You are currently viewing अकबर बिरबलाची पहिली भेट

अकबर बिरबलाची पहिली भेट

बिरबल अकबराचा लाडका मंत्री होता. बिरबलाने अकबराच्या वर्षात अनेक वर्षे शेवटपर्यंत सेवा केली. पण ह्या दोघांची भेट कशी झाली ती गोष्टसुद्धा मनोरंजक आहे. हीच गोष्ट मी आज तुम्हाला दोन भागात सांगणार आहे. 

अकबराला प्रजेचे हालहवाल समजुन घ्यायला वेषांतर करून राजधानीत फिरायला आवडत असे. असं फिरल्यामुळे त्याला प्रजा समाधानी आहे कि नाही, ते बादशाहाबद्दल कसा विचार करतात, त्यांच्या आजकालच्या समस्या काय असतात हे समजत असे. 

असाच अकबर एकदा दिवसा वेषांतर करून राजधानीत फिरत होता. त्याला ह्या वेशात कोणी ओळखत नव्हते. फिरत असताना त्याला एका चौकात लोकांची गर्दी जमलेली दिसली. का गर्दी जमली आहे हे पाहायला तो कुतूहलाने त्या गर्दीत सामील झाला. 

तिथे बहुरुप्याचा खेळ चालू होता. बहुरुप्या वेगवेगळी रूपे धारण करून लोकांचे मनोरंजन करत होता. लोक खुश होऊन त्याला प्रोत्साहन देत होते. त्याच्याकडे पैसे टाकत होते. त्याच्या सोबती ते पैसे गोळा करून ठेवत होता. 

अकबर काही वेळ तो खेळ बघत उभा राहिला. बहुरुप्याने आता बैलाचे कातडे अंगावर ओढले आणि बैलाचे सोंग धारण केले. हुबेहूब बैलाचा आवाज काढत होता, मान हलवत होता. लोक फार खुश झाले. 

अकबराच्या बाजूला एक तरुण मुलगा उभा होता, तो हि मन लावुन खेळ बघत होता. त्याने खेळ बघता बघता एक छोटा दगड उचलला आणि त्या बहुरूप्याच्या अंगावर आल्हाद मारला. अकबराला आश्चर्य वाटले आणि राग आला, एवढ्या चांगल्या कलाकाराला का दगड मारावा?

पण त्या बहुरुप्याने दगड अंगावर लागताक्षणी आपले अंग थरथर हलवले. तो दगड मारणारा एकदम आनंदाने ओरडला “वाह क्या बात है.” त्याने आनंदाने काही शिक्के खिशातून काढले आणि पुन्हा बहुरुप्याच्या अंगावर फेकले. बहुरुप्याने पुन्हा अंग थरथर कापुन दाखवले. तो मुलगा अजुन खुश झाला. 

हि काय अजब तऱ्हा असा अकबर विचार करत होता. बहुरुप्याने कातडे काढले आणि मोठ्याने विचारले मला आत्ता दगड कोणी मारला? 

अकबराला वाटले आता बहुरूपी ह्या मुलाला धडा शिकवणार. तो मुलगा पुढे झाला आणि म्हणाला मी मारला दगड. 

बहुरुप्याने अत्यंत आदराने त्या मुलाला वाकुन नमस्कार केला. आणि विचारले नंतर ते शिक्के पण तुच मारलेस का? 

तो मुलगा हो म्हणाला. 

आता बाकी लोकांना आश्चर्य वाटत होते. दगड मारणाऱ्या मुलाला हा बहुरूपी इतक्या आदराने का वागवत होता. त्यांनी बहुरुप्याला ते विचारले. 

बहुरूपी म्हणाला “लोकहो, बैलासारखी मान हलवणे, आवाज काढणे तर आमच्यासाठी फार सोपी गोष्ट आहे. मी जिथे जिथे हे सोंग करतो तिथे तेवढ्याने लोक खुश होतात. पण बैल त्यांच्या अंगावर काही लागताच त्यांचं अंग थरथर कापत हे निरीक्षण करून ह्या मुलाने मी तसे करतो कि नाही हे बघायला दगड मारून माझी परीक्षा घेतली. 

मी पण ते निरीक्षण करून सराव करून ठेवला होता म्हणुन ह्याच्या परीक्षेत मी उत्तीर्ण झालो. त्याने खुश होऊन जे शिक्क्यांचे बक्षीस मला दिले ते माझ्यासाठी फार मोलाचे आहे. एका दर्दी रसिकाने माझ्या कलेला दिलेला तो सन्मान आहे.” 

लोकांनी टाळ्या वाजवुन तो बहुरूपी आणि तो मुलगा दोघांचे कौतुक केले. अकबरालाही कौतुक वाटले. त्याला कलावंतांची कदर होती. त्याला त्या मुलाच्या निरीक्षणशक्तीचेही कौतुक वाटले. 

खेळ संपला आणि गर्दी पांगायला लागली. अकबराने त्या कलाकाराजवळ जाऊन आपली खरी ओळख सांगितली. त्याला दुसऱ्या दिवशी दरबारात यायचे आमंत्रण दिले आणि त्याच्या कलेचे बक्षीस देईन असे सांगितले. 

त्या मुलाचीही चौकशी. त्याचे नाव होते महेशदास. त्यालासुद्धा दुसऱ्या दिवशी दरबारात बक्षीस घ्यायला येण्यास सांगितले. 

हाच मुलगा पुढे जाऊन बिरबल बनणार होता. दुसऱ्या दिवशी दरबारात काय झाले ते वाचा ह्या पुढच्या गोष्टीत: फटक्यांचे बक्षीस.

लेखक: आकाश खोत

व्यवसाय एक (संगणक अभियंता) 
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )

माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा! 

वैयक्तिक ब्लॉगskyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल:  Thats My Take

प्रतिक्रिया व्यक्त करा