You are currently viewing डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

आपल्याकडे दरवर्षी ५ सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा होतो. आणि दरवर्षी आपण भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या सन्मानार्थ त्यांच्या जन्मदिवशी हा शिक्षक दिन साजरा होतो याची उजळणी करतो. 

त्यांनी भूषविलेल्या पदांपलीकडे आपल्याला त्यांची माहिती नसते. काही जण असा समज करून घेतात कि या पदावर पोहोचण्याआधी ते एखादे शिक्षक असतील म्हणुन असं केलं असेल. तसं पाहायला गेलं तर त्यांनी प्राध्यापक म्हणुन काम केलेलं आहेच, पण त्यांची ओळख मात्र एवढीच मर्यादित नाही. 

आज जरा त्यांच्याविषयी माहिती करून घेऊया. 

त्यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी तिरुत्तनी नावाच्या गावी एका तेलगु ब्राह्मण कुटुंबात झाला. सर्वपल्ली वीरस्वामी आणि सितम्मा हे त्यांचे आई वडील होते. त्यांचे मुळगाव सर्वपल्ली होते. 

दाक्षिणात्य लोकांमध्ये काही जण गावाचे नाव आपले आडनाव म्हणुन वापरतात. त्यापैकी काही जण आधी नाव आणि मग आडनाव अशा पद्धतीने वापरतात, तर काही जण आधी आडनाव आणि मग आपले नाव अशा पद्धतीने वापरतात. यांच्या कुटुंबात हि दुसरी पद्धत होती. म्हणून त्यांच्या वडिलांचे नाव सर्वपल्ली वीरस्वामी, त्यांचे नाव सर्वपल्ली राधाकृष्णन तर पुढे त्यांच्या मुलाचे नाव सर्वपल्ली गोपाळ असे होते. 

त्यांचे वडील एका जमीनदाराच्या कचेरीत साधारण नोकरीवर होते. घरी फारसा पैसे नव्हता. तरीही राधाकृष्णन प्रचंड हुशार असल्यामुळे त्यांनी शिष्यवृत्त्या मिळवत भरपूर शिक्षण घेतले (एम.ए. पर्यंत). तत्वज्ञान हा त्यांचा मुख्य विषय होता. 

तत्वज्ञानाकडे ते योगायोगानेच वळले. त्यांचा एक वयाने मोठा असलेला नातलग तत्वज्ञानात पदवी पास झाला तेव्हा त्यांची पुस्तके राधाकृष्णन यांना मिळाली. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे पुस्तके आयती मिळालीच होती तर त्याच वाटेवर तेही गेले. 

त्या काळात भारतावर ब्रिटिशांचे राज्य होते. सुरुवातीला इंग्रजी व्यापारी, मग सैनिक, मग राज्यकर्ते असे करत तेव्हा भारतात इंग्रजी तत्वज्ञ आणि अभ्यासकसुद्धा येऊ लागले होते. त्यांनी भारतातील संस्कृतीचा अभ्यास केला, इथली पुस्तके इंग्रजीत भाषांतरित केली आणि आपल्या अध्यात्माचा आणि तत्वज्ञानाचासुद्धा अभ्यास केला. 

त्या लोकांवर पाश्चात्य संस्कृती, ख्रिश्चन धर्म, तिथले विचार यांचा पगडा होता आणि त्याचा अहंगंड सुद्धा होता. त्यामुळे ते भारतीय तत्वज्ञानावर फक्त टीकाच करत असत. तेव्हाच्या शिक्षणसंस्था आणि अभ्यासक्रम हे ब्रिटिशांनीच चालवलेले असल्यामुळे त्यात शिकवले जाणारे तत्वज्ञान आणि सर्व विषय हे पाश्चात्यांच्या दृष्टिकोनातूनच असत. 

अशा प्रकारामुळे भारतीय विद्यार्थ्यांच्या मनावर पाश्चात्य प्रभावच पडत असे आणि आपल्या इथे काही चांगले नाही असा न्यूनगंड तयार होत असे. 

राधाकृष्णन यांना मात्र आपल्या संस्कृतीचा आणि धर्माचा अभिमान होता आणि त्याचे ज्ञानही होते. त्यामुळे जगाचा आपल्याप्रती असा दृष्टिकोन बघुन ते व्यथित होत असत. 

त्यांनी मग याच विषयावर काम सुरु केले. धर्माचा, अध्यात्माचा तुलनात्मक अभ्यास त्यांनी सुरु केला. म्हणजे वेगवेगळ्या धर्मांचा त्यातल्या शिकवणीचा अभ्यास करणे, त्याची पार्शवभूमी समजुन घेणे, एखादी गोष्ट त्या धर्मात एका विशिष्ट प्रकारे का आली असेल यावर तर्क करणे. 

