एके काळी मद्र देशात एक राजा होता. त्याचे नाव अश्वपती. मालविका त्याची राणी होती. राजा राणीला अनेक वर्षे मुल होत नव्हते. त्यामुळे त्यांनी सूर्यदेवाची आराधना केली. सुर्यदेव प्रसन्न झाले आणि त्यांच्या कृपेने राजा राणीला अत्यंत सुंदर, तेजस्वी आणि गुणवान मुलगी झाली.
सूर्यदेवाचे एक नाव आहे सावित्र. सूर्यदेवाच्या कृपेने झालेल्या या कन्येचे नाव तिच्या आई वडिलांनी सूर्याच्याच या नावावरून ठेवले. सावित्री. आपल्या आई वडिलांसारखीच सावित्री सुद्धा देवभक्त होती. ती मनापासुन नियमितपणे देवाची पूजाअर्चा प्रार्थना करीत असे.
सावित्री मोठी झाल्यावर तिच्या आई वडिलांना तिच्या लग्नाचे वेध लागले. राजाने सावित्रीला स्वतः देशोदेशी फिरून आपला मनपसंत वर निवडायला सांगितले. सावित्री प्रवासाला निघाली. राजाने तिच्या सुरक्षेसाठी आपले सैनिक सुद्धा पाठवले.
सावित्री प्रवासात असताना तिला एक वनवासात असणारे राजकुटुंब भेटले. शाल्व देशाचा राजा द्युमत्सेन याच्या भावाने बंड करून राज्य हिरावून घेतले आणि राजा द्युमत्सेन आणि त्याच्या कुटुंबाला राज्याबाहेर काढले. त्यामुळे द्युमत्सेन, त्याची पत्नी आणि त्यांचा मुलगा राजकुमार सत्यवान जंगलात राहत होते.
सावित्री सारखाच सत्यवान सुद्धा देखणा आणि गुणी होता. सावित्रीला तो आवडला. तिने त्याच्याशीच लग्न करायचे ठरवले.
तिने आपल्या राज्यात परत येऊन आपल्या वडिलांना आपली निवड सांगितली. तेव्हा तिथे नारद मुनी राजा अश्वपतीला भेटायला आलेले होते. नारदमुनींनी सत्यवानाचे भविष्य सांगितले. सत्यवानाला एका वर्षात मृत्यू येणार होता. हे ऐकूनही सावित्रीचा विचार बदलला नाही.
तिने सांगितले कि तिने आता सत्यवानाला मनोमन वरले आहे आणि ती दुसऱ्या कोणाचा विचार करू शकत नाही. तिचा हा निर्धार ऐकुन अश्वपतीने संमती दिली आणि सत्यवानाच्या कुटुंबाला भेटून त्यांचे लग्न लावून दिले.
सावित्री आपल्या नवऱ्याच्या कुटुंबासोबत जंगलात राहु लागली. तिने कुटुंबात सगळ्यांना जीव लावला. सासू सासऱ्यांची सेवा केली. सत्यवान आणि सर्वांचे मन जिंकले. सत्यवान आणि सावित्री दोघांचे एकमेकांवर खुप प्रेम होते.
पाहता पाहता नारद मुनींनी भविष्य सांगितले त्याला एक वर्ष होत आले. त्यांनी सांगितलेल्या मृत्यूच्या दिवसाआधी तीन दिवसापासुन सावित्रीने उपासाचे व्रत सुरु केले. देवाची प्रार्थना सुरु केली.
तो दिवस उजाडला. सत्यवान रोज जंगलात जाऊन लाकडे, फळे, कंदमुळे ई. गोष्टी आणत असे आणि सावित्री घरीच थांबुन इतर कामे करत असे. आजच्या दिवशी मात्र ती सत्यवानासोबत निघाली.
ते दोघे जंगलात गेले. सावित्री एका वडाच्या झाडाखाली बसली. सत्यवान लाकडे तोडू लागला. लाकडे तोडता तोडता त्याच्या छातीत दुखू लागले आणि हातपाय गळून आले. तो सावित्रीच्या मांडीवर डोकं ठेवुन आराम करायला पडला.
त्याच्या मृत्यूची वेळ झाली होती. यमदूत त्याचे प्राण घेऊन जायला आले. सावित्रीचे आजवर कमावलेले पुण्य आणि तेज एवढे होते कि यमदूतांना तिच्या जवळही जाता येत नव्हते.
ते परत फिरले आणि स्वतः यमराज आले. एरवी यमराज कधी येऊन कोणाचे प्राण घेऊन जातात हे कोणालाही कळत नाही. सावित्रीच्या पुण्यामुळे मात्र तिला ते दिसत होते. ती त्यांच्या मागे मागे जायला लागली.
