श्री गणेशदेवा, तुमची कहाणी ऐका.
निर्मळ मळे, उदकांचे तळे, वेल वृक्ष, सुवर्णाची कमळे, विनायकाची देवळे-रावळे, मनाचा गणेश मनी वसावा.
हा वसा कधी घ्यायचा?
श्रावणाच्या चौथी घ्यावा आणि माही चवथी पूर्ण करावा.
संपूर्णाला काय करावे?
पशा पायलीचे पीठ कांडावे, त्याचे अठरा लाडू करून त्यांतील सहा देवाला, सहा ब्राह्मणाला द्यावेत आणि उरलेल्या सहा लाडवांचे आपल्या कुटुंबासह भोजन करावे.
अल्पदान, महापुण्य अशा ह्या गणेशाचे मनात ध्यान करावे. त्यास मनात पाहावे.
त्यामुळे आपण चिंतिलेल्या गोष्टी लाभतात. मनोकामना पूर्ण होते. सर्व कार्ये निर्विघ्नपणे पार पडतात.
ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफल संपूर्ण.