महान व्यक्तींच्या नावासोबत एखादी उपाधी कशी रूढ होते हा एक गमतीशीर आणि प्रेरणादायक विषय असतो. टिळकांना लोकमान्य, गांधींना महात्मा, सावरकरांना स्वातंत्र्यवीर, अत्र्यांना आचार्य, अण्णाभाऊ साठेंना लोकशाहीर अशी अनेक उदाहरणे आहेत. एखादा वक्ता आपल्या भाषणात, किंवा एखाद्या पत्रकाराच्या लेखात किंवा लेखकाच्या पुस्तकात असा शब्द पहिल्यांदा वापरला जातो आणि जर तो शब्द सार्थ असेल तरच लोकप्रिय होऊन रूढ होतो.
राहुल द्रविडने त्याच्या “द वॉल” (म्हणजे भिंत) या टोपणनावाविषयी छान टिपणी केली होती. तो म्हणाला मी कुठल्यातरी मॅचमध्ये छान टिकुन खेळलो म्हणुन कोणीतरी बातमीत लिहिलं भिंतीसारखा खंबीर उभा राहुन तो खेळला. आणि ते नाव मला चिटकलं. त्यालापण कल्पना नसेल कि हे नाव किती वेगवेगळ्या प्रकारे वापरलं जाईल. चांगला खेळलो कि द ग्रेट वॉल ऑफ इंडिया, भिंत खंबीर, भिंतीने हल्ले परतवले, अशा बातम्या, आणि वाईट खेळलो कि भिंत ढासळली, भिंतीला भगदाड पडलं अशा बातम्या.
एखादा माणुस स्तुती करताना एखादा शब्द वापरतो, पण त्यात तथ्य असेल, सर्वांना ते मनापासुन पटलं असेल तरच तो रूढ होत राहतो. ज्याला अशा पदव्या मिळतात त्याला त्या पदवीला साजेल असं जगत राहावं लागतं नाहीतर लोकांचा भ्रमनिरास व्हायला वेळ लागत नाही. लहान वयात नारायण राजहंस यांना गाताना बघुन बालगंधर्व हा स्वतः टिळकांनी वापरलेला शब्दही असाच रूढ होऊन बसला.
लोकमान्य म्हणजे लोकांना मान्य असलेला नेता.
टिळकांनी अनेक वर्षे राजकारण केलं, अनेक विषयांमध्ये वेगवेगळ्या भूमिका घेतल्या, ब्रिटिशांशी लढले. चार माणसं एकत्र आली कि प्रत्येकाची आपापल्या पार्शवभूमीनुसार वेगवेगळी विचारसरणी असते. त्यामुळे प्रत्येक गोष्टीवर एकमत होत नसतं. कुठल्याही माणसाचं १००% आपल्याला पटेल असं सांगता येत नाही. त्यामुळे टिळकांच्या काळात त्यांचे विरोधकही बरेच असले तरी त्यांची लोकमान्यता निर्विवाद होती.
भारताच्या लोकांनी टिळकांचं नेतृत्व मनापासुन स्वीकारलं होतं. टिळक काँग्रेसचे अधिवेशन, होमरूल लीगच्या बैठका, वेगवेगळ्या संघटनांच्या सभा, जाहीर भाषणे, इतर नेत्यांच्या, ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी अशा कार्यक्रमांसाठी सतत प्रवास करत असत.
ते प्रवासात जातील तिथे त्यांना पाहण्यासाठी हजारो लोकांची गर्दी होत असे, त्यांच्या मिरवणूका निघत असत, ठिकठिकाणी सत्कार होत असत. रेल्वेने प्रवास करताना स्टेशन सुशोभित करून त्यांना निरोप दिला जात असे, प्रत्येक स्टेशनवर त्यांना भेटायला लोक येत असत. अर्थात अशा कार्यक्रमांमुळे ट्रेनचा प्रवास लांबत असे, तशा ट्रेन्सना टिळक स्पेशल म्हणायचे.
