You are currently viewing संगीताची जादु

संगीताची जादु

कोणे एके काळी एका गावात उंदरांचा फार सुळसुळाट झाला होता. जिथे बघावे तिथे लहान मोठे उंदीर दिसायचे. हे उंदीर फार नासाडी करायचे. शेतातील पिके, घरात, दुकानात साठवलेले धान्य फस्त करून टाकायचे. कपाटातले कपडे कुरतडून टाकायचे. गावातल्या लोकांचं खुप नुकसान झालं आणि चालुच होतं. लवकरच तिथे दुष्काळ वाटावा इतकी भयंकर परिस्थिती ओढवली असती. 

इतक्या मोठ्या संख्येने उंदीर झाल्यामुळे त्यांचा बंदोबस्त कसा करावा हेही त्या गावच्या पंचायतीला समजत नव्हते. 

एक दिवस एक रंगीबिरंगी कपडे घातलेला पावा वाजवणारा माणुस त्या गावात आला. त्याने गावाच्या पंचायतीला मी उंदरांना नाहीसे करीन असे आश्वासन दिले. आणि त्या बदल्यात हजार सुवर्णमुद्रांची मागणी केली. 

गावातल्या लोकांना त्याचे चित्रविचित्र रंगीत कपडे पाहुन तो उंदरांना नाहीसे करेल यावर विश्वास बसत नव्हता. पण त्यांचे बाकी उपाय काही चालले नव्हते त्यामुळे त्या माणसाला एक संधी द्यायला काय हरकत आहे असे वाटुन त्यांनी होकार दिला. 

दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी तो माणुस आपल्या पाव्यावर एक खुपच आकर्षक धुन वाजवत गावातुन फिरायला लागला. आणि आश्चर्य!! तो गावातल्या रस्त्यांवरुन, गल्ल्यांमधुन पावा वाजवत जायला लागला तसे प्रत्येक घरातुन उंदीर बाहेर पाडून त्याच्या मागे तो फिरेल तिकडे जायला लागले. 

त्याच्या मागे उंदरांची रांगच लागली. गावातले सर्व लोक आश्चर्यचकित होऊन हि अनोखी मिरवणुक पाहायला लागले. 

गावातल्या सगळ्या रस्त्यांवरून फिरून झाल्यावर तो माणुस गावाच्या बाहेर निघाला आणि नदी किनारी गेला. त्याने नदीत प्रवेश केला तसे सगळे उंदीर त्याच्या मागे नदीत गेले आणि पाण्यात बुडाले. 

तो गावात परत आला. सर्वांनी टाळ्या वाजवुन त्याचं कौतुक केलं. त्याने सर्वांना अभिवादन केलं आणि गावच्या पंचांसमोर जाऊन आपल्या ठरलेल्या पैशांची मागणी केली. आता गावातले सगळे उंदीर मरून गेले होते, त्यामुळे पंचांच्या मनात याला इतके पैसे द्यायची काय गरज असा विचार आला. त्याला पैसे कमी दिले तरी उंदीर परत थोडीच येणार होते… 

त्यांनी फक्त १०० सुवर्णमुद्रा त्या माणसाला दिल्या. तो माणुस त्यांच्याशी चिडुन भांडला पण काही उपयोग झाला नाही. 

ते म्हणाले “तु तर फक्त पावा वाजवलास, तेवढ्यासाठी कोणी १००० मुद्रा घेत असतं का? आम्ही एवढेच देऊ शकतो.”

तो माणुस नाराज होऊन निघुन गेला आणि सगळे उंदीर गेल्याच्या आनंदात आपापल्या कामाला लागले. दुपारी सर्व मोठी माणसे शेती, दुकाने अशा कामात व्यस्त असताना तो माणुस परत गावात आला. 

यावेळी एक वेगळीच पण तितकीच सुंदर धुन वाजवत तो पुन्हा गावात फिरला. मागच्या वेळी जसे उंदीर त्याच्या संगीताच्या जादूने त्याच्या मागे फिरत होते, तसंच यावेळी गावातली सगळी लहान मुले त्याच्या मागे मागे जायला लागली. 

गावातले लोक घाबरून जमा झाले. आता उंदरांसारख्याच हा आपल्या लहान मुलांनाही सोबत नेऊन मारू शकतो या भीतीने त्यांनी त्याला थांबवले आणि त्याची क्षमा मागितली. त्याला त्याच्या उरलेल्या ९०० सुवर्णमुद्रा देऊ केल्या. 

पण तो माणुस आता काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने १०००० सुवर्णमुद्रांची मागणी केली. गाववाल्यांसमोर त्याचं ऐकण्यावाचुन काही पर्याय नव्हता. त्यांनी मुकाट्याने त्याला १०००० सुवर्णमुद्रांचा थैली दिली, आणि पुन्हा क्षमा मागितली. 

त्याने आपल्या जादुमधून मुलांना मुक्त केले आणि तो त्या गावातून निघून गेला. 

लेखक: आकाश खोत

व्यवसाय एक (संगणक अभियंता) 
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )

माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा! 

वैयक्तिक ब्लॉगskyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल:  Thats My Take

प्रतिक्रिया व्यक्त करा