You are currently viewing रेड्याच्या मुखी वेद

रेड्याच्या मुखी वेद

आळंदीच्या लोकांच्या म्हणण्यानुसार विठ्ठलपंतांनी आणि रुक्मिणीबाईंनी प्रायश्चित करण्यासाठी आपला जीव दिला.

त्यांच्या मुलांना त्यांची आपली मुंज व्हावी आणि समाजाने आपल्याला स्वीकारावे ही इच्छा माहीत होती, त्यासाठीच त्यांनी जीव दिला होता.

त्यांनी आळंदीच्या ब्राह्मणांना पुन्हा आमची मुंज लावुन द्या अशी विनंती केली.

आता आळंदीच्या लोकांकडे काही उत्तर नव्हते. विठ्ठलपंत बैठकीतले म्हणणे एवढे गांभीर्याने घेऊन जीव देतील असे त्यांना वाटले नसावे.

असे प्रायश्चित केल्यावर त्यांच्या मुलांना पुन्हा स्वीकारत येईल याचा त्यांच्याकडे कोणता शास्त्रीय आधार नव्हता आणि शास्त्रांचा काही अर्थ लावुन निर्णय देण्याची कुवत सुद्धा नव्हती. 

त्यांनी ह्या भावंडांना पैठणला जायला सांगितले.

मराठवाड्यात गोदावरी काठचे पैठण गाव आज जायकवाडी धरण, पैठणी साडी आणि संत एकनाथांचे गाव आणि समाधीस्थळ यासाठी ओळखले जात असले तरी पुर्वीपासुन या गावचे महत्व फार होते. 

सातवाहन राजांच्या काळात येथे प्रतिष्ठान या नावाने राजधानी होती. अत्यंत महत्वाचे शहर, बाजारपेठ, कला आणि संस्कृतीने संपन्न असलेले गाव होते. गोदावरीला दक्षिणेत गंगेसारखाच मान आहे. त्यामुळे उत्तरेत काशी प्रयाग जसे हिंदु धर्मीयांसाठी पवित्र स्थळ आहे तसेच पैठण हे दक्षिणेत होते. 

इथे विद्वान वेदशास्त्रसंपन्न ब्राह्मणांची मोठी परंपरा होती. धर्मशास्त्राचा अभ्यास, चर्चा, वादविवाद इथे सतत चालत असे. आसपासचे सर्व लोक इथे होणाऱ्या धर्माच्या प्रश्नांवरच्या निवाड्यांचा इथे मांडलेल्या मतांचा आदर करत असत. 

चारही भावंडे पैठणला निघाली. पायी पायी अनेक दिवस प्रवास केला. वाटेत मिळेल तिथे आश्रय घेतला, भिक्षा मागुन जे मिळाले ते खाल्ले आणि ते एकदाचे पैठणला पोहोचले.

पैठणच्या ब्राह्मणांसमोर त्यांनी आपली हकीकत सांगुन आपला प्रश्न मांडला. तिथल्या पंडितांमध्ये वेद, उपनिषदे, स्मृत्या, पुराणे ह्यांचे संदर्भ देत चर्चा आणि वादविवाद सुरू झाले. 

त्या भावंडांना अनुकूल असा निष्कर्ष काही निघत नव्हता.

तिकडेच नदीकिनारी समोर एक माणुस आपल्या रेड्याला निर्दयीपणे मारत होता. ज्ञानेश्वरांना ते बघवले नाही. त्यांनी तात्काळ मालकाला मारणे थांबवण्याची विनंती केली.

एक पंडिताने टोमणा मारला. पहा आपण एवढा वेदांचा किस पाडतोय इथे ह्यांच्या प्रश्नावर आणि ह्या संन्याशाच्या पोराला मात्र रेड्याचीच जास्त चिंता आहे.

ज्ञानेश्वरांनी लगेच उत्तर दिले. वेदातच म्हटलं आहे ना सगळे जीव पवित्र आहेत, सगळ्याच जीवांमध्ये तेच ब्रह्मन् (परब्रह्म / ईश्वरी तत्व) वास करते. मग रेड्याच्या प्राणाचे महत्व आपल्या प्राणा एवढेच नाही का?

यावर त्या पंडितांनी त्यांची खिल्ली उडवायला सुरु केली. मोठा आला आम्हाला वेद शिकवणारा. तुझ्या म्हणण्यानुसार तो रेडा आणि आम्ही वेदांचा अभ्यास केलेले पंडित सारखेच असु तर तो रेडासुद्धा आमच्यासारखे वेद म्हणु शकेल नाही का? 

ज्ञानेश्वर म्हणाले का नाही. त्यांनी रेड्याजवळ जात आपला हात त्या रेड्याच्या डोक्यावर ठेवला. आणि चमत्कार. तो रेडा चक्क वेदातल्या ऋचा म्हणु लागला. 

सगळ्यांनी आ वासला. पंडित निशब्द झाले. 

ज्ञानेश्वरांमध्ये काहीतरी अलौकिक सामर्थ्य आहे हे सगळ्यांच्या लक्षात आले. 

लेखक: आकाश खोत

व्यवसाय एक (संगणक अभियंता) 
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )

माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा! 

वैयक्तिक ब्लॉगskyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल:  Thats My Take

प्रतिक्रिया व्यक्त करा