You are currently viewing शुक्रवारची (जिवत्यांची) कहाणी

शुक्रवारची (जिवत्यांची) कहाणी

शुक्रवारा, तुमची कहाणी ऐका. एक आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला मुलगा नव्हता; म्हणून राणीनं एका सुईणीला नाळवारीसुद्धा एक मुलगा गुपचूप आणून देण्यास सांगितले. त्याबद्दल ती तिला भरपूर द्रव्य देणार होती. सुईणीने ती गोष्ट मान्य केली. सुईण त्या शोधात निघाली.

गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर राहिली. तेव्हा सुईण तिच्या घरी गेली. तिला म्हणाली, ” तू गरीब आहेस. तुझं पोट दुखू लागेल, तेव्हा मला कळव. मी बाळंतपण फुकट करीन.” त्या स्त्रीने ते मान्य केलं.

नंतर सुईण राणीकडे आली व ती हकीगत सांगितली. म्हणाली, “लक्षणं सर्व मुलाचीच दिसताहेत. तेव्हा आपल्या घरापासून तो तिथपर्यंत कोणास काही कळणार नाही, असं एक गुप्त भुयार तयार करावं. आपल्यास दिवस गेल्याची अफवा उठवावी. मी तुम्हास नळवारीचा मुलगा आणून देईन.”

राणीला आनंद झाला. त्याप्रमाणं तिनं डोहाळं लागल्याचे सोंग केलं. पोट मोठं दिसण्यासाठी त्यावर कापडाच्या घड्या बांधल्या. भुयार तयार केलं. नऊ महिने होताच बाळंतपणाची तयारी केली.

इकडे ब्राह्मण स्त्रीचं पोट दुखू लागलं. सुईणीला बोलावणं आलं. त्याबरोबर सुईण राणीकडे बघत आली आणि पोट दुखण्याचं सोंग करण्यास सांगितलं व ब्राह्मणाच्या घरी आली. तिला भय वाटू नये; म्हणून तिचे डोळे बांधले. तिला मुलगा झाला. सुईणीनं एका दासीकडून भुयाराच्या वाटेनं मुलगा राणीकडे पाठवला. तिनं वरंवटा घेऊन त्याला एक कुंचा बांधला व तिच्यापुढे ठेवला. ती दु:खी-कष्टी झाली. सुईण राजवाड्यात गेली. राणीसाहेब बाळंतीण झाल्याची बातमी पसरली. सर्वांना खूप आनंद झाला. मुलगा मोठ्या लाडात वाढू लागला.

इकडे ब्राह्मण स्त्रीने नेम धरला. श्रावणातील दर शुक्रवारी जिवतीची पूजा करून नमस्कार करून, ‘जय जिवती माते, जिथं माझं बाळ असेल, तिथ खुशाल असो, असं म्हणून तांदूळ उडवावेत व ते ह्या मुलाच्या डोक्यावर. पडावेत. हिरवी साडी नेसणं, हिरव्या बांगड्या घालणं, कारलीच्या मांडवाखालून जाणं, तांदळाचं धुणं ओलांडणं बंद केलं. याप्रमाणे ती वागू लागली.

इकडे राजपुत्र मोठा झाला. एके दिवशी बाहेर फिरायला निघाला. त्या दिवशी ही न्हाऊन आपल्या अंगणात राळे राखीत बसली होती. याची नजर तिजवर गेली. हा मोहित झाला व रात्री भेट घ्यायची ठरविलं. रात्री घरी आला. दारात गाय-वासरू बांधली होती. चालता-चालता राजाचा पाय वासराच्या शेपटीवर पडला. वासराला वाचा फुटली. ते म्हणाले, “कोण्या पाप्यानं माझ्या शेपटीवर पाय दिला आई ?” “जो कोणी आपल्या आईकडे जावयास भीत नाही, तो तुझ्या शेपटीवर पाय देण्यास भिईल काय ?” हे ऐकताच तो मागे फिरला आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशीस जाण्याची परवानगी घेऊन काशीस निघाला.

वाटेत एका ब्राह्मणाचे घरी उतरला. त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होत होती; पण ती पाचवी-सहावीच्या दिवशी जात. राजा आला, त्या दिवशी चमत्कार झाला. पाचवीचा दिवस होता. राजा दारात निजला होता. रात्री सटवी आली व म्हणू लागली, “कोण गं असं वाटेतच निजलं आहे ?” जिवतीने उत्तर दिलं, “अगं, माझं ते नवसाचं बाळ आहे. मी काही त्याला ओलांडू देणार नाही.” मुलाचे आई-वडील चिंतेत होते. त्यांनी हा संवाद ऐकला. उत्तररात्र झाल्याने सटवी व जिवती निघून गेल्या. उजाडताच ब्राह्मणाने राजाचे पाय धरले. “आपल्यामुळे मुलगा जगला. आजचा दिवस मुक्काम करा,” अशी विनंती केली. राजानं ती मान्य केली. त्याही रात्री असंच झालं. दुसरे दिवशी राजा निघाला.

इकडे ह्याचा मुलगा मोठा झाला. काशीत यात्रेच्या वेळी गयावर्जनाची वेळ आली. पिंड देतेवेळी ते घ्यायला दोन हात वर आले. असं होण्याचं कारण त्याने ब्राह्मणांना विचारलं. ते म्हणाले. “घरी जा. गावातल्या साऱ्यांना जेवायला बोलव, म्हणजे याचे कारण समजेल.” 

घरी आला. जेवण घातलं. गावात ताकीद दिली, ‘घरी चूल पेटवू नये. सगळ्यांनी जेवायला यावं. ब्राह्मणीला मोठी पंचायत झाली. तिनं राजाला निरोप पाठवला, “मला जिवतीचं व्रत आहे. माझे नेम पुष्कळ आहेत. ते पाळाल, तर जेवायला येईन.” राजानं कबूल केलं व नेम पाळले. त्याप्रमाणे ती जेवायला आली.

पानं वाढली. मोठा थाट होता. राजा तूप वाढत-वाढत ही ज्या पंक्तीत बसला होती, तिथं आला व तूप वाढू लागला. ईश्वरी चमत्कार झाला. तिला पुत्रप्रेमाने पान्हा फुटला. दुधाच्या धारा ह्याच्या तोंडात उडाल्या. तो तसाच रुसून निजला. आईने त्याची समजूत घातली. तिनं सांगितलं, “ती तुझी खरी आई; मी तुझी मानलेली आई!” व सर्व हकीगत सांगितली. नंतर भोजन-समारंभ पार पडला. पुढे त्यानं आपल्या आई-वडिलांस राजवाड्याजवळ मोठा वाडा बांधून देऊन राज्य करू लागला. जशी जिवती तिला प्रसन्न झाली, तशी तुम्हां-आम्हां होवो. ही साठा उत्तराची कहाणी पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

प्रतिक्रिया व्यक्त करा