You are currently viewing गुरु पौर्णिमा

गुरु पौर्णिमा

आषाढ महिन्यातल्या शुद्ध पौर्णिमेला गुरु पौर्णिमा म्हणुन साजरे केले जाते. आपल्या संस्कृतीत गुरुचे महत्व अनन्यसाधारण आहे. आपल्याला जे काही मिळतं त्याबद्दल कृतज्ञ असावं हा आपल्याला सतत दिली जाणारी शिकवण आहे. त्यामुळेच दिवसा प्रकाश आणि उष्णता देणारा सूर्य, रात्री प्रकाश आणि शीतलता देणारा चंद्र, पाणी देणाऱ्या नद्या आणि समुद्र, राहायला जागा देणारी भूमी अशा अनेक गोष्टींना आपण पुजतो. मग आपल्याला ज्ञान देणाऱ्या गुरूंना आपण कसं विसरणार? 

आपण जन्माला येतो तेव्हा आपल्याला कसलंही ज्ञान नसतं. शक्ती असते, प्रतिभा असते पण ती वापरायची कशी हे माहित नसतं. आपल्याला मुलभूत गोष्टी आणि कसबे शिकवणारे आई बाबा हे आपले पहिले गुरु असतात. त्यानंतर आपण अनेक गुरूंकडून सतत काहीतरी शिकत राहतो. 

पूर्वीच्या काळी गुरु-शिष्य परंपरा होती. म्हणजे मुल जरा मोठं झालं कि त्याला गुरूच्या आश्रमात शिकायला पाठवुन द्यायचे. पुढचं सगळं शिक्षण आणि ज्ञान त्या गुरूकडून मिळायचं. शिक्षण पुर्ण झाल्यावर गुरूने परवानगी दिल्यावरच शिष्य आपल्या आयुष्यात पुढच्या मार्गाला लागायचा. आपल्या गुरूबद्दल कृतज्ञता म्हणुन त्यांना काही गुरु दक्षिणा देण्याची पद्धत होती. 

संगीत, नृत्य अशा काही कलाप्रकारात आजही हि परंपरा जिवंत आहे. बाकी बहुतांश क्षेत्रात हि आश्रम पद्धती मागे पडुन शाळा, कॉलेज आले आहेत. तिथल्या गुरूंकडून आता आपल्याला ज्ञान मिळतं. 

आपल्याला आयुष्यात जगण्यासाठी, कमावण्यासाठी, प्रगल्भ होण्यासाठी, उद्धार होण्यासाठी गुरुचं मार्गदर्शन आवश्यक असतं. संस्कृत मध्ये गुरु ह्या शब्दाची फोड केली तर गु या शब्दाचा अर्थ अंधार आणि रु म्हणजे तो दूर करणारा. अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानरूपी प्रकाश देणारा व्यक्ती म्हणजे गुरु. 

जगात असंख्य गोष्टी आहेत, असंख्य विचारधारा आहेत, जगण्याचे असंख्य मार्ग आहेत. माणुस यात गोंधळू शकतो. म्हणून त्याला मार्गदर्शन आवश्यक असतं. प्रत्यक्ष देवाने रामाचे, कृष्णाचे अवतार घेतले तेव्हा त्यांनी स्वतः देव असूनही गुरूच्या मार्गदर्शनाखाली अध्ययन केलं होतं. राम लक्ष्मण आणि त्यांचे भाऊ वसिष्ठ आणि विश्वामित्रांकडून शिकले. कृष्ण बलराम सांदिपनीकडे शिकले. 

