आटपाट नगर होतं. तिथं एक शेतकरी होता. त्याच्या शेतात नागाचं वारूळ होतं. श्रावणातील नागपंचमीचा दिवस होता.
शेतकरी शेत नांगरू लागला. नांगराचा फाळ वारुळाला लागला. नागाच्या पिलांना जखम झाली; त्यामुळं ती मरून गेली.
काही वेळानं नागीण आली. तिची पिलं शोधू लागली. बघते, तर वारूळ नाही. अन् पिलंही नाहीत. शेतात तिला नांगर दिसला. रक्तानं भरलेला फाळ दिसला. झालेला प्रकार तिच्या लक्षात आला. शेतकऱ्याच्या फाळाने आपला निर्वंश केला. आपणही त्याचा निर्वंश करायचा, असे तिने ठरविले.
संतापानं नागीण शेतकऱ्याच्या घरात शिरली. शेतकरी, त्याची बायको, मुलं, लेकी, सुना, घरात होती. सर्वांना तिनं दंश केला. शेतकऱ्याचा तिनं निर्वंश केला.
शेतकऱ्याची एक मुलगी परगावी होती. नागीण फारच संतापली होती. लगेच नागीण परगावी गेली. ती मुलीच्या घरी आली.
मुलगी नागपूजा करीत होती. पाटावर नाग-नागीण, नऊ नागकुळं काढली. मोठ्या श्रद्धेने लाह्या दुधाचा नैवेद्य दाखवीत होती. दूध पिऊन नागिणीची भूक भागली. सारं विसरून ती संतुष्ट झाली. खरं रूप घेऊन ती उभी राहिली. मुलीला म्हणाली, “तू कोण बाई ! तुझे आई-वडील कुठं आहेत?”
बाई म्हणाली, “मी आहे नागीण. घाबरू नकोस. नाही होत वाघीण.” झाला प्रकार तिने सांगितला. मुलीने तिला वसा मागितला. नागीण म्हणाली.
तुझ्या पूजेने मी खूष झाले. हत्येचा प्रकार विसरून गेले. आता तुला देतेय वसा. विसरू नको तू खासा. आजची आहे नागपंचमी. आज तळलेलं खाऊ नये अन् शेतजमीन खणू नये. भाज्या आज चिरू नयेत. तव्यावर काही शिजवू नये. अन् देतेय अमृताची कुपी. तुम्हा देईल संजीवनाची खुशी.”
मुलगी ती घेऊन लगेचच माहेरी आली. सर्वांच्या मुखांत तिनं अमृत घातलं. सर्व जिवंत झाली.
सर्वांना खूप आनंद झाला. घडलेली सर्व हकीगत तिनं वडिलांना सांगितली.
तेव्हा वडिलांनी विचारलं, ” हे व्रत कसं करावं ?”
मुलीनं व्रताचा विधी सगळ्यांना समजावून सांगितला. कितीही दुष्ट प्राणी असला आणि आपण जर त्याची आराधना केली, तर तो संतुष्ट होतो. तेव्हापासून शेतकरी नागपंचमी पाळू लागला.
जशी नागीण तिला प्रसन्न झाली, तशी तुम्हां-आम्हां होवो ही साठा उत्तणाची कहाणी पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण.