गोपद्मांनो, तुमची कहाणी ऐका.
स्वर्गलोकी इंद्रसभा, चंद्रसभा, कौरवसभा, पांडवसभा इत्यादिक पाच सभा भरलेल्या होत्या.
ढोल-ताशे वाजत होते. रंभा नाचत होत्या. तोच तंबोऱ्याच्या तारा तुटल्या. मृदुंगाच्या भेया फुटल्या.
हे पाहून सभेने हुकूम केला – हाकारा करा, दांडोरा पिटा, गावात कोणी वाण वशावाचून असेल, त्याच्या पाठीचा तीन बोटं कंकर काढून आणा.
तंबोऱ्याला तार लावा, कीर्तन सुरू करा. रंभा पुन्हा नाचू देत.
असा हुकूम होताच श्रीकृष्ण मनात घाबरले. माझी बहीण सुभद्राने काही वाण-वसा केला नसेल तर, असा विचार त्यांच्या मनात येताच ते उठले आणि तिच्याकडे जाऊन त्यांनी चौकशी केली.
ते म्हणाले, “अगं सुभद्रा ! आखाड्या दशमीपासून तीन-तीन गोपदा पिंपळाचे पारी, तळ्याचे पाळी, गायीच्या गोठ्यात, देवाच्या द्वारी व ब्राह्मणाच्या द्वारी काढून पूजा करावी. हा वसा कार्तिक दशमीस संपूर्ण करावा. याप्रमाणे पाच वर्षे हा वसा करावा.
उद्यापनाच्या वेळी कुंवारणीला जेवायला बोलवावे. पहिल्या वर्षी विडा द्यावा, दुसऱ्या वर्षी चुडा भरावा, तिसऱ्या वर्षी केळ्याचा फणा द्यावा, चौथ्या वर्षी उसाची मोळी द्यावी आणि पाचव्या वर्षी चोळी परकर देऊन आपल्या वशाचे उद्यापन करावे, असे सांगून श्रीकृष्ण पूर्वठिकाणी येऊन बसले.
ताबडतोब श्रीकृष्णांनी सांगितल्याप्रमाणे सुभद्रेने सारे काही केले. नंतर सभेत सुभद्रा वाण-वशाशिवाय आहे, कळले, तेव्हा तिकडे दूत गेले. पाहतात, तो तिने वसा वसला आहे.
तेथून येत असताना एक हत्तीण दिसली. ती वाण-वसाशिवाय होती. ती दक्षिणेस पाय व उत्तरेस डोके करून निजली होती. तेव्हा तिच्या पाठीचा कंकर काढून नेला व तंबोऱ्याच्या तारा जोडल्या. मृदुंगाच्या भेऱ्या वाजू लागल्या, रंभा नाचू लागल्या.
ज्याप्रमाणे ह्या व्रतामुळे सुभद्रेवरील संकट दूर झाले, त्याप्रमाणे तुमचे-आमचे सकंट दूर होवो.
ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.