विठ्ठलपंतांची मुले मोठी होत होती. निवृत्तीनाथ दहा वर्षांचे आणि ज्ञानेश्वर आठ वर्षांचे झाले होते. ह्या वयात ब्राह्मण मुलांच्या मुंजी करण्याची रीत असते.
विठ्ठलपंतांनी आणि रुक्मिणीबाईनी त्यांच्या मुलांसकट आजवर फार अपमान सहन केला होता. नदीवर, रस्त्यात पदोपदी त्यांचा अपमान होत असे, चेष्टा होत असे. संन्याशाची बायको, संन्याशाची पोरे म्हणून हेटाळणी होत असे.
आता आपल्या मुलांच्या मुंजी करून त्यांना रीतसर आयुष्य जगता यावे अशी त्यांची इच्छा होती. त्यांनी गावच्या ब्राह्मणांना मुलांची मुंज लावुन देण्याची विनंती केली.
ब्राह्मणांच्या बैठकीत त्यांना संन्याशाच्या मुलांना मुंजीचा कसला आलाय अधिकार असे सुनावले गेले.
“त्यांनी आपल्या कर्मांची शिक्षा मुलांना कशाला? त्यांनी कोणती चुक केली आहे” असे काकुळतीला येऊन विचारले.
“ह्याचा विचार संन्यास सोडून पोरांना जन्माला घालण्याआधी करायचा होता.”
“माझ्या हातुन चुक झाली. मी त्याचे प्रायश्चित करायला तयार आहे. पण माझ्या कर्माची शिक्षा मुलांना नका देऊ हो. त्यांना तरी समाजात परत घ्या. त्यांची मुंज लावु द्या.” विठ्ठलपंतांनी पुन्हा विनवणी केली.
“संन्यास सोडण्याचे देहदंडाशिवाय प्रायश्चित्त होऊच शकत नाही.” कोणी तरी कर्मठ गृहस्थ कठोर आवाजात बोलले.
विठ्ठलपंत चमकले. निशब्द झाले. विमनस्क अवस्थेत घरी आले.
रात्री मुले झोपायला गेली.
विठ्ठलपंतांनी रुक्मिणीबाईंना सभेतली घटना सांगितली. त्यांचा आता आपले प्राण त्यागण्याचा निश्चय झाला होता. निदान त्याने तरी आपल्या मुलांना चांगले आयुष्य जगता येईल असे त्यांना वाटत होते. आजवर त्यांनी फार सहन केलं होतं पण आपल्या मुलांच्या वाट्याला येणारी अवहेलना त्यांना सहन होत नव्हती.
रुक्मिणी बाई भावुक झाल्या. त्यांनासुद्धा संन्याशाला संसारात परत आणुन संसार केला मुले जन्माला घातली म्हणुन नवऱ्यासारखेच आपणही प्राण देऊन प्रायश्चित करावे असे वाटले.
आपल्या मुलांचे काय होईल हि चिंता त्यांना होती. तशी त्यांची चारही मुले फार गुणी आणि समजूतदार होती. ती साधीसुधी मुले नव्हेत ह्याची त्यांना जाणीव झाली होती. थोरला निवृत्तीनाथ गहिनीनाथांकडून गुरुदीक्षा घेतल्यापासुन फार प्रगल्भ झाला होता. त्याची वर्तणुक अगदी प्रौढांसारखी असे.
तो आपल्या गुरूच्या कृपेने भावंडांना सांभाळेल असा विश्वास त्यांना वाटला.
विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई दोघांनी इंद्रायणी नदीत उडी मारून जलसमाधी घेतली. खरेतर त्या दोघांनी काही पाप केले नव्हते. संसार करण्याचा त्यांच्या गुरुचाच आदेश त्यांनी पाळला होता. गुरूचा आदेश पाळणे हे शिष्याचे कर्तव्यच असते.
त्यांच्या आजूबाजूचा समाज मात्र अजिबात प्रगल्भ नव्हता. तो फार रूढी परंपरा आणि पुराणमतवादात अडकला होता. सारासार विचार करण्याची क्षमता हरवलेल्या त्या लोकांमध्ये आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींचा सद्सद्विवेकबुद्धीने विचार करण्या ऐवजी शास्त्रातून आपल्याला कळले तेवढेच खरे मानुन चालण्याची वाईट प्रथा पडली होती.
त्यांच्या संकुचित विचारांपायी विठ्ठलपंत आणि रखुमाई सारख्या निष्पाप लोकांचा विनाकारण जीव गेला होता.
लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take