You are currently viewing वामन अवतार

वामन अवतार

एके काळी बळी नावाचा असुर राजा होता. हा भक्त प्रल्हाद याचा नातु होता. 

समुद्र मंथनात देव आणि असुरांनी मिळुन अनेक रत्ने बाहेर काढली, परंतु अमृत मात्र देवांनाच मिळाले. असुर अमर झाले तर आपल्या अत्याचाराने सर्वत्र हाहाकार माचवतील आणि त्यावर उपाय करता येणार नाही असा विचार करून भगवान विष्णूंनी मोहिनी रूप घेऊन अमृत फक्त देवांनाच दिले. 

यामुळे दैत्य आणि असुरांचे गुरु शुक्राचार्य नाराज झाले. असुरांवर अन्याय झाला अशी त्यांची भावना होती. त्यांनी घोर तपश्चर्या करून संजीवनी विद्या मिळवली. संजीवनी विद्या म्हणजे मेलेल्याला जिवंत करण्याची विद्या. अशी विद्या इतर कोणाकडे नव्हती. 

आपली विद्या त्यांनी बळी राजाच्या समर्थनासाठी वापरली. कुठल्याही युद्धात त्यांचे सैनिक किंवा स्वतः बळी जायबंदी झाले कि शुक्राचार्य आपली संजीवनी विद्या वापरत आणि असुरांचे बळ पूर्ववत होत असे. त्याच्या नेतृत्वाने आणि गुरु शुक्राचार्यांच्या मार्गदर्शनाने त्याच्या नेतृत्वाने असुर साम्राज्याने फार यश संपादन केले. पृथ्वीवर राज्य मिळवले, देवांना हरवुन स्वर्गावरसुद्धा राज्य मिळवले. 

हा बळी नीतिवान सुद्धा होता आणि धार्मिकही होता. त्याने आपल्या राज्यात मोठे यज्ञ सुरु केले. यातुन तो मोठा दानधर्म सुद्धा करीत असे. त्याच्या द्वारातुन कोणी याचक रिकाम्या हाती परत जात नाही अशी त्याची दानशूर राजा म्हणुन ख्याती होती. 

यज्ञ जेव्हा केला जातो तेव्हा तो देवतांना स्मरून त्यांना पुजून केला जातो. त्या यज्ञाचे यजमानाला पुण्य मिळते आणि त्यात पुजलेल्या देवतांना बळ मिळते असे म्हणतात. त्याने आणि शुक्राचार्याने या यज्ञाचे फळही देवांना मिळणार नाही अशी काळजी घेतली. 

स्वर्गातुन बाहेर झालेले देवराज इंद्र आणि समस्त देव भगवान विष्णूंकडे याचना करायला गेले. यज्ञाचे बळ नाही, बळीला मारता येत नाही कारण गुरु शुक्राचार्य त्याला परत जिवंत करू शकतात आणि १०० यज्ञ पूर्ण केले तर तो स्वतः इंद्रपदाला पोहचेल अशी भीती त्यांनी बोलुन दाखवली. 

भगवान विष्णूंनी इंद्राला पुन्हा स्वर्ग मिळवुन देण्यासाठी आणि स्थिती पूर्ववत करण्यासाठी अवतार घेण्याचे ठरवले. त्यांनी महर्षी कश्यप आणि त्यांची पत्नी अदिती हिच्या पोटी जन्म घेतला. 

त्यांचे हे रूप अतिशय लहानखुरे होते. त्यांची उंची अतिशय कमी होती. त्यामुळे वामन असे त्यांचे नामकरण झाले. काही वर्षात त्यांचे यज्ञोपवीत संस्कार झाले. त्यात अनेक महान ऋषी आणि देव उपस्थित होते. वामनाला महर्षी पुलहांनी यज्ञोपवीत घातले. अगस्त्य ऋषींनी मृगचर्म दिले. मरीची ऋषींनी पलाश दंड दिला. अंगिरस ऋषींनी वस्त्र दिले. सूर्यदेवाने डोक्यावर धरायला छत्र दिले. भृगु ऋषींनी खडावा, सरस्वती देवीने रुद्राक्षाची माळ दिली. गुरुदेवांनी कमंडलु दिला आणि कुबेराने भिक्षा पात्र दिले. वामनाच्या आईने कौपिन वस्त्र दिले. 

मग वामन यात्रेला निघाला. 

