You are currently viewing संन्याशाचा संसार

संन्याशाचा संसार

निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपान आणि मुक्ताबाई ह्या चारही सख्ख्या भावंडांना संत म्हणुन आदराने पूजतात. जेव्हा एखाद्या घरात चार चार संत जन्माला येतात, त्या कुटुंबाची गोष्टसुद्धा जगावेगळी आणि विलक्षणच असणार. 

मराठवाड्यात पैठण ह्या महत्वाच्या गावाजवळ आपेगाव हे छोटे गाव होते. ह्या गावात कुलकर्णी म्हणजे गावाच्या शेतसाऱ्याच्या नोंदी आणि हिशोब ठेवणारे कुटुंब होते. त्या घरात विठ्ठलपंत कुलकर्णी यांचा जन्म झाला. ते मोठे विद्वान आणि देवधर्माची विशेष आवड असलेले होते. 

त्यांचे लग्न पुण्याजवळच्या आळंदी गावचे कुलकर्णी सिद्धोपंत यांच्या मुलीशी, म्हणजे रुक्मिणीशी झाला. रुक्मिणीलाच रखुमाई असेही म्हणतात. लग्न झाल्यावर पण विठ्ठलपंतांचे संसारात फारसे मन रमत नव्हते. काही दिवसांनी त्यांचे आई वडील वारले आणि ते फार दुःखी झाले. 

रुक्मिणीच्या वडिलांनी त्या दोघांना आळंदीला नेले. तिथेही त्यांचे मन रमत नव्हते. त्यांना आता संसारात अजिबात रस उरला नव्हता. संन्यास घ्यावा, तीर्थयात्रा करावी, ज्ञान संपादन करावे अशी त्यांची फार इच्छा होती. कोणी लग्न होण्याआधीच असा निर्णय घेतला तर गोष्ट वेगळी पण लग्न लागल्यावर संसार सोडुन असे करणे फार अवघड असते. 

एका दिवशी अचानक विठ्ठलपंत घरातुन काही न सांगता निघुन गेले. संन्यास स्वीकारला आणि जागोजागी फिरत फिरत यात्रा करत ते उत्तर भारतात गेले. काशीमध्ये रामानंद स्वामींच्या आश्रमात त्यांनी अध्ययन सुरु केले. त्यांनी आपल्या आधीच्या आयुष्याबद्दल कोणाला सांगितले नव्हते. 

इकडे नवरा अचानक घर सोडुन गेल्यामुळे रुक्मिणीबाई आणि कुटुंबीय परेशान झाले. गावभर विठ्ठलपंतांचा काही पत्ता नव्हता. शोधावे कुठे? त्यांना काय करावे काही कळत नव्हते. रुक्मिणीबाई फार दुःखी झाल्या. नवरा सुखरूप असावा, परत यावा म्हणुन त्यांची प्रार्थना, व्रतवैकल्ये सुरु होती. 

एक दिवस त्यांच्या गावात एक स्वामी आले. ते स्वामी फार तेजस्वी होते. गावकऱ्यांनी त्यांचा आदरसत्कार केला. गावातले लोक त्यांचे दर्शन घ्यायला, आशीर्वाद घ्यायला येऊ लागले. रुक्मिणीबाईसुद्धा गेल्या. त्यांनी स्वामींच्या पाया पडुन नमस्कार केल्यावर, स्वामींनी सहसा लग्न झालेल्या स्त्रियांना देतात तो सुपुत्रा भव म्हणजे चांगली मुले व्हावीत असा आशीर्वाद दिला. 

तो आशीर्वाद ऐकुन रुक्मिणीबाईंना भरून आले. त्या रडायला लागल्या. आशीर्वाद दिल्यावर रडू फुटलेले पाहुन स्वामी आश्चर्यचकित झाले. त्यांनी विचारले “मुली, काय झाले तुला? का रडतेस?”

