You are currently viewing अफझलखानाचा वध

अफझलखानाचा वध

शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले तेव्हा आदिलशाही, मोगल यांनी त्यांना थांबवण्यासाठी बरेच प्रयत्न केले, पण राजांनी त्यांना जुमानले नाही. आपले कार्य सुरूच ठेवले. 

आदिलशाहच्या मृत्यू नंतर त्याचा अल्पवयीन मुलगा गादीवर आला. त्याच्या नावे आदिलशाहच्या बेगम, जिला बडी बेगम म्हटले जाते तिने मुलाच्या नावे कारभार स्वतःच्या हातात घेतला. तिने दरबार भरवला. आणि सर्व सरदारांना उद्देशुन म्हणाली. 

“शिवाजीने आपल्या मुलुखातून किल्ले घेतले, एवढी लुटालूट केली, आपली जहागिरी सोडून स्वतःचं राज्य बनवु पाहतोय. आणि तुम्ही सगळे सरदार फक्त बघत बसता? उद्या कोणीही सरदार उठेल आणि आपलं राज्य बनवेल. हे अजिबात चालणार नाही. मला सांगा कोण शिवाजीचा बंदोबस्त करेल? समोर या, आणि हा विडा उचला.”

काही क्षण कोणीही समोर आले नाही. बेगम संतापली. 

“शरम वाटली पाहिजे तुम्हा सरदारांना. एकामध्येही हिम्मत नाही? आमची वतने आणि जहागिऱ्या काय फक्त ऐशो आराम करण्यासाठी घेतल्यात का? राज्याच्या शत्रूचा बंदोबस्त करायला एक जण पुढे येत नसेल तर काय उपयोग असल्या सरदारांचा?”

तेवढ्यात एका सरदाराचा बुलंद आवाज आला. “बेगम साहेब.” 

सगळे शांत होऊन आवाजाच्या दिशेने पहायला लागले. 

“बेगम साहेब, मी करेन बंदोबस्त शिवाजीचा.”

एक अति उंच धिप्पाड सरदार उठला आणि हत्तीसारखी मदमस्त पावले टाकत ऐटीत दरबाराच्या मध्यभागी आला. तो होता आदिलशाहीचा प्रसिद्ध, महापराक्रमी आणि अतिक्रूर सरदार, अफझलखान. त्याने आदिलशाह आणि बेगमच्या दिशेने कुर्निसात केला. 

“बेगम साहेब, फिकर नसावी. मी करेन शिवाजीचा बंदोबस्त.” त्याने विडा उचलला. “या अफझलखानासमोर आजवर कोणी टिकलं नाही, तो शिवाजी तर कल का बच्चा आहे. तो काय टिकणार. असा जातो आणि त्याला कैद करून तुमच्या समोर हजर करतो.” असे म्हणुन तो खदखदा हसायला लागला. त्याच्या त्या राक्षसी हास्याचा पहाडी आवाज दरबारात घुमायला लागला. 

बेगम आता खुश झाली. “वाह अफझलखान वाह. याला म्हणतात बहादुराचा बुलंद इरादा. अल्लाह आपको कामयाब करे.”

अफझलखानाला या मोहिमेसाठी मागेल तेवढे सैनिक, हत्ती, घोडे, उंट, हत्यारे आणि सर्व सामान मिळाले. पूर्ण लवाजम्यासहित अफझलखान विजापुराहून मोहिमेवर निघाला. 

या मोहिमेची बातमी शिवाजी महाराजांपर्यंत जाऊन पोहोचली. 

अफझलखान आपल्या क्रूरपणासाठी आणि दगाफ़टक्यासाठी प्रसिद्ध होता. त्याने आपल्या शत्रूंना धोक्याने मारले होते. शिवाजी महाराजांचे मोठे भाऊ संभाजी राजे देखील एका लढाईत अफझलखानाकडुनच मारले गेले होते. 

या मोहिमेमुळे स्वराज्यामध्ये भीतीचे वातावरण होते. सर्वजण महाराजांना अफझलखानाशी थेट लढाई न करण्याबद्दल विनवत होते. स्वराज्य अजुन नवीन आणि लहानच असल्यामुळे मराठ्यांचे सैन्यबळ खानाच्या फौजेइतके नव्हते. समोरासमोर लढाईमध्ये मराठा सैन्याचा टिकाव लागणे अवघड होते. शिवाजी महाराज प्रतापगडावर मुक्कामाला गेले. तिथे ते सुरक्षित होते. 

अफझलखानाने शिवाजी महाराजांना उकसावुन किल्ला सोडुन बाहेर येण्यास भाग पाडण्यासाठी विध्वंस सुरु केला. मंदिरे पाडली, रयतेला लुटले, गावोगावी अत्याचार सुरु केले. 