इकडे बळीराजाचा शंभरावा यज्ञ सुरु झाला होता. गुरु शुक्राचार्य आनंदात होते. दूरदूरन याचक यज्ञात अपेक्षेने आले होते. बळीराजा प्रत्येकाला जे मागेल ते देत होता, पुण्य अर्जन करत होता. याचकांचे समाधान करण्यात त्याने कुठलीच कमी सोडली नाही. त्याचा खजिना रिकामा झाला होता. 

तिथे वामन पोहोचला आणि राजासमोर याचना करायला उभा राहिला. वामनाचे गोड बालस्वरूप पाहुन सर्व स्तिमित झाले. 

बळीराजाने वामनाला पाहुन हात जोडले आणि म्हणाला “हे बटु, तुझ्या आधी आलेल्या याचकांच्या ईच्छा पूर्ण करता करता माझा भांडार रिकामे झाले आहे. क्षमा असावी पण आता माझ्याकडे देण्यासारखे धन शिल्लक राहिले नाही.”

वामन म्हणाला. “राजा, आधी मला काय हवे आहे ते तरी जाणुन घ्या. मग ठरवा, तुम्ही मला इच्छित दान देऊ शकता कि नाही.”

“ठीक आहे, सांग तुला काय हवे आहे?”

“मला फक्त तीन पावले जमीन हवी आहे.” 

सर्व जण हसायला लागले. 

“काय? तीन पावले जमीन? अरे जमीनच मागायची तर एखादं गाव, एखादं नगर तरी मागायचं? त्रिलोकावर ज्याचं राज्य आहे अशा राजाकडे येऊन फक्त तीन पावले जमीन?”

“मला तेवढी बस आहे महाराज. बोला देणार का तुम्ही मला?”

“अरे पण तू एवढुशी जमीन घेऊन करणार तरी काय?”

“महाराज, तुम्ही आधीच्या याचकांना विचारलेत का कि तुमचे दान घेऊन ते काय करणार? मग मला का विचारता?”

वामनाचे संभाषण चातुर्य बघुन राजाला कौतुक वाटत होते. परंतु शुक्राचार्यांना मात्र संशय यायला लागला होता. हे देवांचे षडयंत्र असल्याची त्यांना शंका आली. त्यांनी राजाला सावध करण्याचा प्रयत्न केला. 

“राजा, मला या बटूवर आणि त्याच्या विचित्र मागणीवर संशय येतोय, याच्याकडे लक्ष देऊ नका. चला आपण आपला यज्ञ पूर्ण करू.”

वामन लगेच म्हणाला “यज्ञात आलेल्या एका याचकाची साधी मागणी पूर्ण न करता तुमचा यज्ञ पूर्ण होईल असे वाटते का तुम्हाला महाराज?”

बळीराजाने आजवर सर्व याचकांची इच्छा पूर्ण केली होती. तो म्हणाला “नाही. गुरुदेव हा बटू म्हणतो ते बरोबर आहे, याचकाला असंतुष्ट सोडुन मी यज्ञ कसा पूर्ण करू?” 

वामन म्हणाला “मग घ्या ते जलपात्र आणि दानाचा संकल्प सोडा.”

बळीराजाने जलपात्र घेतले. शुक्राचार्यांची यात काही तरी षडयंत्र असल्याची खात्रीच पटली होती. त्यांनी बळी आपले ऐकणार नाही हे ओळखुन त्याच्या संकल्पात बाधा आणण्याचा प्रयत्न केला. ते सूक्ष्मरूपात त्या जलपत्राच्या पाणी ओतण्याच्या नळीत जाऊन बसले. त्यामुळे त्यातुन पाणी बाहेर येऊ शकत नव्हते. 

वामनाने हे ओळखले. त्याने बळीराजाला सुचवले “काही तरी अडकले असेल त्या पात्रात. एखादे दर्भ (काडी) घेऊन त्यात टाकुन बघा, पाण्याचा मार्ग मोकळा होईल.”

राजाने तसे केले आणि दुर्दैवाने ती काडी सूक्ष्मरूपात बसलेल्या शुक्राचार्यांच्या डोळ्यात गेली आणि त्यांचा एक डोळा निकामी झाला. अतिशय संतप्त होऊन ते बाहेर आले आणि राजावर रागावून निघुन गेले. 

या प्रसंगावरून “झारीतले शुक्राचार्य” हि म्हण पडली. जे दुसऱ्याच्या संकल्पात अडथळे आणतात त्यांना उद्देशुन “झारीतले शुक्राचार्य” असे म्हटले जाते.

