पूजा वगैरे केली आणि ‘अतिथी कोण आहे ?’ म्हणून विचारलं.
त्याबरोबर ती खाली उतरली. ‘मी आहे’ म्हणाली. तिची विचारपूस केली. तिनं सर्व हकीगत सांगितली.
तिच्या मुलांना जिवंत केलं. तिच्या हवाली केली. पुढं तिला हे व्रत सांगितलं. चौसष्ट योगिनींची पूजा करायला सांगितली व मृत्युलोकी हे व्रत करण्यास सांगितलं.
तसं तिनं विचारलं, “ह्यानं काय होतं ?”
अप्ससरांनी सांगितलं, “हे व्रत केलं, म्हणजे मुलं-बाळं दगावत नाहीत, सुखा-समाधानात राहतात.”
त्यांना ती नमस्कार करून निघाली. ती आपल्या गावात आली.
ब्राह्मणानं आपल्या सुनेवरून आणि मुलांवरून मूठभर तांदूळ व तांब्याभर पाणी ओवाळून टाकून दिले. मोठ्या प्रेमानं तिला घरी घेतलं. तिनं सर्व हकीगत सांगितली.
सर्वांना खूप आनंद झाला. मुला-बाळांसहित सुखाने, आनंदाने, समाधानाने राहू लागली.
ही साठा उत्तराची कहाणी पांच उत्तरी सुफळ संपूर्ण.