You are currently viewing चेतक

चेतक

महाराणा प्रताप हे राजस्थानातल्या मेवाडचे स्वाभिमानी राजपुत राजे होते. तेव्हाचा मुघल बादशाह अकबर साऱ्या भारतात आपले राज्य विस्तारू पाहत होता. 

त्याने राजस्थानातल्या सर्व राजांना आपले मंडलिक व्हावे नाही तर त्यांच्या राज्यावर आक्रमण होईल असा इशारा दिला होता. काही राजे मुघल सैन्याच्या प्रचंड शक्तीमुळे लढाई टाळण्यासाठी अकबराचे मंडलिक होत होते, त्याची मर्जी संपादन करण्यासाठी आपल्या मुलींचे लग्न त्याच्याशी करून जवळचे संबंध स्थापित करू पाहत होते. 

महाराणा प्रतापांनी मात्र अकबराच्या धमकीला साफ उडवुन लावत त्याचे मंडलिक बनायला नकार दिला. त्यामुळे अकबराने आपले सैन्य पाठवुन त्यांच्यावर हल्ला चढवला. मुघल सैन्याची संख्या महाराणा प्रतापांच्या सैन्याच्या चौपट होती. 

तरीही न डगमगता राजपूत सैन्याने हल्दीघाटी (खिंड) मध्ये मुघल सैन्याला निकराचा लढा दिला. त्यांनी त्या दिवशी असामान्य शौर्य गाजवले. संख्या कमी असूनही सुरुवातीला राजपुतांचीच सरशी होताना दिसत होती. 

हि लढाई ५-६ तास चालली. हळू हळु लढाईत मुघल सैन्याचे पारडे जाड व्हायला लागले. स्वतः महाराणा प्रताप गंभीर जखमी झाले. त्यांच्यासमोर सध्यापुरती माघार घेण्यावाचुन काही पर्याय राहिला नाही. 

महाराणा प्रताप त्यांच्या लाडक्या आणि रुबाबदार पांढऱ्याशुभ्र चेतक घोड्यावर स्वार होते. ह्या घोड्याचेही आपल्या मालकावर खुप प्रेम होते. महाराणा जखमी झाले आहेत आणि त्यांना तिथुन निघणे आवश्यक आहे हे चेतकच्याही लक्षात आले. 

चेतकने वाऱ्याच्या वेगाने पळायला सुरुवात केली. मुघल सैनिक त्यांच्या पाठलागावर होतेच. समोर खिंडीच्या तोंडाशी चेतकने स्वतःची मुळीच पर्वा न करता एकदम लांब उडी मारली आणि जवळपास २६ फूट पलीकडच्या डोंगरावर पोहोचला आणि कोसळला. 

पाठलाग करणारे सैनिक थबकले त्यांना एवढी उडी मारून पलीकडे जाणे शक्य नव्हते. 

त्या उडीमुळे चेतक जखमी झाला आणि त्याचे प्राण गेले. महाराणा प्रताप त्याचे हे बलिदान पाहुन भावुक झाले. त्यांच्या लाडक्या घोड्याने आज स्वतःचे प्राण देऊन आपल्या धन्याच्या प्राणांची रक्षा केली होती. 

महाराणा प्रताप स्वतः तिथुन निसटण्यात यशस्वी झाल्यामुळे त्यांच्या सैनिकांना हुरूप मिळाला आणि तेही निसटले. चेतक च्या बलिदानामुळे महाराणा प्रतापांना जिवंत राहुन आपला लढा चालु ठेवता आला. 

महाराणा प्रतापांचा भाऊ शक्तीसिंग आधी कौटुंबिक बेबनावामुळे मुघलांना जाऊन मिळाला होता. असे म्हणतात कि आपल्या भावासाठी एका घोड्याने जो त्याग करून दाखवला त्याने त्यांचे मन बदलले आणि ते पुन्हा आपल्या भावाला जाऊन मिळाले. 

महाराणा प्रतापांच्या बऱ्याच चित्र आणि पुतळ्यांमध्ये चेतक घोडा असतो. महाराष्ट्रातील औरंगाबाद शहरात एका चौकात चेतक घोड्याचा झेप घेतानाचा पुतळा आहे. काही दशकांपूर्वी बजाज कंपनीची चेतक नावाची स्कुटर फार 

लोकप्रिय होती. 

हल्दीघाटीची लढाई प्रत्यक्षात झाली होती, मात्र चेतक घोड्याची कथा हि एक प्रेरणादायी लोककथा असल्याचे म्हणतात. शेकडो वर्षांनंतर आजही हि कथा लोकांना प्रेरणा देते. 

लेखक: आकाश खोत

व्यवसाय एक (संगणक अभियंता) 
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )

माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा! 

वैयक्तिक ब्लॉगskyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल:  Thats My Take

प्रतिक्रिया व्यक्त करा