पत्रकार बरखा दत्त हिने सद्गुरु या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जग्गी वासुदेव यांना एक प्रश्न केला होता कि आजकाल इतकं सगळं ज्ञान सहज उपलब्ध असताना गुरुची गरजच काय? तेव्हा सद्गुरूंनी छान उत्तर दिलं होतं. तुम्ही जेव्हा नव्या शहरात जाता, किंवा नव्या ठिकाणी जाता तेव्हा आजकाल तुम्ही GPS वापरता कि नाही? ते न वापरता तुम्ही थांबत थांबत इकडे तिकडे वळत, चार लोकांना विचारत जाऊ शकता. पण GPS मुळे हेच सोपं होतं. गुरु म्हणजे सुद्धा GPS च आहे. त्याला मी गुरु पोझिशनिंग सिस्टम म्हणतो. जेव्हा आपण अनोळखी क्षेत्रात वावरतो तेव्हा एक चांगला गुरु आपल्याला बरोबर मार्ग दाखवुन आपलं काम सोपं करू शकतो. 

अध्यात्मात सुद्धा देव सगळी सृष्टी नियंत्रित करत असला तरी देवाची ओळख आपल्याला गुरु करून देतो म्हणुन गुरूला देवासारखंच मानलं आहे. गुरूला गुरुदेव म्हणुन संबोधायची आधी पद्धत होती. खालील श्लोक आपल्या सर्वांनाच माहित असतो. 

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा।

गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः।।

या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, त्यांना पुजण्यासाठी गुरु पौर्णिमा हा सण आहे. आपण जसे शुभकार्य करण्यासाठी चांगला दिवस, शुभमुहूर्त बघतो तसंच नियती सुद्धा असे पवित्र दिवस निवडून त्या दिवशी महत्वाच्या घटना घडवते आणि त्या दिवसाचं महत्व, पावित्र्य वाढवत राहते. 

गुरु पौर्णिमा हा दिवस हिंदू, जैन, बौद्ध सर्वांसाठी महत्वाचा आहे. भारत, नेपाळ, भूतान अशा ठिकाणी तो या तिन्ही धर्माचे लोक साजरा करतात. 

जगातले आदियोगी (पहिले योगी) आणि आदिगुरू (पहिले गुरु) यांनी सात मनुष्यांना योगविद्या शिकवुन मनुष्यांसाठी योगसाधनेद्वारे आपला उद्धार करण्याचा मार्ग खुला केला. ह्या सातजणांना सप्तर्षी म्हणुन ओळखतात. त्यांनी मग योगविद्या इतर मनुष्यांना शिकवली, आणि गुरु शिष्यांच्या साखळीद्वारे आजही हि विद्या जिवंत आहे. 

भारतात होऊन गेलेल्या महान ऋषींपैकी सर्वश्रेष्ठ आणि गुरूंचे गुरु मानल्या गेलेल्या व्यास यांचा जन्म याच दिवशी झाला. त्यामुळे या दिवसाला व्यास पौर्णिमा म्हणूनही साजरी करतात. 

जैन धर्माचे २४वे तीर्थंकर वर्धमान महावीर यांनी याच दिवशी इंद्रभुती गौतम याला आपले शिष्य बनवले. तोच त्यांचा प्रमुख शिष्य होता. 

गौतम बुद्धांनी ज्ञानप्राप्ती नंतर आपले पहिले प्रवचन सारनाथ या ठिकाणी गुरु पोर्णिमेच्याच दिवशी दिले. त्यामुळे याच दिवसापासुन त्यांनी आपल्या विचारांचे अध्यापन सुरु केले आणि लोक त्यांचे शिष्य बनले. 

अशा अनेक महान गुरूंशी हा दिवस निगडित आहे. या दिवशी लोक आपल्या गुरूंचे स्मरण करून त्यांना वंदन करतात. त्यांच्याकडून मिळालेल्या ज्ञान, मार्गदर्शनाबद्दल त्यांचे आभार मानतात. 

लेखक: आकाश खोत

व्यवसाय एक (संगणक अभियंता) 
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )

माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा! 

वैयक्तिक ब्लॉगskyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल:  Thats My Take

This Post Has One Comment

  1. Anuja

    Aaj saptarshin babat kalaala!!

प्रतिक्रिया व्यक्त करा