You are currently viewing गौतम बुद्ध

गौतम बुद्ध

आज जगभरातल्या अनेक देशांमध्ये बुद्ध धर्माचे अनुयायी आहेत. या बुद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध होते. ते जवळपास अडीच हजार वर्षांपूवी म्हणजेच इसवीसनापूर्वी होऊन गेले. त्यांच्या नेमक्या कालखंडाबद्दल वेगवेगळे मतप्रवाह आहेत. 

ते मुळात एक राजपुत्र होते. राजा शुद्धोदन आणि राणी मायावती यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. त्यांचे नाव आधी सिद्धार्थ गौतम असे होते. 

राजाच्या घरी जन्म झालेला असल्यामुळे त्यांचे आयुष्य अगदी सुखाचे होते. गरिबी, रोगराई, दुःखे यांच्याशी त्यांचा परिचयच नव्हता. एके दिवशी शहरात फेरफटका मारत असताना त्यांनी आपल्या जनतेत काही अत्यंत दुःखी माणसे पाहिली. त्यांचे मन संवेदनशील होते. इतर माणसांचे दुःख पाहुन त्यांनाही दुःख झाले. 

त्यानंतर त्यांचे मन राजवाड्यात रमत नव्हते. त्यांनी या दुःखाचे मुळ आणि त्यावर मार्ग शोधायचे ठरवले. आतापर्यंत त्यांचे यशोधरेशी लग्न झाले होते आणि राहुल नावाचा मुलगासुद्धा होता. पण त्यांनी संन्यास घ्यायचे ठरवले आणि राजवाडा सोडुन निघाले. 

मग त्यांनी तपश्चर्या केली, तत्वज्ञानाचा अभ्यास केला. कठोर व्रते करून पाहिली, पण त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. मग त्यांनी ध्यान करून पाहायचे ठरवले. एका पिंपळ वृक्षाखाली बसुन त्यांनी दीर्घ काळ ध्यान केले. आणि शेवटी एका वैशाख पौर्णिमेच्या दिवशी त्यांना जगाचा बोध झाला. म्हणजेच साक्षात्कार झाला किंवा ज्ञान प्राप्त झाले. 

यानंतर त्यांना बुद्ध म्हणायला लागले. बुद्ध म्हणजे ज्याला बोध झाला आहे, ज्याने ज्ञान प्राप्त केले आहे असा व्यक्ती. जग त्यांना गौतम बुद्ध या नावाने ओळखायला लागले. या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा म्हणुन साजरी करतात. ज्या वृक्षाखाली ते बसले त्याला बोधिवृक्ष म्हणतात. आणि ती जागा गया या गावात होती त्या गावालाही आता बोधगया म्हणतात. 

बुद्धांनी उरलेले आयुष्य आपल्याला मिळालेले ज्ञान दुसऱ्यांना शिकवण्यात व्यतीत केले. त्यांना अनेक शिष्य मिळाले, अनुयायी मिळाले. त्यांनी शिकवलेल्या मार्गालाच बुद्ध धर्म म्हणतात. त्यांच्या काळात त्यांनी आजच्या उत्तर प्रदेश, बिहार, नेपाळ ह्या भागांमध्ये प्रवास करत सगळीकडे आपले ज्ञान शिकवले. त्यांच्या शिष्यांमध्ये राजापासुन सामान्य माणसापर्यंत सर्वजण होते. 

त्यांचा जातिभेदाला विरोध होता. तेव्हाच्या समाजात वर्णव्यवस्था पाळली जात होती, धर्माच्या नावाने कर्मकांडावरच जास्त भर होता. बुद्धांनी यावर टीका केली. त्यांच्या मते ज्ञान न मिळवता फक्त कर्मकांडे केल्याने काही उद्धार होत नाही. 

त्यांची शिकवण अशी होती कि जगात सर्वत्र दुःख आहे आणि त्याचे मुख्य कारण म्हणजे तृष्णा. म्हणजेच काहीतरी मिळवत राहण्याची इच्छा. हि इच्छा पूर्ण झाली नाही कि आपल्याला दुःख होते. आपण ह्यामुळेच जन्म मृत्यू आणि पुनर्जन्म या साखळीत अडकतो. यापासुन मुक्ती म्हणजे मोक्ष किंवा निर्वाण हवे असेल तर या इच्छेवर विजय मिळवायला हवा. 

त्यासाठी त्यांनी संसारात गुंतुन राहणे हे एक टोक आणि कठोर संन्यास घेऊन संसाराचा त्याग हे दुसरे टोक ह्यातला मध्यम मार्ग सांगितला. त्यालाच अष्टांग मार्ग असेही म्हणतात. ज्ञानप्राप्ती, चांगली कर्मे, मृदू भाषा, चांगले आचरण, प्रामाणिकपणे चरितार्थ चालवणे, प्रयत्न, चांगले विचार आणि मनाची शांती राखणे असा तो मार्ग आहे. 

गौतम बुद्ध एक महान गुरु आणि तत्वज्ञ होते. हिंदुधर्मीय त्यांना विष्णूचा नऊवा अवतार मानतात. विष्णूच्या इतर अवतारांपेक्षा याचे एक वेगळेपण आहे. आधीचे अवतार हे एखादा प्रलयातून माणसांना वाचवण्यासाठी किंवा दुष्ट असुरांचा नाश करण्यासाठी झाले होते. बुद्धांनी कुठल्याही बाहेरच्या असुराचा नाही तर स्वतःच्याच आयुष्यातल्या दुःखावर मत करण्याचा मार्ग लोकांना दाखवला.

बुद्धांच्या नंतरही त्यांच्या शिष्यांनी त्यांची शिकवण जिवंत ठेवली आणि इतरत्र त्याचा प्रसार केला. पुढे सम्राट अशोकसारखे बलाढ्य राजेसुद्धा बुद्ध धर्माचे अनुयायी बनले. भारताबाहेर इतर देशांमध्येही हा धर्म पसरला. 

लेखक: आकाश खोत

व्यवसाय एक (संगणक अभियंता) 
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )

माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा! 

वैयक्तिक ब्लॉगskyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल:  Thats My Take

प्रतिक्रिया व्यक्त करा