त्यांनीच एकदा सांगितले आहे “विद्यार्थीदशेत मिशनरी संस्थांमध्ये ख्रिश्चन विचारवंतांकडुन जी हिंदु धर्म आणि तत्वज्ञानावर टीका चालवली होती त्याने मी दुखावलो होतो. स्वामी विवेकानंदांच्या कार्याचा माझ्यावर प्रभाव पडला होता, माझा अभिमान जागृत झाला होता. मग मला माझ्या धर्माचा अभ्यास करणे भागच पडले. त्यात काय अजूनही जिवंत आहे, काय मृतप्राय झाले आहे हे शोधुन काढण्याचा मी प्रयत्न केला.” 

मग त्यांनी हिंदू धर्माचा सखोल अभ्यास करून त्यावर पुस्तके लिहिली. चांगल्याला चांगले आणि वाईटाला वाईट म्हटले. आणि पाश्चात्य लोकांकडून होणाऱ्या एकांगी टिकेपासुन हिंदू संस्कृतीचा नेहमी बचाव केला. 

त्यांनी अनेक प्रतिष्ठित भारतीय आणि इंग्लंडमधील संस्थांमध्ये तत्वज्ञान विभागात प्राध्यापक म्हणुन काम केले. पुस्तके लिहिली, प्रसिद्ध नियतकालिकांमध्ये लेख लिहिले. त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांचा राजा जॉर्ज यांनी १९३१ मध्ये “सर” हि पदवी देऊन सन्मान केला. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर मात्र राधाकृष्णन यांनी हि पदवी वापरणे बंद केले आणि फक्त डॉक्टर (तत्वज्ञानातील) याच पदवीचा वापर केला. 

शैक्षणिक क्षेत्रानंतर ते राजकारणातसुद्धा उतरले. आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या संघटना आणि परिषदांमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. भारतीय आणि हिंदु संस्कृतीवर अधिकारवाणीने आणि अभिमानाने बोलणारा माणुस अशी त्यांची ओळख होती. 

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर सुरुवातीला त्यांनी रशियामधील भारताचे राजदूत म्हणुन देखील काम पाहिले. भारताचे संविधान १९५० मध्ये अस्तित्वात आल्यावर उपराष्ट्रपती हे पद निर्माण झाले आणि सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती बनले. 

पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद निवृत्त झाल्यावर १९६२ मध्ये ते भारताचे दुसरे राष्ट्रपती म्हणुन निवडले गेले. तेव्हा त्यांच्या निकटवर्तीयांना त्यांचा वाढदिवस मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याची इच्छा होती. 

तेव्हा राधाकृष्णन यांनी सांगितले कि फक्त माझा वाढदिवस साजरा करण्याऐवजी हा दिवस शिक्षक दिन म्हणुन साजरा करून सर्व शिक्षकांचा सन्मान केला तर तो मी माझाच सन्मान समजेन. स्वतः शैक्षणिक क्षेत्रात काम केले असल्यामुळे त्यांना या क्षेत्राचा प्रभाव, गरज, देशाला पुढे नेण्याच्या दृष्टीने याचे महत्व चांगले माहित होते. देशातील सर्वात हुशार व्यक्तींनी शिक्षक व्हावे असे त्यांना वाटे. 

त्यांच्या या इच्छेचा आदर राखत तेव्हापासून त्यांचा वाढदिवस ५ सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणुन साजरा होतो. 

या दिवशी अनेक शाळांमध्ये लहान मुलांना एक दिवसापुरते शिक्षक बनुन पाहायला सांगितले जाते. आपल्या किंवा आपल्यापेक्षा लहान वर्गात जाऊन एक विषय शिकवायचे आव्हान दिले जाते. मुले मग त्या विषयाची तयारी करून तो विषय आपल्या सहविद्यार्थ्यांना शिकवतात. त्यांना त्या दिवसापुरते शाळेचे वेळापत्रक कसे चालते, शिक्षकांचे काम कसे असते, त्यातील आव्हाने कशी असतात, इतक्या विद्यार्थ्यांना सांभाळणे, त्यांना समजेल अशा शब्दात विषय सांगणे, त्यांच्या शंका सोडवणे याचा अनुभव मिळतो. 

लेखक: आकाश खोत

व्यवसाय एक (संगणक अभियंता) 
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )

माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा! 

वैयक्तिक ब्लॉगskyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल:  Thats My Take

प्रतिक्रिया व्यक्त करा