आपल्याकडे जसा बटाट्यापासुन बनलेला वडा आणि वडापाव आवडीने खाल्ला जातो, तसाच बटाट्याचाच बनलेला समोसाही खाल्ला जातो. महाराष्ट्राबाहेर वडापावपेक्षा जास्त बाकी (विशेषतः उत्तर) भारतात तर समोसा लोकांना माहित आहे.
समोसा नुसता, किंवा चिंचेची चटणी लावुन, तोंडी लावायला तळलेल्या आणि खारवलेल्या मिरच्या छान लागतो. तो जितका गरम असतो तितका छान लागतो. त्यामुळेच प्रत्येक शहरात एखादं प्रसिद्ध चाट भांडार असतं तिथे गेलात तर बहुधा हा पदार्थ गरम गरम कढाईतून काढला कि विकतात.
समोश्याचं आवरण जरा जाड असतं आणि बटाटा गरम झाला कि थंड व्हायला वेळ लागतो त्यामुळे लगेच खायला घेतला तर फार फजिती होते. पण तरीही फा फु करत तो गरम खायला मजासुद्धा येते.
समोसा चाट, समोसा छोले, समोसा भेळ, समोसा पाव (स्थळ अर्थात मुंबई) अशी समोशाची इतर रूपेही लोकप्रिय आहेत. पूर्वेकडच्या राज्यांमध्ये शिंगाडा म्हणून समोश्याचा थोडा छोटा प्रकार खाल्ला जातो. हा पदार्थ आशिया खंडात इतरत्रहि खाल्ला जातो. आणि पाश्चात्य देशांमध्ये भारतीय हॉटेल्समध्येही असतो.
पण तुम्हाला माहित आहे का कि मुळात हा पदार्थ मांसाहारी होता. मध्यपूर्वेत संबुसाक, संबुसाज, समसा अशी याची नावे होती. समसा या शब्दाचा अर्थ होतो पिरॅमिड. इजिप्तचे जगप्रसिद्ध पिरॅमिड डोळ्यासमोर आणाल तर त्याचा आकार आणि समोशाचा त्रिकोणी आकार यात साधर्म्य आढळुन येईल.
हा पदार्थ मध्यपूर्वेतून आपल्यावर जी अनेक आक्रमणे झाली, अनेक लोक स्थलांतरित झाले तेव्हा आला असावा. त्याकाळी याच्या आवरणात मांस, काजु, पिस्ता इत्यादी भरून खात असत.
१३व्या शतकापासुन याचे साहित्यात अनेक उल्लेख आहेत. अमीर खुसरोने या पदार्थाचं वर्णन केलेलं आहे. एक देशोदेशी फिरलेला प्रवासी इब्न बतूता याच्या वर्णनात सुद्धा मुहम्मद बिन तुघलकाच्या मेजवानीत हा पदार्थ असल्याचं म्हटलंय. तेव्हा लिहिल्या गेलेल्या खाद्यपदार्थांच्या पुस्तकात सुद्धा याचं वर्णन आहे.
हा पदार्थ हळुहळु जनतेत पसरून पुढे याचं शाकाहारी रूप लोकप्रिय झालं. आणि आज आता बटाट्याचा बनलेला समोसा हे मुख्य स्वरूप झालंय आणि चिकन समोसा, मटण समोसा असे पदार्थ मोजक्या दुकानात उपलब्ध असतात.
समोसा आणि बटाटा हे समीकरण आता लोकांच्या डोक्यात इतकं घट्ट बसलंय कि अक्षय कुमारच्या एका प्रसिद्ध गाण्यात अशा ओळी आहेत “जब तक रहेगा समोसेमे मे आलु, तेरा रहुंगा ओ मेरी शालु”.
म्हणजे नायक आपल्या नायिकेला आपलं प्रेम किती पक्कं आहे हे व्यक्त करायला समोसा आणि बटाट्याचं उदाहरण देतोय. आज अशी समोश्याची प्रतिमा असताना याची सुरुवात मुळात मांसाहारी पदार्थापासुन झाली होती हे अकल्पनीय पण तरी मनोरंजक आहे. माणसांसारखाच एखाद्या पदार्थाचा प्रवास सुद्धा असा भन्नाट असु शकतो.

लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take