You are currently viewing राजर्षी छत्रपती शाहु महाराज

राजर्षी छत्रपती शाहु महाराज

राजर्षी छत्रपती शाहु महाराज. महाराष्ट्राच्या इतिहासात होऊन गेलेले अत्यंत महान व्यक्तिमत्व. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिसऱ्या पिढीपासून गादीची विभागणी झाली आणि दोन स्वतंत्र गाद्या अस्तित्वात आल्या. एक गादी साताऱ्याला संभाजी महाराजांचे पुत्र शाहु महाराज यांची आणि त्यांच्या वंशजांची. (हि गोष्ट त्यांची नव्हे.) दुसरी गादी कोल्हापूरची राजाराम महाराजांच्या पत्नी ताराराणी आणि त्यांच्या वंशजांची. 

त्या कोल्हापूरच्या गादीवर एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस आलेले छत्रपती शाहु महाराज यांना राजर्षी म्हणुन ओळखले जाते. राजर्षी म्हणजे ऋषीसमान राजा. त्यांचे व्यक्तिमत्वच असे बहुआयामी होते, अनेक क्षेत्रांना आणि असंख्य लोकांच्या आयुष्याला त्यांनी (परीस)स्पर्श केला, त्यात भरीव कामगिरी केली. 

त्यांचे मूळ नाव यशवंतराव घाटगे. त्यांचा जन्म २६ जुन १८७४ रोजी झाला. कागल गावचे प्रमुख जयसिंगराव घाटगे आणि मुधोळच्या राजवंशातुन आलेल्या राधाबाई हे त्यांचे आईवडील. त्यांच्या आई लहानपणीच गेल्या. १० व्या वर्षापर्यंत त्यांना वडिलांनी सांभाळले. 

त्यानंतर त्यांना कोल्हापूरच्या राणी आनंदीबाई यांनी दत्तक घेतले. आनंदीबाईंचे पती छत्रपती शिवाजी चौथे वारले तेव्हा कोल्हापूरच्या गादीला वारस नव्हता. त्यामुळे राणीसाहेबांनी यशवंतरावांना दत्तक घेतले. 

त्यांनी शिक्षण पूर्ण केले. त्यांना ब्रिटिश सनदी अधिकाऱ्यांकडून राज्य कारभाराचे सुद्धा प्रशिक्षण मिळाले. 

१८९४ साली त्यांचा राज्याभिषेक होऊन त्यांनी छत्रपती शाहू हे नाव धारण केले. तत्पूर्वी १८९१ मध्ये त्यांचा बडोद्याच्या लक्ष्मीबाई खानविलकर यांच्याशी विवाहसुद्धा झाला होता. त्यांना दोन मुले आणि दोन मुली झाल्या. 

शाहु महाराजांनी अत्यंत कुशलपणे राज्य सांभाळले. प्रजेच्या कल्याणासाठी अनेक योजना आखल्या. अनेक प्रकल्प आणि संस्था उभ्या केल्या. एक राज्यकर्ता इच्छा शक्ती, कल्पनाशक्ती आणि माणसे जोडण्याची शक्ती असले तर काय काय करू शकतो हे त्यांनी आपल्या आदर्श राज्यकारभारातुन दाखवुन दिले. 

त्यांनी किती प्रकारच्या विषयात जबरदस्त काम केले हे सांगायचे झाले तर एक मोठा प्रबंधच होईल. पण एक थोडक्यात यादी देतो. 

  • कुस्ती. त्यांचा आवडता खेळ. त्यांनी अनेक पैलवानांना पाठिंबा दिला. कोल्हापूरचे आखाडे अजूनही प्रसिद्ध आहेत. कोल्हापुरात कुस्ती खेळायला देशभरातून पैलवान यायचे. 
  • प्राथमिक शिक्षण: सर्वांना प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत केले. 
  • सर्व जातीच्या विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले. शाळा कॉलेज उभारले. शिष्यवृत्त्या दिल्या. वसतिगृहे उभारली. 
  • जाती निर्मूलन: जातीभेद, अस्पृश्यता हटवण्यासाठी सतत प्रयत्न केले. त्यांच्या राज्यात जातीभेद बेकायदेशीर केला. सर्व ठिकाणी, विहिरींवर सर्व जातीच्या लोकांना जाण्याची मुभा दिली. 
  • वेदिक शिक्षण: त्यांच्या पंडितांनी ते ब्राह्मण नाहीत म्हणुन त्यांच्या कार्यात पुराणोक्त मंत्रच म्हणणार वेदोक्त मंत्र म्हणणार नाही असा पवित्रा घेतला. त्यामुळे वेदोक्त कि पुराणोक्त, ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर असा वाद उफाळून आला. शाहु महाराजांनी आपल्या सेवेतुन ब्राह्मण पंडितांना काढले आणि त्याजागी मराठा तरुणांना नियुक्त करून क्षात्र जगद्गुरू हि पदवी दिली. सर्व जातीच्या लोकांना वेदशास्त्रे शिकण्यासाठी शाळा उघडल्या आणि उद्युक्त केले. 
  • आरक्षण: नोकरीत मागासवर्गीयांसाठी ५० टक्के आरक्षण दिले. अशा प्रकारे दलितांच्या उद्धारासाठी ठोस पावले उचलणारे ते पहिलेच होते. 
  • विधवा पुनर्विवाह, आंतरजातीय विवाहांना पाठिंबा दिला. 
  • गावाचे मुख्यपद सांभाळणाऱ्या लोकांसाठी प्रशिक्षण वर्ग सुरु केले. प्रजेचे आयुष्य सुखकर व्हावे यासाठी कारभारात असणाऱ्या व्यक्तींनी अजून कुशल व्हावे असा विचार करणारे ते एकमेवाद्वितीय राज्यकर्ते होते. 
  • शेतकीचे कॉलेज सुरु केले. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण दिले. अवजारे, उपकरणे इत्यादी घेण्यासाठी निधी आणि कर्ज दिले. 
  • राधानगरी धरण उभारून कोल्हापूरच्या पाण्याची व्यवस्था केली. 
  • अनेक प्रकल्प उभारून प्रांताचा विकास केला. 
  • कलावंत, लेखक, संशोधक सर्वांना भक्कम आर्थिक पाठबळ दिले. 

भारतात त्याकाळी शेकडो संस्थाने होती. तिथले बहुतांश राजे ब्रिटिशांकडून मिळणारे निवृत्तीवेतन, पूर्वजांकडून मिळालेली गडगंज संपत्ती याच्या जीवावर विलासी आयुष्य जगत होते. ते सोडून रयतेचे भले करावे यासाठी आजीवन इतके झटणारे शाहु महाराज हे त्यामुळेच वेगळे ठरतात. त्यांना मिळालेली राजर्षी हि उपाधी सार्थच होती. 

६ मे १९२२ रोजी मुंबईत राजर्षी शाहु महाराजांचे निधन झाले. 

लेखक: आकाश खोत

व्यवसाय एक (संगणक अभियंता) 
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )

माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा! 

वैयक्तिक ब्लॉगskyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल:  Thats My Take

प्रतिक्रिया व्यक्त करा