टिळक स्वतः विद्वान होते, त्यांनी गीतारहस्यासारखा अभिनव ग्रंथ लिहिला होता, त्यामुळे त्यांना अनेक जण गुरुस्थानी मानत असत. बरेच जण त्यांचा उल्लेख आपल्या भाषणात टिळक महाराज असा करत असत.
महात्मा गांधी आफ्रिकेतुन भारतात परत आले आणि आधी भारतभ्रमण करून देश समजुन घेतला. मग एक एक करत स्थानिक प्रश्नांना हाती घेत त्यांनी सत्याग्रहाची लढाई सुरु केली होती. तेव्हा ते भारतात प्रस्थापित होऊ घातलेले तरी नवोदित नेते होते, आणि टिळक लोकप्रियतेच्या शिखरावर होते.
तेव्हाच्या एका अधिवेशनात टिळकांचं दर्शन घ्यायला लोकांची एवढी गर्दी व्हायची, अनेक जण आपल्या लहान बाळांना टिळकांचा आशीर्वाद मिळावा म्हणुन घेऊन यायचे. गर्दी ओसरावी म्हणुन पुन्हा पुन्हा टिळकांना बैठकीतून उठून बाहेर जावं लागायचं. टिळक नाहीत म्हणजे कामाचा खोळंबा. त्यामुळे गांधीजी थोडे नाराज झाले, त्यांनी टिळकांकडे आपली नाराजी व्यक्त केली.
टिळक त्यांना म्हणाले “अहो इतकी वर्षे लोकांसाठी काम करत आलोय म्हणुन लोकांचं हे प्रेम मिळतंय. तुम्हीही असेच काम करत राहिलात तर तुम्हालाही हेच बघायला मिळेल.” टिळकांचे शब्द खरे ठरले. टिळकांच्या निधनानंतर गांधीजी भारतातले सर्वात मोठे नेते बनले. त्यांनाही केवळ भेटायला आणि दर्शन घ्यायला अनेक लोक यायचे आणि गांधीजींना त्यांच्या भावनेचा आदर करत त्यांना वेळ द्यावा लागायचा.
लोकांमध्ये मिसळुन राहतो तोच नेता मोठा बनतो. लोकांशी फ़टकून राहुन लोक त्याचं नेतृत्व कसं मान्य करतील?
तेव्हा मराठी रंगभुमी जोरात होती. अनेक नाटककारांनी टिळकांकडुन प्रेरणा घेतली होती. कधी थेट तर कधी कधी आडुन आडुन लोकांना संदेश जाईल अशा पद्धतीचे विषय घेऊन तेव्हा नाटके केली जात होती. काही नाटकांमध्ये चक्क टिळकांवर आधारित पात्रे असायची. टिळकांसारखीच वेशभूषा, बोलण्याची लकब वापरून कलाकार अभिनय करायचे. अशा एका नाटकात स्वतः टिळकांनी त्यांची हुबेहूब नक्कल करणाऱ्या कलाकाराचं कौतुक केलं होतं.
ब्रिटिशांना टिळक हे आपले एक नंबरचे शत्रु वाटत असत. भारतात जो असंतोष पसरलाय त्यात टिळकांचा फार मोठा हात आहे हे त्यांना माहित होतं. ते टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणत. त्यामुळे त्यांनी टिळकांना दडपून टाकायचा बराच प्रयत्न केला. तीनदा राजद्रोहाचा आरोप करून खटला चालवला. त्यात टिळकांना दोनदा तुरुंगवास सहन करावा लागला. एकदा ते निर्दोष सुटले.
व्हॅलेंटाईन चिरोल या इंग्रज लेखकाने भारतात येऊन इथली परिस्थिती समजुन घेऊन “इंडियन अनरेस्ट” म्हणजेच भारतीय असंतोष या नावाचं पुस्तक लिहिलं.