शिवाजी महाराजांना रयतेचा त्रास बघवत नव्हता, परंतु ते खानाच्या चाली ओळखुन होते. त्यांनी संयम राखुन थेट लढाई टाळली. 

अफझलखान प्रतापगडाजवळ असलेल्या वाईला येऊन पोहोचला. त्यानेसुद्धा लढाई न करता महाराजांना जिंकता येईल का या उद्देशाने आपल्या कृष्णाजी भास्कर नावाच्या वकिलाला महाराजांकडे पाठवले. 

वकिलासोबत “शिवाजी महाराजांनी माझ्यासोबत विजापूरला चलावे. बडी बेगमशी समेट करून सर्व गैरसमज दूर करून त्यांचे मांडलिक राजे म्हणुन आपले वतन सांभाळावे. माझे आणि शहाजीराजांचे (शिवाजी महाराजांचे वडील) जुने संबंध आहेत. त्यांनी निशंक होऊन माझ्यासोबत चलावे, मी त्यांना सुरक्षितपणे घेऊन जाईन.” अशा प्रकारचा प्रस्ताव पाठवला. 

या प्रस्तावावर कोणाचाच विश्वास नव्हता. अफझलखान भेटीमध्ये दगाफटका करून शिवाजी महाराजांना अपाय करेल अशी भीती सर्वांनीच बोलून दाखवली. या भेटीला शिवाजी महाराजांनी स्वतः जाऊ नये असे सर्वांनी सुचवले. महाराजांनी वाईला जायला नकार दिला. 

पण त्यांनी कृष्णाजी भास्करला एकांतात बोलवुन एक हिंदु माणुस म्हणुन साद घातली. कृष्णाजी भास्करने अफलझलखानाचे हिंदूंवर अत्याचार, देवळांचे विध्वंस पाहिले होते. त्याने खानाच्या मनात दगाफ़टकाच असल्याचे सूचित केले. 

महाराजांनी मग कृष्णाजी भास्करला परत अफझलखानाकडे पाठवले आणि सोबत आपले वकील म्हणुन गोपीनाथ पंतांना पाठवले. अफझलखानाला कृष्णाजी भास्कर शिवाजी महाराजांना घेऊनच येतील असे वाटले होते. पण सोबत फक्त शिवाजी महाराजांचे वकील आल्याचे पाहून तो नाराज झाला. 

वकिलांनी खानाला शिवाजी महाराज खानाच्या धाकात आहेत, त्यांच्या छावणीत त्यांना दगा होईल या संशयापायी ते यायला तयार झाले नाहीत. अफझलखानाने स्वतः प्रतापगडावर शिवाजी महाराजांची भेट घेऊन त्यांना आश्वस्त करावे आणि बोलणी करावी असे सुचवुन तयार केले. 

खानाची यथोचित बडदास्त राखली जाईल आणि सर्व व्यवस्था केली जाईल याची खात्री दिली. किल्ल्यांवरची सुरक्षा आणि बंदोबस्त माहित असल्यामुळे खानाने किल्ल्यावर भेटण्याऐवजी किल्ल्याच्या पायथ्याशी भेटण्याची तयारी दाखवली. 

मग प्रतापगडाच्या पायथ्याशी एक भव्य शामियाना उभारण्यात आला. आजूबाजूला सैनिकांसाठीही व्यवस्था करण्यात आली.

शिवाजी महाराजांनी आसपासच्या जंगलात आपले मराठी सैन्य विखरून ठेवले होते. ते सर्व वेळ येताच लढण्यासाठी दबा धरून बसले होते. 

इतकी व्यवस्था असली तरीही धोका प्रचंड होता. अफझल खान शिवाजी महाराजांच्या तुलनेत अति धिप्पाड होता. त्याचे शारीरिक बळ अफाट होते. आप्त स्वकीयांच्या मनात एक भीती होतीच. मातोश्री जिजाबाई चिंतीत होत्या. संभाजी राजे (शिवाजी राजांच्या मुलाचे नाव त्यांच्या दिवंगत मोठ्या भावावरून ठेवले होते.) अतिशय लहान होते. 

परंतु शिवाजी महाराज शांत होते. त्यांनी भेटीच्या दिवशी अंगावर आधी चिलखत चढवले आणि मग अंगरखा घातला. डोक्यावर आधी शिरस्त्राण घालुन मग जिरेटोप घातला. जवळ खंजीर आणि वाघनखेही ठेवली होती. 

महाराजांना धोक्याची कल्पना होती. पण अफझलखानाने रयतेवर केलेले अत्याचार त्यांच्या डोळ्यासमोर सलत होते. अफझलखानाकडून संभाजी राजे मारले गेले तेव्हा आपल्या माँसाहेब किती दुःखी झाल्या होत्या हे ते विसरले नव्हते. त्यांनी मनाशी खानाला संपवण्याचा निर्धार केला. 