बळीराजाने वामनाला वचन दिले होते त्यामुळे त्याने संकल्प सोडला आणि वामनाला त्याच्या राज्यात कुठेही तीन पावले जमीन घेण्याची परवानगी दिली. 

आता वामनाने एक चमत्कार केला. आपला आकार वाढवत नेत महाकाय रूप धारण केले. मग एक पाय पृथ्वीवर आणि दुसरा पाय स्वर्गात ठेवुन दोन पावले घेतली. आणि मग बळीला विचारले “आता तिसरे पाऊल कुठे ठेवु?”

आता बळीला प्रश्न पडला. त्याने ओळखले कि स्वतः भगवान विष्णूच त्याच्या दारी याचक म्हणुन आले आहेत आणि आपली परीक्षा पाहत आहेत. तो देवासमोर खाली बसला आणि म्हणाला “तिसरे पाऊल माझ्या मस्तकावर ठेवा भगवन”. त्याने स्वतःला देवाला समर्पित करून टाकले. 

वामनाने तिसरे पाऊल राजाच्या डोक्यावर ठेवले. बळीराजाची समर्पण वृत्ती, वचनबद्धता, दानशूरता या सगळ्यामुळे ते प्रसन्न झाले. 

भगवान विष्णूंनी आपल्या पावलांनी पृथ्वी आणि स्वर्ग पुन्हा अंकित केला होता. त्यांनी पृथ्वी मानवांना आणि स्वर्ग देवांना पुन्हा देऊन टाकला. आणि बळीराजाला त्याच्या कृत्याचे बक्षीस म्हणुन पाताळात पाठवुन त्याला तिथे अनंतकाळ राज्य करण्याचा आशीर्वाद दिला, वर स्वतः त्याच्या इच्छेखातर त्याच्या राज्याचे द्वारपाल होण्यास तयार झाले. 

असे म्हणतात कि बळीराजाचे आपल्या प्रजेवर आणि प्रजेचे राजावर खुप प्रेम होते. त्यामुळे विष्णूंनी बळीराजाला दरवर्षी एकदा आपल्या प्रजेला भेटायला यायची परवानगी दिली. 

केरळमधले महाबलीपुरम हे शहर बळीराजाची राजधानी समजली जाते. आणि ओणम या सणाच्या वेळेस तो प्रजेला भेटायला येतो असे समजतात. त्यामुळे त्याच्या सन्मानार्थ हा सण साजरा होतो. 

बळी राजाला ज्यादिवशी वामनाने पाताळात पाठवले तो दिवस बळी प्रतिपदा या नावाने दिवाळीत साजरा होतो. 


यातलीच एक उपकथा अशी:

वामन जेव्हा बळीराजाकडे आले तेव्हा त्याचे गोजिरे बालस्वरूप पाहुन सर्वजण मोहित झाले होते. 

बळीराजाची मुलगी रत्नमाला हिला वामनाकडे बघुन “आपलाही असा मुलगा असायला हवा होता. तो माझे दूध पिऊन मोठा झाला असता.” असे मनात आले. 

वामनाने अंतर्मनाने हि इच्छा जाणुन त्याला मनातच तथास्तु म्हटले. 

काही वेळातच जेव्हा वामनाने आपला हेतू उघड करून बळीराजाला पाताळात पाठवले आणि स्वर्ग पृथ्वी काढुन घेतली, तेव्हा मात्र रत्नमालेला प्रचंड राग आला. रागाच्या भरात तिने विचार केला “अशा मुलाला तर मी विष दिले असते.”

वामनाने मनातल्या मनात त्यालाही तथास्तु म्हटले. 

तिच्या ह्या दोन्ही इच्छा पुढच्या एका जन्मात कृष्ण आणि पूतनेच्या रूपाने पूर्ण झाल्या. 

पुढे विष्णु कृष्ण अवतार घेऊन आले आणि रत्नमाला पुतना नावाची राक्षसीण म्हणुन जन्माला आली. 

कृष्ण लहान बाळ असताना कंसाच्या आज्ञेवरून पुतना एका सुंदर स्त्रीचे रूप घेऊन गोकुळात गेली आणि कृष्णाला आपले दूध पाजण्याचा बहाण्याने घेऊन विषारी दूध देण्याचा प्रयत्न केला. 

लेखक: आकाश खोत

व्यवसाय एक (संगणक अभियंता) 
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )

माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा! 

वैयक्तिक ब्लॉगskyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल:  Thats My Take

This Post Has One Comment

  1. Sharad

    छान ओघावतं निवेदन…. शुभेच्छा

प्रतिक्रिया व्यक्त करा