You are currently viewing पाठीवरचे मांडे

पाठीवरचे मांडे

निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपान आणि मुक्ता हि चारही भावंडे ज्ञानी होती. निवृत्तीनाथांनी गहिनीनाथांकडून मिळालेले योगज्ञान, ब्रह्मविद्या आपल्या भावंडांना दिली. चारही भावंडे अभंग, ओव्या, विराण्या असे साहित्य रचुन सामान्य लोकांमध्ये अध्यात्मिक ज्ञानाचा प्रसार करीत होती. 

पोथी पुराणे, कर्मकांड, जातीव्यवस्था यामुळे सामान्य लोक अध्यात्मापासून वंचित राहत होते. या संतांनी तो अडथळा मोडुन सामान्य लोकांना भक्तीचा, प्रेमाचा मार्ग शिकवला. त्यांचे भक्त अनुयायी वाढत होते.

ज्यांना आपण संन्याशाची पोरे म्हणुन हिणवलं ती इतकी विलक्षण निघाली कि त्यांचे लोक भक्त बनावेत हे काही जणांच्या मात्र पचनी पडत नव्हते. 

विसाजीपंत हे त्यापैकीच एक होते. ते एक सावकार होते. एक प्रतिष्ठित व्यक्ती होते. त्यांचा स्वतःचा धर्म शास्त्रांचा चांगला अभ्यास होता. त्यांना ह्या भावंडांबद्दल मत्सर वाटत होता. त्यांनी दाखवलेल्या चमत्कारांच्या कथा त्यांच्या कानी पडल्या असल्या तरी त्यांना त्यावर विश्वास नव्हता. 

एक दिवस निवृत्तीनाथांना मांडे खाण्याची इच्छा झाली. हा पदार्थ मातीच्या खापरावर बनवतात. त्याला लागणारं खापर घरी नव्हतं. त्यामुळे मुक्ता ते खापर घेण्यासाठी कुंभारांकडे गेली. विसाजीपंतांनी या भावंडांना काही द्यायचं नाही असा दम दुकानदारांना भरला होता, त्यामुळे मुक्ताला जागोजागी फिरूनसुद्धा ते खापर मिळालं नाही. 

मुक्ताई हिरमुसुन घरी आली. आपल्या दादाला हवा तो पदार्थ बनवता येणार नाही याचं तिला फार दुःख झालं. तिचा पडलेला चेहरा पाहुन ज्ञानेश्वरांनी काय झालं ते विचारलं. तिनी मांडे करायचे आहेत आणि कोणी खापरच दिलं नाही हे सांगितलं. 

ज्ञानेश्वर म्हणाले “बस एवढंच ना? मग कशाला एवढी दुःखी होतेस? कर तु तयारी. छान मांडे करू आपण.” 

ज्ञानादादाने आश्वासन दिल्यावर ते तो पुर्ण करेलच याची मुक्ताला खात्री होती. मुक्ता उत्साहात तयारीला लागली. तयारी झाल्यावर तिला मांडे खापरावर थापुन गरम करून बनवायचे होते. तिने दादाला विचारलं “कुठंय रे दादा खापर, कशावर थापू मी मांडे?”

दादा म्हणाला “थाप माझ्या पाठीवर.” ज्ञानेश्वर असं म्हणुन ओणवे झाले. त्यांची पाठ तापायला लागली. एकदम गरम होऊन ती लालेलाल झाली. 

मुक्ताने आनंदाने दादाच्या पाठीवर मांडे थापले. 

हा सगळा प्रकार विसाजीपंतांनी लपुन छपून खिडकीतुन पाहिला होता. मुक्ताला खापर मिळालं नाही हे त्यांना कळलं आणि आता हे काय करतात ती मजा पाहायला ते आले होते. मजा तर त्यांनी पाहिलीच पण एकदम वेगळीच. 

ज्ञानेश्वरांची ती लीला पाहुन ते विचारात पडले. हि भावंडे खरंच दिव्य आहेत याची त्यांना खात्री पटली. आपण यांचा उगाचच तिरस्कार केला, त्रास द्यायचा प्रयत्न केला याचा त्यांना पश्चाताप झाला. त्यांना ते देवासमान वाटायला लागले. 

त्यांनी आपल्या चमत्काराने बनवलेले मांडे आता त्यांना खावे वाटत होते. त्यांच्यासाठी तो साक्षात देवाच्या हस्ते बनलेला प्रसाद होता. पण त्या भावंडांचं स्वतःचं जेवण चालु असताना ते खावे कसे? 

ते त्यांचं जेवण होईपर्यंत थांबले आणि ज्ञानेश्वर पानावरुन उठताक्षणी तडक आत जाऊन त्यांच्या उष्ट्या पत्रावळीतुन अधाशासारखे उरलेले खायला लागले. 

ज्ञानेश्वर आश्चर्याने म्हणाले “अरे असं खेचरासारखं काय करताय?” 

विसाजीपंत तृप्त झाले होते. त्यांनी त्या भावंडांची क्षमा मागितली. त्यांचं शिष्यत्व पत्करलं. 

कोणी म्हणतात ज्ञानेश्वरांचे शिष्य झाले, कोणी म्हणतात मुक्ताईचे, स्वतः विसाजीपंतांच्या एका अभंगात सोपान आपले गुरु असल्याचा उल्लेख आहे. पण हि बाब गौण आहे, त्या चार भावंडांचं आयुष्य, ज्ञान, शिकवण सगळंच एकमेकांशी इतकं जोडलं आहे कि ते वेगळे नाहीतच. 

ह्याच विसाजी पंतांना संत विसोबा खेचर असंही म्हणतात. या प्रसंगी त्यांचे डोळे उघडल्यावर ते स्वतः भक्तिमार्गावर आयुष्यभर चालले. पुढे ते संत नामदेवांचे गुरु झाले. 

लेखक: आकाश खोत

व्यवसाय एक (संगणक अभियंता) 
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )

माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा! 

वैयक्तिक ब्लॉगskyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल:  Thats My Take

प्रतिक्रिया व्यक्त करा