यमराजांनी तिला परत फिरायला सांगितले. ती म्हणाली माझ्या नवऱ्यातच माझाही जीव आहे, तुम्ही त्यांना घेऊन चाललात तर मी मागे कशी राहु? ती त्यांच्या सोबतच जायला लागली.
यमराजांनी तिला सांगितले कि तिचं आयुष्य अजुन बाकी आहे, तिने परत जावे. पण तिने ऐकले नाही. ती यमाच्या मागे जात जात यमाची स्तुती करायला लागली. यमालाच धर्मराज असेही म्हणतात. कारण ते न्यायप्रिय आणि धर्मनिष्ठ असतात. सावित्रीने त्यांचे गुणगान सुरु केले.
यमराज तिची चिकाटी पाहुन आणि स्तवन ऐकुन प्रसन्न झाले. पण त्यांना सत्यवानाला जिवंत सोडता येणार नव्हते. त्यांनी सावित्रीला जे हवे ते मागण्यास सांगितले.
सावित्रीने आपल्या सासऱ्यांचे गेलेले राज्य परत मागितले. यमराजांनी तथास्तु म्हणुन ते मान्य केले.
सावित्रीचे लग्न झाल्यावर तिच्या आई वडिलांजवळ कोणी असावे म्हणून त्यांना एक पुत्र मागितला.
यमराजांनी तथास्तु म्हणुन ते मान्य केले.
सावित्रीने मग स्वतःसाठी एक अपत्य मागितले. यमराजांनी पुत्रवती हो असा आशीर्वाद दिला आणि ते आपल्याच वचनात अडकले.
सावित्रीने स्वतः धर्मराजाला धर्मसंकटात पाडले. ती यमाला म्हणाली “हे धर्मराज, तुम्ही दिलेला वर तर निष्फळ जाणार नाही. मला तुमच्या कृपेने अपत्य होणारच. आणि माझ्या सारख्या पतिव्रता स्त्रीला आपल्या पतीच्या मृत्यूपश्चात कोणा दुसऱ्यापासून अपत्य होण्याचा अधर्म तुम्ही नक्कीच होऊ देणार नाहीत. त्यामुळे तुम्ही आता माझ्या पतीचे प्राण परत द्या.”
यमराजांना तिचे म्हणणे मान्य करावेच लागले. त्यांनी सावित्रीची हुशारी, भक्ती, पतीवरचे अतोनात प्रेम यामुळे प्रसन्न होत सत्यवानाचे प्राण परत केले आणि त्या दोघांना समृद्ध दीर्घायुष्याचा आशीर्वाद दिला.
सत्यवान शुद्धीवर आला. त्याला हे सर्व माहित नव्हते. ते दोघे घरी गेले तेव्हा त्यांच्या राज्यातले स्वार तिथे आले होते. राजा द्युमत्सेनाचा अन्यायी भाऊ मृत्युमुखी पडला होता. त्यामुळे आता त्याचे राज्य संपले होते आणि राज्यातल्या लोकांनी आपल्या मुळ राजाला परत आणायला पथक पाठवले होते.
हे अचानक कसे झाले याचे सर्वांना आश्चर्य वाटत होते. तेव्हा सावित्रीने सगळा वृत्तांत त्यांना सांगितला. सर्वांना सावित्रीबद्दल फार कौतुक आणि आदर वाटला.
आपल्या नवऱ्याला मृत्यूच्या पाशातुन सोडवुन आणणाऱ्या सावित्रीचा आदर्श ठेवून हिंदु स्त्रिया व्रत करतात. हे ज्या दिवशी घडले तो दिवस ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेचा होता. हि घटना वडाच्या झाडाखाली घडली. वडाला पवित्र वृक्ष मानतात. त्यामुळे या दिवसाला वटपौर्णिमा म्हणतात.
ज्यांना इच्छा आहे आणि शक्य आहे ते वटपौर्णिमेच्या तीन दिवस आधीपासुन व्रत करतात किंवा त्या दिवशी व्रत करतात. या दिवशी उपवास करून वडाच्या झाडाचे दर्शन घेऊन त्याची पूजा करतात आणि प्रदक्षिणा घालत त्याला दोरा गुंडाळतात. या व्रताला वटपौर्णिमेचे व्रत किंवा वटसावित्रीचे व्रत म्हणतात.
वटवृक्ष हे मजबुती आणि स्थैर्याचे प्रतीक आहे. दोरा हे आयुष्याचे प्रतीक आहे. आपले आयुष्य वटवृक्षासारखे मजबुत दीर्घ आणि स्थिर असावे अशी यामागची कल्पना आहे.
सावित्रीला सत्यवानासारखा चांगला पती मिळाला तसा आपल्याला मिळावा म्हणुन आणि लग्नानंतर पतीचे आयुष्य दीर्घ असावे म्हणुन स्त्रिया श्रद्धेने हे व्रत करतात.
लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take
माहितीपूर्ण लेख.. मस्तच.. 😊