You are currently viewing ताटीचे अभंग

ताटीचे अभंग

आपल्या प्रायश्चित्तानंतर आपल्या मुलांना चांगले आयुष्य जगता यावे अशी भाबडी आशा ठेवुन विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांनी इंद्रायणी नदीत जलसमाधी घेतली. 

दुसऱ्या दिवशी मुले उठली तेव्हा त्यांना आई बाबा कुठे गेले हा प्रश्न पडला. निवृत्तिनाथाला आपल्या सामर्थ्याने काय झाले हे समजले. तो दहा वर्षांचा होता. त्याची लहान भावंडे ज्ञानेश्वर आठ, सोपान सहा आणि मुक्ता तर केवळ चार वर्षांची होती. 

निवृत्तीनाथांनी त्यांना काय झाले ते समजावले, त्यांना धीर दिला. दहा वर्षांचा असला तरी तो एक ज्ञानी योगी होता. तोच आपल्या भावंडांचा माता पिता आणि गुरु बनला. त्याने भावंडांना सांभाळले, त्यांना प्रेम दिले, आपल्याकडचे ज्ञान दिले. 

त्यांचे कुटुंब समाजाने वाळीत टाकलेले होते. त्यांना कोणाचा आधार नव्हता. त्या भावंडांनीच एकमेकांना आधार दिला. 

चारही भावंडांचे एकमेकांवर फार प्रेम होते. ते नेहमी एकमेकांची काळजी घ्यायचे, अवघड परिस्थितीत एकमेकांना धीर द्यायचे. सर्व कामे मिळुन मिसळून आपसात वाटून घेऊन करायचे. 

निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वर गावात जाऊन भिक्षा मागुन मिळेल ते आणायचे. त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालु होता. असेच ते दिवस कंठीत मोठे होत होते. 

एक दिवस ज्ञानेश्वरांचा गावात फार अपमान झाला. कितीही समजूतदार असले तरी प्रत्येकाची सहनशक्ती कधी तरी संपते. ज्ञानेश्वरांचे वय सुद्धा कोवळे होते. ते फार व्यथित झाले. त्यांना सततच्या या अपमानाचा उद्वेग आला होता. 

ते रागारागात घरी आले. घरात गेले आणि झोपडीचे दार बंद करून एकटेच आत धुमसत बसले. आता आपण कोणाकडे जायचे नाही, कोणाशी बोलायचे नाही असे त्यांना वाटत होते. लहानग्या मुक्तेने हे पाहिले आणि सर्व प्रकार तिच्या लक्षात आला. 

मुक्तेने ज्ञानेश्वरांना दादा दादा, बाहेर ये, असा बसु नकोस अशा हाका मारून पाहिल्या. पण आज ज्ञानेश्वरांची मनस्थिती फार बिघडली होती. ते काही ऐकत नव्हते, प्रतिसाद देत नव्हते. 

त्यांच्या जगावेगळ्या परिस्थितीने, थोरल्या भावाकडून मिळणाऱ्या ज्ञानामृताने सगळीच भावंडे वयाने लहान असूनही समजुतीने थोरल्या माणसांनाही लाजवतील इतकी समजूतदार होती. समाजाने वाईट वागूनही स्वतः कधी वाईट न वागणाऱ्या आई वडिलांचा आदर्श त्यांच्यासमोर होता. 

लहान बहीण असूनही त्यादिवशी मुक्ता आपल्या थोरल्या भावाच्या मोठ्या बहिणीच्या किंवा आईच्या भूमिकेत शिरली. तिने ज्ञानेश्वरांची समजूत काढायला अभंग म्हणणे सुरु केले. या अभंगातुन त्यांनी लोक वाईट वागले तरी आपण विचलित होऊ नये, आपला चांगला मार्ग सोडू नये, संताला हे शोभत नसते अशा प्रकारचे विचार मांडले. 

दर काही ओळीनंतर ती ताटी उघडा ज्ञानेश्वरा म्हणजेच झोपडीचे दार उघडा अशी आपल्या दादाला विनंती करत होती. 

ह्या अभंगातल्या काही ओळी खाली देतोय. 

योगी पावन मनाचा। साहे अपराध जनाचा।।
विश्व रागे झाले वन्ही। संती सुखे व्हावे पाणी।।
शब्दशस्त्रे झाले क्लेश। संती मानावा उपदेश।।
विश्वपट ब्रह्मदोरा। ताटी उघडा ज्ञानेश्वरा।।

संत तोचि जाणा जगी। दया क्षमा ज्याचे अंगी।।
लोभ अहंता नये मना। जगी विरक्त तोचि जाणा।।
इहपर लोकी सुखी। शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी।।
मिथ्या कल्पना मागे सारा। ताटी उघडा ज्ञानेश्वरा।।

मुक्तेच्या अथक प्रयत्नाने आणि त्या अभंगांनी शेवटी ज्ञानेश्वरांचे मन बधले आणि ते दार उघडुन बाहेर आले. 

हे अभंग ताटीचे अभंग म्हणुन प्रसिद्ध आहेत. 

मुक्ताबाईंच्या लहान वयापासून अशी प्रतिभा आणि आईसारखीच ममता दाखवण्याच्या स्वभावामुळे त्यांना मुक्ताई म्हणजेच मुक्ता आई, असेही म्हणतात.

लेखक: आकाश खोत

व्यवसाय एक (संगणक अभियंता) 
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )

माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा! 

वैयक्तिक ब्लॉगskyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल:  Thats My Take

प्रतिक्रिया व्यक्त करा