You are currently viewing सिंह, कोल्हा आणि गाढवाचा मेंदु

सिंह, कोल्हा आणि गाढवाचा मेंदु

एका जंगलात तिथला राजा सिंह म्हातारा झाला होता. 

त्याचा सेवक कोल्हा त्याला मदत करत असे. 

एकदा सिंहली आजाराने ग्रासले. त्याला शिकार करणेही फार अवघड झाले. 

कोणी तरी त्याला सांगितले कि गाढवाचा मेंदू खाल्ला तर त्याला बरे वाटेल. 

त्याने कोल्ह्याला एखाद्या गाढवाला आपल्याकडे घेऊन यायला सांगितले. 

कोल्हा गाढवाच्या शोधात निघाला आणि त्याला एक गाढव सापडले. 

त्याने गाढवाची खुशामत केली, त्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवले आणि महाराजांनी विशेष भेटीसाठी तुला बोलावले आहे असे सांगुन सिंहाकडे नेले. 

गाढव जवळ आल्यावर सिंहाने त्याच्यावर झडप घालुन मारण्याचा प्रयत्न केला, पण सिंह अतिशय क्षीण झाल्यामुळे गाढव निसटुन पळाले. 

कोल्हा परत गाढवाकडे गेला. त्याला समजावले “अरे बाबा महाराजांनी तुझी गळाभेट घेण्याचा प्रयत्न केला, त्यांना तू आल्यामुळे आनंद झाला होता. आता सिंह असल्यामुळे त्यांचे पंजे तुला थोडे लागले असतील, पण वाईट वाटून घेऊ नकोस. चल परत. तुझी महाराजांची काही चर्चाही झाली नाही.” 

गाढव पुन्हा कोल्ह्यासोबत सिंहाकडे गेले. 

सिंहाने यावेळी मात्र गाढवाला मारून टाकले. 

सिंहाला शिकारीमुळे थकवा आला. तो थकुन बसला. 

कोल्ह्याने मनोमन विचार केला “हा म्हातारा सगळं काम माझ्याकडूनच करून घेतो. गाढवाला दोनदा इथे आणायला मला मेहनत करावी लागलो आणि आता मेहनतीचं फळ मात्र हाच खाणार. ते काही नाही, आता या गाढवाचा मेंदू मीच खाणार.”

कोल्हा सिंहाला म्हणाला “महाराज तुम्ही फार थकले आहात. तुम्ही त्या झाडाखाली निवांत झोप काढा. मी या गाढवाचा मेंदू सापडला कि तुम्हाला बोलावतो.”

सिंह कोल्ह्याने गाढवाला दोनदा आणल्यामुळे त्याच्यावर खुश होता, तो त्याचं ऐकून झाडाखाली गेला. 

इकडे कोल्ह्याने स्वतः गाढवाचा मेंदू खाऊन फस्त केला. आणि जाऊन सिंहाला म्हणाला, “महाराज, मला काही गाढवाचा मेंदु सापडलाच नाही. तसंही जो दोनदा इकडे यायला तयार झाला, त्या मुर्खाला कसा मेंदु असणार? कोणीतरी तुम्हाला भलताच उपाय सांगितलेला दिसतोय. ते जाऊ द्या, तुम्ही आता गाढवाचे भोजन करा.” 

सिंहाला ते पटले आणि तो शांतपणे गाढवाकडे गेला. कोल्हाही स्वतःवर खुश होत उरलेल्या गाढवावर ताव मारायला निघाला. 

लेखक: आकाश खोत

व्यवसाय एक (संगणक अभियंता) 
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )

माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा! 

वैयक्तिक ब्लॉगskyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल:  Thats My Take

This Post Has One Comment

प्रतिक्रिया व्यक्त करा