संत कबीर (कबीरदास) हे पंधराव्या शतकात होऊन गेलेले महान संत कवी होते. ते वाराणसीमध्ये लहानाचे मोठे झाले. त्यांच्या जन्म आणि मृत्यूची नेमकी वर्षे कोणती यावर एकमत नाही, परंतु ते पंधराव्या शतकाच्याच आसपास होऊन गेले एवढं नक्की.
त्यांचा जन्म मुस्लिम विणकर कुटुंबात झाला. वाराणसीत असल्यामुळे त्यांचा हिंदु समाज आणि भाविकांचा जवळुन संबंध आला. त्या दरम्यान दीर्घकाळ वाराणसीतच वास्तव्यास असणारे संत रामानंद यांचा त्यांच्यावर बराच प्रभाव पडला. ते त्यांना गुरु मानत असत.
दोहा म्हणजे दोन ओळीचे काव्य. ह्या शैलीतले त्यांचे काव्य सुप्रसिद्ध आहे. आजही त्यांचे काव्य लोकांना चांगले माहित आहे.
त्यांच्या काव्यावर हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्माचा पगडा दिसतो. तसेच त्यांनी दोन्ही धर्मातल्या अनिष्ट प्रथांवर टीका केली.
मध्ययुगात भारतात भक्ती परंपरेत अनेक संत झाले. भक्ती चळवळ किंवा भक्ती परंपरा म्हणजे देवाच्या भक्तीचे महत्व सांगणारा पंथ. समाजात धार्मिकतेच्या नावाखाली वाढत चाललेल्या कर्मकांड आणि जातीनिहाय उतरंडीला फाटा देत वैयक्तिक भक्तीचे महत्व या संतांनी सांगितले.
मनुष्य कुठल्याही जातीत, धर्मात किंवा स्त्री अथवा पुरुष असला तरीही जर देवाची श्रद्धेने भक्ती केली, त्यात लीन होत आपापले कर्म सद्भावनेने करत राहिले तर ज्ञान प्राप्ती, ईश्वर प्राप्ती आणि अर्थात मोक्ष प्राप्ती होऊ शकते असे या संतांचे सांगणे होते.
स्थलकालपरत्वे त्यांच्या संदेशात, सांगण्याच्या पद्धतीत थोडेफार फरक असतात, पण त्यांचे सार हेच होते.
कबीराने सदाचार, मीपण विसरणे म्हणजेच अहंकार सोडणे, केवळ स्वतःचा विचार सोडणे, देवाची भक्ती करणे याचे महत्व सांगितले.
कबीराचे काही प्रसिद्ध दोहे खालील प्रमाणे.
कल करे सो आज कर, आज करे सो अब
पल मे प्रलय होएगी, बहुरी करोगे कब
धीरे धीरे रे मना, धीरे सब कुछ होये
माली सिंचे सो घरा, ऋतू आये फल होये
जैसे तील मे तेल है, और चकमक मे आग
तेरा साई तुझमे है, तु जाग सके तो जाग
कबीराचे काही काव्य शिखांच्या गुरु ग्रंथ साहिब मध्ये सुद्धा आहे. पाचवे गुरु अर्जुनदेव यांनी आदिग्रंथ लिहिला तेव्हा गुरु नानक, आधीचे शीख गुरु यांची शिकवण, स्वतः रचलेले श्लोक यासोबतच त्यांनी शीख सोडून इतर संतांच्या कार्याचा सुद्धा त्यात समावेश केला होता. शिखेतर संतांपैकी सर्वात जास्त मजकूर हा कबीराचाच आहे.
कबीराचे अनुयायी हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्मात आढळुन येतात. कबीरपंथी नावाचा समाज आजही अस्तित्वात आहे.
कबीराच्या दोह्यांवर अनेक संगीत रचना झाल्या. कुमार गंधर्वांनी त्यांच्या अनेक गीतांना सुंदर चाली लावल्या. आजकालच्या काळातले रॉक बँड सुद्धा कबीराचे काव्य अजूनही वापरतात.
लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take