रुक्मिणीबाई म्हणाल्या “स्वामी, माझे लग्न तर झाले आहे, पण नवरा मला सोडुन गेला आहे. मग तुमचा आशीर्वाद कसा खरा होईल?”

स्वामींना त्यांची गोष्ट ऐकुन वाईट वाटले. योगायोगाने हे स्वामी म्हणजेच विठ्ठलपंत काशीमध्ये ज्यांच्या आश्रमात त्यांचे शिष्य बनले होते तेच रामानंद महाराज. ते यात्रेवर निघाले होते. रुक्मिणीबाईंची गोष्ट, विठ्ठलपंतांबद्दल अजुन ऐकल्यावर त्यांना आपल्या आश्रमात असलेला विठ्ठल म्हणजेच रुक्मिणीचा नवरा असावा असे वाटले. 

त्यांनी रुक्मिणी आणि तिच्या आई वडिलांना सोबत काशीला आपल्या आश्रमात नेले. विठ्ठलपंतांची ओळख पटली. स्वामींनी आपल्या शिष्याला समजावले. पुन्हा संसार करण्याचा आदेश दिला. विठ्ठलपंतांनी गुरूचा आदेश मानला. रुक्मिणीबाई आणि कुटुंबियांसोबत ते पुन्हा आळंदीत आले. 

पण इथुन पुढे एक वेगळीच खडतर आणि प्रदीर्घ परीक्षा त्यांची वाट बघत होती. 

लोकांनी संन्यास घेऊन काशीला, हिमालयात जाणाऱ्यांची उदाहरणे पाहिली होती. संन्यास घेणे पवित्र आणि पुण्यकार्य मानले जात असे. पण घेतलेला संन्यास सोडुन पुन्हा संसार करणारे कोणीही पाहिले नव्हते. त्यांना ते पाप वाटले. 

त्यांनी विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाईंच्या संसाराला स्वीकारले नाही. वाळीत टाकले. 

आपल्या आतापर्यंतच्या निर्णयांचा हा परिणाम आहे असे समजून त्यांनी सर्व सहन केले. त्यांना गावाबाहेर स्मशानाजवळ सिद्ध बेटावर झोपडी बांधून राहावे लागले. 

काही वर्षात त्यांना तीन मुले आणि एक सर्वात धाकटी मुलगी झाली. चारही बाळे अत्यंत तेजस्वी आणि हुशार होती. त्यांनी त्यांची नावे फार सुंदर ठेवली. निवृत्ती, ज्ञानेश्वर (ज्ञानदेव), सोपान आणि मुक्ता. 

असे म्हणतात कि ह्या नावांच्या ह्या क्रमाने ठेवण्यात पण एक तात्विक अर्थ आहे. 

निवृत्ती म्हणजे एखादी गोष्ट सोडणे, किंवा त्यातुन बाहेर येणे. जसे लोक नोकरीतुन निवृत्त होतात. तसे संसारातुन किंवा मोहातुन निवृत्त झाले तर खरे ज्ञान मिळते. सोपान म्हणजे जिना. ज्ञान हाच उद्धार करून घेण्याचा मार्ग आहे. ज्ञान मिळवत एक एक पायरी म्हणजे सोपान चढुन वर गेले कि आपल्याला मुक्ती मिळते, म्हणजे मोक्ष मिळतो. 

ह्या भावंडांनी पुढे जाऊन पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीची अनन्यसाधारण भक्ती केली. त्यांच्या आईवडिलांचे नाव तेच असणे हा सुद्धा एक दिव्य योगायोग.  

ह्या चारही मुलांचे आयुष्य विलक्षण घटनांनी भरलेले होते. त्याबद्दल जाणुन घेऊया पुढच्या गोष्टींमध्ये. 

लेखक: आकाश खोत

व्यवसाय एक (संगणक अभियंता) 
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )

माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा! 

वैयक्तिक ब्लॉगskyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल:  Thats My Take

This Post Has 2 Comments

Ishwari साठी प्रतिक्रिया लिहा उत्तर रद्द करा.