भारतीय असंतोषाचे जनक हि भारतीयांच्या दृष्टीने महत्वाची गोष्ट असली तरी त्यात टिळकांबद्दल काही अवमानकारक उद्गारसुद्धा होते. त्यामुळे टिळकांनी त्या लेखकावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला. गुलाम देशातल्या नागरिकाने राज्यकर्त्या देशातल्या नागरिकावर असा खटला करणे हि धाडसाची आणि दुर्मिळ गोष्ट होती.
टिळक राजकारणाचा भाग म्हणुन इंग्लंडला जायला निघाले होते. तेव्हा त्यांनी तिकडे जाऊन खळबळ माचवु नये म्हणुन सरकारने त्यांना कोलंबोमध्ये पोहोचले असतानाच अडवले. पुढे जाण्याची परवानगी नाकारली. त्यांना दौरा अर्धवट सोडून परत यावे लागले.
मग त्यांनी ह्या चिरोल खटला इंग्लंडमध्ये लढवायचा म्हणुन तिकडे जाण्याची परवानगी मागितली. त्यानिमित्ताने इंग्लंडमध्ये पोहोचल्यावर मग त्यांनी त्यांच्यावरचे निर्बंध उठवण्याची परवानगी मागितली. ब्रिटिशांनी अनेक देशात राज्य चालवले असले तरी त्यांना आपली राज्ययंत्रणा, न्यायव्यवस्था सर्वश्रेष्ठ आहे असा गोड समज होता आणि आपल्या देशातल्या नागरिकांसमोर प्रतिमा फार खराब होऊ नये याचंसुद्धा दडपण असायचं.
टिळकांनी आपल्या ह्या खटल्याचा वापर इंग्लंडला जाऊन तिथे भारतीयांच्या मागण्या, त्यांचे प्रश्न इंग्लंडच्या जनतेसमोर, तिथल्या विविध पक्षाच्या नेत्यांसमोर मांडण्यासाठी केला. इंग्रजांनी भारत सोडावा यासाठी ते भारतात किती छान राज्य करत आहेत, भारताला इंग्रजांच्या राज्याची गरजच आहे असे तिथल्या लोकांचे गैरसमज दूर होणे फार महत्वाचे होते.
टिळकांनी आपल्या सहकाऱ्यांना पण तिकडे नेऊन तिकडे सभा परिषदा घेतल्या, तिथेसुद्धा वृत्तपत्र चालवुन आपले विचार मांडले. भारतीयांच्या प्रश्नाचा पाठपुरावा केला. ह्या सर्वात प्रचंड खर्च झाला आणि शेवटी टिळक हरले. इंग्रजांनी आपल्याच एका लेखकाला भारतीयाच्या तक्रारीवरून दोषी ठरवणे जवळपास अशक्य होते. टिळकांना ते हरले यापेक्षा त्यांना त्यांचं कार्य पुढे नेता आलं, ब्रिटिश न्यायव्यवस्था ते म्हणतात तितकी निष्पक्ष नाही हे जगाला दाखवता आलं याचं समाधान होतं.
हा इंग्लंडचा दौरा करून आणि तिथे खटला लढुन टिळकांना फार मोठं आर्थिक नुकसान झालं. त्यात त्यांचं जवळपास दिवाळं निघालं होतं. तरीही ते खचले नव्हते. गीतेचा त्यांनी लावलेला अर्थ आणि त्यांनी गीतारहस्यात मांडलेला विचार ते स्वतः आयुष्यभर स्स्थितप्रज्ञ राहुन आचरणात आणत होते. त्यांच्याच एका पत्रात त्यांनी लिहिलंय “माझ्यावर अगदी आकाश जरी कोसळले तरी निराश न होता मी त्या कोसळलेल्या आकाशाचासुद्धा माझ्या उद्दिष्टांसाठी कसा वापर होईल ते पाहीन. परिस्थितीला आपल्यावर सत्ता गाजवु देता कामा नये.”
