अकबराच्या महालाच्या आजूबाजूला सुंदर बाग होती. बागेत सुंदर वृक्ष,हिरवळ, फुलझाडे यांनी बहार आणली होती. माळ्यांचा ताफा बागेची निगराणी करण्यासाठी सज्ज असे.
बागेत अकबराने काही पाळीव प्राणी आणि पक्षी पाळले होते. त्या बागेत प्राणी आणि पक्ष्यांसोबत वेळ घालवणे हा बादशहाचा आणि त्याच्या शाही परिवाराचा आवडता विरंगुळा होता.
एकदा बादशहाला एका दूरदेशीच्या राजाने एक रंगीबिरंगी पोपट नजराणा म्हणुन दिला. ह्या पोपटाला माणसासारखे बोलण्यासाठी खास तयार केले होते. तो कुराणातल्या काही सोप्या आयतासुद्धा म्हणुन दाखवायचा. बादशहा भेटायला आला कि त्याला आपल्या घोगऱ्या आवाजात सलामी द्यायचा.
अकबराचा त्या पोपटावर जीव जडला होता. त्याने एक सेवक खास ह्या पोपटाची काळजी घ्यायला ठेवला होता. त्याच्या पिंजऱ्यात अजिबात घाण राहिलेली किंवा खाण्या पिण्यात काही कसुर झालेली अकबराला चालत नसे.
इतक्या छान पद्धतीने बडदास्त ठेवल्यामुळे तो पोपट छान जगला. इतर पोपटांच्या मानाने जरा जास्तच. पण शेवटी त्याचं वय होत आलं. तो थोडा आजारी पडायला लागला. सेवकाने जरी सर्व पदार्थ हजर केले तरी त्याचं खाणं पिणं नीट होत नव्हतं.
अकबर त्याची हि अवस्था बघुन संतापत असे. त्याने सेवकाला सज्जड दम भरला. “पोपटाने खाल्लं नाही तर तुलाही खायला मिळणार नाही. पोपटाला काही झालेलं मला चालणार नाही. कोणी येऊन मला सांगावंच कि पोपट अल्लाला प्यारा झाला, मी त्याचं मुंडकंच उडवीन.”
सेवक अतिशय भयभीत झाला. पोपट आता जास्त दिवस जगणार नाही हे त्याला कळुन चुकलं होतं. आता आपली काही खैर नाही या विचाराने तो अस्वस्थ झाला. त्याने बिरबलाला जाऊन सगळी हकीकत सांगितली.
बिरबलाने त्याला शांत केले. त्याला सांगितले कि जर पोपट मेला तर अकबराच्या आधी त्याने बिरबलाला कळवायचे. मग बिरबल सगळं सांभाळुन घेईल. बिरबलाच्या आश्वासनाने तो निर्धास्त झाला.
काही दिवसांनी पोपट देवाघरी गेलाच. आपल्या पिंजऱ्यात तो निपचित पडला. सेवकाने ठरल्याप्रमाणे त्वरेने अकबरापर्यंत खबर पोचण्याआधी बिरबलाला कळवले.
बिरबल महालात गेला आणि अकबराला म्हणाला “खाविंद, चमत्कार झाला. आपला लाडका पोपट आता योगी अवस्थेत गेला आहे. अत्यंत एकाग्रतेने त्याने ध्यान लावले आहे. असा पोपट कोणीच आजवर पाहिला नव्हता. चला तुम्ही स्वतः पहा.”
अकबर आश्चर्यचकित झाला आणि बिरबलसोबत पोपटाकडे गेला. त्याला पाहताक्षणी तो मेला असल्याचे त्याच्या लक्षात आले.
“काहीही काय बडबडतोस बिरबल? मेलाय तो पोपट. ध्यान करतोय म्हणे.”
“काय म्हणताय खाविंद? अरे देवा… “ बिरबलाने मोठमोठ्याने आरडाओरडा सुरु केला. “हुजुरांचा आवडता पोपट गेला. आता हुजूर स्वतः जीव देतील, स्वतःचं मुंडकं उडवतील. अरे देवा आता आम्हा सर्वांचं कसं व्हावं… “
“मनाला येईल ते बोलु नकोस, बिरबल. मी का जीव देईन एका पोपटासाठी? माझा आवडता होता तो पोपट हे खरंय, माझा खुप जीव होता त्याच्यात. पण काही दिवस आजारी होता तो. एक दिवस जाणारच होता. त्याच्यासाठी मी का जीव देईन.”
“खाविंद तुम्ही जो कोणी पोपट मेला म्हणुन सांगेल त्याचं डोकं उडवाल म्हणुन सांगुन ठेवलं होतं. आम्हाला तर वाटलं होतं पोपट ध्यान करतोय, पण तुम्ही स्वतः म्हणालात तो मेलाय म्हणुन. आता तुम्हाला तुमचाच शिरच्छेद करावा लागेल.”
आता अकबराच्या लक्षात सगळा प्रकार आला. पोपट मेल्याचं अकबराच्याच तोंडातुन वदवून बिरबलाने त्या सेवकाचे प्राण वाचवले होते.
“असं काही नाही बिरबल. मी रागात म्हणालो असेन. एका पोपटासाठी कोणाचा शिरच्छेद खरंच थोडी ना करणार होतो मी. शेवटी प्रत्येकाला एक दिवस मरायचंच आहे. त्यासाठी एवढं टोकाला जाऊ नये कोणी.” असं म्हणुन अकबराने वेळ मारून नेली.
त्या सेवकाने बिरबलाचे आभार मानले. अकबराने खरंच त्याला शिक्षा दिली असती तर पोपटासाठी माणसाचा जीव घेणारा दुष्ट म्हणुन त्याचीसुद्धा बदनामी झाली असती. ते रोखल्याबद्दल त्याने पण मनातल्या मनात बिरबलाचे आभार मानले.
लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take