नरकासुर नावाचा एक दुष्ट राक्षस होता. काही पुराणानुसार तो खरं तर वराह (विष्णुचा अवतार) आणि भूमिदेवी (पृथ्वी) यांचा मुलगा होता.
परंतु असुरांच्या संगतीत राहुन तो हि वाईट मार्गाला लागला होता. स्वतः वराह आणि भूमिदेवीचा पुत्र असल्यामुळे तो अतिशय शक्तिशाली होता आणि त्याला दैवी अस्त्रांचे चांगले ज्ञान होते.
त्याने आपल्या बळाच्या वापराने अनेक राज्यांवर आक्रमण करून त्यांना हरवले होते. तिथे लुटपाट केली होती. तिंल्या लोकांना गुलाम केले, स्त्रियांना कैद करून आपल्या बंदिवासात ठेवले. असे करता करता जवळपास सोळा हजार स्त्रिया त्याच्या बंदिवासात अत्याचाराला बाली पडत होत्या.
त्याने अहंकाराच्या भरात स्वर्गावर आक्रमण करून देवांचा अपमान करण्यासाठी त्यांच्या आईवर म्हणजे अदितीवर हल्ला केला आणि तिची कर्णफुले (कानातले दागिने) पळवले.
देवांनी द्वारकेत जाऊन श्रीकृष्णाची मदत मागितली. श्रीकृष्ण त्यांच्यासाठी नरकासुराशी लढायला तयार झाले. या मोहिमेवर त्यांची पत्नी सत्यभामासुद्धा त्यांच्यासोबत निघाली.
श्रीकृष्णांनी नरकासुराच्या राजधानी प्रागज्योतिषपूर (म्हणजे आजच्या आसाम राज्यात) वर आपल्या गरुडावर बसुन हल्ला चढवला.
श्रीकृष्ण आणि नरकासुर यांचे तुंबळ युद्ध झाले. नरकासुराने श्रीकृष्णाला हरवण्यासाठी अनेक दैवी अस्त्रांचा मारा केला. परंतु श्रीकृष्णांनी त्याच्या प्रत्येक अस्त्राच्या उत्तरादाखल दुसरे तुल्यबळ अस्त्र वापरून त्याची अस्त्रे निष्प्रभ केली.
नरकासुराने आग्नेयास्त्र (अग्नी) वापरले तेव्हा श्रीकृष्णाने त्याला वरुणास्त्राने (पाणी) उत्तर दिले.
नरकासुराने श्रीकृष्णाला नागपाशात बांधण्याचा प्रयत्न केला पण श्रीकृष्णाच्या गरुडास्त्राने नागपाश परतवून लावले.
नरकासुराने ब्रह्मास्त्र आणि वैष्णवास्त्र वापरले, पण श्रीकृष्णाकडे हि दोन्ही अस्त्रे असल्यामुळे ते निष्प्रभ झाले.
शेवटी सुदर्शन चक्राने नरकासुराचा शिरच्छेद करून श्रीकृष्णाने त्याचा वध केला.
नरकासुराला मारल्यावर श्रीकृष्णाने त्याच्या बंदिवासात असलेल्या सर्व स्त्रियांना मुक्त केले. त्या स्त्रियांच्या समोर प्रश्न होता कि इतके दिवस नरकासुराने बंदी बनवुन ठेवले असल्यामुळे त्यांना समाजात मान मिळणार नाही. कोणी त्यांना घरात घेणार नाही, त्यांना सन्मानाने जगता येणार नाही.
तेव्हा त्यांना श्रीकृष्णाने त्या सर्वांशी विवाह केला आणि त्यांना आपल्या पत्नीचा मान दिला. त्यांना द्वारकेत नेऊन त्यांच्या राहण्याची सोय केली. स्वतः भगवंताच्या पत्नी बनल्यामुळे त्यांचे उर्वरित आयुष्य सोपे झाले.
खरं तर हि गोष्ट प्रतीकात्मक होती. आपल्या समाजात अत्याचार सहन केलेल्या स्त्रीला चांगले वागवले जात नाहीत हे श्रीकृष्णाला माहित होते. त्यामुळे स्वतःच्या कृतीतुन त्यांनी एक संदेश देण्याचा प्रयत्न केला. अशा स्त्रियांना स्वीकारून त्यांना पूर्ण सन्मानाने वागवावे हे त्यांना दाखवायचे होते.
आपला समाज मात्र फक्त श्रीकृष्णाने हजारो बायका केल्या या गोष्टीवरच लक्ष देतो. या कृतीमागचा अर्थ जास्त महत्वाचा आहे.
श्रीकृष्णाने ज्या दिवशी नरकासुराचा वध केला तो दिवस नरक चतुर्दशी म्हणुन ओळखला जातो, आणि तो दिवाळीत वाईटावर चांगल्याचा विजय म्हणुन साजरा केला जातो.
लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take