सुबोध भावेच्या “लोकमान्य” या चित्रपटात टिळकांच्या तोंडी “कितीही संकटं आली, अगदी आभाळ जरी कोसळलं तरी त्याच्यावर पाय देऊन मी पुन्हा उभा राहीन” हे वाक्य आलं आहे. सुबोध भावेने ते प्रचंड त्वेषाने फार प्रभावी पद्धतीने म्हटलंय. त्या चित्रपटातलं हे माझं सर्वात आवडतं वाक्य आहे. ते ह्या पत्रात स्वतः टिळकांनी लिहिल्यासारखंच आहे.
टिळकांना फार मोठा आर्थिक फटका बसलाय ह्याची लोकांना कुणकुण लागलीच. त्यांचे चाहते अस्वस्थ झाले. लोकमान्यांना लोकांनी वाऱ्यावर सोडणे शक्य नव्हते. असेच एक अनुयायी पराडकर टिळकांचे सहकारी आणि केसरीचे संपादक न. चि. केळकर यांना जाऊन भेटले.
ते म्हणाले “आपण अनुयायांनी यासाठी काहीतरी करायला हवे. “
केळकर म्हणाले “अहो पण, त्यांना बसलेला आघात काही सामान्य नाही.”
पराडकर : “लोकमान्यांची लोकमान्यतादेखील सामान्य नाही. आपण सर्वानी मनावर घेतलं तर आपण ह्या आघाताचे निवारण करू शकतो.”
केळकर: “बोलणं ठीक आहे, पण तुम्ही प्रत्यक्ष करू काय शकता?”
पराडकर: “आज मला हे समजले आणि मी पुढे आलो. आज माझ्या व्यवसायातुन जी काही पुंजी जमा होईल ती मी टिळकांसाठी देईन. असंच सर्वांनी जमेल ते करावं.”
केळकर: “म्हणजे किती रक्कम म्हणताय तुम्ही?”
पराडकर: “अंदाजे दीड हजार.”
दीड हजार हि आजही छोटी रक्कम नाही आणि त्याकाळी तर अजिबात नव्हती. केळकर चकित झाले.
केळकर: “एवढी रक्कम तुम्ही देणार? मग पुढे काय करणार?”
पराडकर: “पुढचं पुढे बघु. आज मी हा संकल्प सोडला.”
यातुनच अनेकजण पुढे आले आणि टिळकांसाठी मोठा निधी गोळा झाला. टिळकांना मानणाऱ्या इतर नेत्यांनी सुद्धा सभा घेऊन लोकांना आवाहन केले. गांधीजीसुद्धा त्यात सहभागी होते. टिळक एक व्यक्तिगत खटला लढण्याच्या नावाखाली जाऊन या संकटात सापडले असले तरी त्यांनी अंगावर घेतलेले कार्य हे त्यांच्या एकट्याच्या इभ्रतीसाठी नव्हते याची लोकांना जाणीव होती. त्यामुळेच लोकांनी उत्स्फूर्तपणे हा निधी उभा केला आणि आपल्या लाडक्या नेत्याला संकटातुन बाहेर काढलं.
काही जणांनी यावर टीका केली आणि लोकमान्यांना पत्र लिहुन तक्रार केली तेव्हा ईंग्लंडमधून स्वतः टिळकांनी भारतात पत्र पाठवुन निधी गोळा करणे थांबवण्याची विनंती केली.
लोकमान्यांची लोकमान्यता दाखवणारे भरपूर प्रसंग आणि किस्से आहेत, त्यातले मोजकेच मी इथे दिलेत. आभाळ कोसळलं तरी त्यावर पाय देऊन उभं राहण्याचा आत्मविश्वास असलेल्या लोकमान्यांनी हाच आत्मविश्वास, स्वाभिमान, देशाभिमान त्यांच्या काळातल्या लोकांमध्ये जागवला आणि ब्रिटिशांना आव्हान दिलं. त्यांच्या आयुष्याबद्दल माहिती मिळाली कि आजही लोकांना प्रेरणा मिळते.
लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take