निघण्याआधी पुन्हा सर्व मोहिमेची चर्चा झाली, सर्व सरदारांना त्यांच्या जबाबदाऱ्या सांगितल्या. आणि खबरदारी म्हणुन महाराजांनी आपल्याला काही झालेच तर स्वराज्य संपु नये म्हणुन “आम्हाला काही झाल्यास संभाजीराजांना आमच्या जागी मानावे, आणि माँसाहेबांच्या आज्ञेप्रमाणे स्वराज्य चालवावे” अशी आज्ञा सर्वांना दिली. 

हे ऐकून सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. शिवाजी महाराजांनी सर्वांना धीर दिला, आणि आपल्यासोबत भवानीमातेचे, माँसाहेबांचे आशीर्वाद आहेत. आपण यशस्वी होऊच, पण फक्त खबरदारी म्हणुन सांगून ठेवले असे सांगुन विश्वास दिला आणि ते निघाले. 

अफझलखान आपले हजार लोकांचे दल घेऊन आला होता. पण त्यांना भेटीच्या ठिकाणापासून काही अंतरावर थांबवण्यात आले. भेटीस फक्त शिवाजी महाराज, अफझल खान, दोघांचे वकील आणि अंगरक्षक एवढ्यानीच असावे असे ठरले. 

शिवाजी महाराजांसोबत जिवा महाला आणि येसाजी कंक हे अंगरक्षक होते. अफझलखानसोबत सय्यद बंडा हा खानसारखाच धिप्पाड आणि बलवान सैनिक आणि अजुन एक अंगरक्षक होता.

शामियान्यात गेल्यावर अफझलखानाने शिवाजी राजांना “आओ शिवाजी, गले मिलते है” असे म्हणुन गळाभेटीसाठी जवळ बोलावले. महाराज जवळ येताच अफझलखानाने त्यांना घट्ट मिठीत ओढले आणि खंजिराने वार केला. त्यांना घट्ट पकडुन मारून टाकण्याचा त्याचा बेत होता. 

शिवाजी महाराजांचा अंगरखा फाटला पण आपल्या आतल्या चिलखतामुळे ते वाचले. त्यांनी चपळतेने आपल्या खंजिराने खानावर वार केला, आणि वाघनखांनी त्याचे पोट फाडले. खानाच्या हातून खंजीर खाली पडला आणि तो वेदनेने ओरडला. 

सय्यद बंडा तात्काळ शिवाजी महाराजांवर चाळून गेला, पण जिवा महालाने मध्ये येत त्याचा हल्ला परतवला आणि त्याला मारून टाकले. या घटनेमुळे “होता जिवा म्हणुन वाचला शिवा” अशी म्हण मराठीत लोकप्रिय झाली. 

शिवाजी महाराजांनी खानाला संपवले आणि येसाजी आणि जिवा महालाने खानाच्या जवळच्या सैनिकांना मारले. एक तोफेचा इशारा झाला आणि जंगलात लपून बसलेल्या मराठी सैनिकांच्या तुकड्या खानाच्या गाफील राहिलेल्या सैन्यावर तुटून पडल्या. 

अचानक हल्ला झाल्यामुळे मोठे सैन्य असूनही त्यांची दाणादाण उडाली. मराठ्यांना प्रचंड संख्येने हत्ती, घोडे, तलवारी, तोफ, गोळे आयते त्या छावणीतुन मिळाले. मराठी सैन्याचे हे कमी संख्येने मोठ्या सैन्याला हरवण्याचे तंत्र गनिमी कावा म्हणुन प्रसिद्ध आहे. 

शिवाजी महाराजांचा अफझलखानावर विजय बाकी सर्वांसाठी अकल्पित होता. याच अफझलखानाच्या तावडीतुन एकदा औरंगजेबही मोठ्या मुश्किलीने सुटला होता. ह्या पराक्रमामुळे शिवरायांची कीर्ती आणि जरब सगळीकडे पोहोचली. ह्या घटनेवर पोवाडे रचले गेले. 

सिंहाने हत्तीवर केलेली मात या कल्पनेने लिहिलेले “केसरी गुहेसमीप मद्द हत्ती चालला” हे गीतही लोकप्रिय आहे. 

मोगलाई, आदिलशाही, निजामशाही, अशा अनेक मातब्बर शत्रूंची तमा न बाळगता महाराजांनी स्वराज्य उभे केले. आपल्यापेक्षा शरीराने प्रचंड, सैन्यानेही प्रबळ अशा शत्रुस अंगावर घेत गाजवलेल्या या पराक्रमातुन त्यांच्या धाडसाची कल्पना येते. 

लेखक: आकाश खोत

व्यवसाय एक (संगणक अभियंता) 
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )

माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा! 

वैयक्तिक ब्लॉगskyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल:  Thats My Take

प्रतिक्रिया व्यक्त करा