एका गावात एक साधु महाराज राहायचे. गावातल्या मंदिरात पूजा, भजन कीर्तन करायचे. दिवसभर देवाचा जप करायचे. आजूबाजूच्या पंचक्रोशीत त्यांची मोठे देवभक्त म्हणुन ख्याती होती. अनेक लोक त्यांना भेटायला, आशीर्वाद घ्यायला यायचे.
एके वर्षी त्या विभागात प्रचंड पाऊस झाला. सरकारने अतिवृष्टी आणि पुराचा इशारा दिला. गावकरी हळू हळू गाव सोडून तात्पुरते दुसऱ्या ठिकाणी राहायला जाऊ लागले. जाताना ते या महाराजांनाही आपल्यासोबत चला म्हणुन बोलवायचे. पण साधु महाराज माझा देव आहे तो पर्यंत काही चिंता नाही म्हणुन तिथेच राहायचे.
गावातली पाण्याची पातळी वाढायला लागली तसे बहुतांश लोक गाव सोडून गेले, आणि महाराजांनाही विनवुन गेले. पण महाराजांनी ऐकले नाही. ते म्हणाले माझा देव आहे, मला काही होणार नाही.
पूर्ण गाव पाण्याखाली गेले तेव्हा उरल्या सुरल्या, कुठे अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी सैनिकांचे पथक होडी घेऊन आले, पण ते महाराज त्यातही गेले नाहीत.
पाणी खूप वाढले, अनेक घरे, मंदिरे पाण्याखाली गेले. तेव्हा ते महाराज मंदिरावर चढुन बसले आणि देवाला साद घालायला लागले कि देवा आता तूच ये आणि मला वाचव.
हेलिकॉप्टर मध्ये पाहणी करणाऱ्यांना ते महाराज दिसले आणि त्यांनीहि त्यांना हाका मारून तिथुन नेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी ऐकले नाही. त्यांना आता देवाने स्वतः प्रकट व्हावे आणि त्यांना वाचवावे अशी इच्छा होती.
शेवटी त्या पुरात त्या महाराजांचा अंत झाला. ते स्वर्गात गेले पण नाराज होते. त्यांनी देवाकडे तक्रार केली, कि मी आयुष्यभर तुझी भक्ती केली, तुझा जप केला, तुझ्या आराधनेत वेळ सर्व घालवला. तरीही मला वाचवायला काही तु आला नाहीस.”
देव त्याला म्हणाले. “अरे मुर्ख माणसा, तु इतकी भक्ती केलीस, त्या पुण्यामुळेच तुला स्वर्ग मिळाला. पण तुला वाचवायला मी आलो नाही असे कसे म्हणतोस. इतके माणसं तुला तिथुन चलण्याची विनंती करून गेले, ती होडी आली, ते हेलिकॉप्टर आले, ते कोणाच्या इच्छेमुळे?”
हे ऐकुन त्या महाराजांना आपली चुक समजली, आणि त्यांनी देवासमोर नतमस्तक होत त्यांची क्षमा मागितली.
लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take