जेव्हा जेव्हा मानवांवर, धर्मावर संकट येईल तेव्हा तेव्हा मी त्यांचे रक्षण करण्यासाठी अवतार घेऊन प्रकट होतो असे श्रीकृष्णाने अर्जुनाला कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर अर्जुनाला सांगितले. श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचे अवतार होते. पुराणांमध्ये विष्णूंनी वेगवेगळी रूपे घेऊन आपल्या लीला दाखवल्या आहेत. त्यापैकी दहा अवतार म्हणजे दशावतार हे प्रमुख समजतात. भगवान विष्णूंच्या दशावतारामध्ये मत्स्यावतार हा पहिला मानला जातो.
काही युगे आधी पृथ्वीवर अतिमहापुराच्या रूपात एक महाप्रलय येणार होता. या प्रलयात मानव समाज आणि जीवसृष्टीचा विध्वंस होऊन पूर्णतः नष्ट होण्याचा धोका होता. त्यामुळे या संकटापासुन सृष्टीला वाचवण्यासाठी भगवान विष्णूंनी मत्स्य रूपाने अवतार घेतला.
सुरवातीला त्यांनी अगदी लहान स्वरूपात सत्यव्रत राजाला दर्शन दिले. मनु राजा बद्रिवनात नदीकाठी आलेला होता. राजा अर्घ्य म्हणुन पाणी ओंजळीत घेत असताना एक लहानसा मासा त्याच्या हातात आला. त्याने राजाला आपण खुप लहान असल्यामुळे इतर मोठ्या माशांपासुन आपल्याला धोका असल्याचे सांगुन आपल्याला मोठे होईपर्यंत आश्रय देण्याची विनंती केली. राजाने त्याला आपल्या ओंजळीत थोड्या पाण्यासकट घेतले आणि राजवाड्यात नेऊन एका पात्रात ठेवले.
तो मासा फार लवकर त्या पात्रापेक्षा मोठा झाला तेव्हा राजाने त्याला हौदात सोडले. तो त्यापेक्षाही मोठा झाल्यावर राजाला त्याला पुन्हा नदीत सोडावे लागले. तो लवकरच अतिविशाल होऊन समुद्रात गेला.
आता राजाला हा मासा साधा नसुन काही तरी दैवी प्रकार असल्याचे समजले होते. त्याने माशासमोर हात जोडुन विनम्र होत आपली ओळख सांगण्याची विनंती केली. भगवान विष्णूंनी त्याला आपली ओळख सांगत येणाऱ्या प्रलयाची माहिती सांगितली.
राजाला एक जहाज बांधायला सांगितले. या जहाजात सर्व प्रकारचे बी-बियाणे, झाडे आणि प्राणी घेऊन यायला सांगितले. तसेच सप्तर्षी म्हणजेच सात थोर ऋषी यांनाही सोबत आणायला सांगितले. प्रलयाच्या दिवशी मी तुम्हाला वाचवीन असे आश्वासन दिले.
राजाने सांगितल्याप्रमाणे जहाज बांधले, आणि सर्वांना गोळा केले. पूर आला तेव्हा तो मोठा मासा जहाजांतल्या लोकांना वाचवायला आला. राजाने महाकाय वासुकी नागाच्या साहाय्याने जहाज त्या मत्स्यासोबत बांधले.
मत्स्याने त्या प्रलयात स्वतः पोहत जहाजाला तारले. प्रलय ओसरल्यावर राजाला पुन्हा नवी सृष्टी घडवण्यासाठी आशीर्वाद दिले. या राजाला मनु हे बिरुद मिळाले. त्याचे वंशज म्हणुन आपल्या समाजाला मानव म्हणतात.
वेगवेगळ्या पुराणांमध्ये हि कथा थोड्या वेगळ्या पद्धतीने सांगितली जाते. काही ठिकाणी राजाचे नावच मनु आहे तर काही ठिकाणी मनु हे एका राजाचे नाव नसुन ती राजाला मिळणारी पदवी आहे.
प्रलयाची अशीच कथा जगभरात वेगवेगळ्या प्राचीन संस्कृतींमध्ये प्रचलित आहे. प्राचीन काळी खरंच एक मोठा प्रलय मानवजातीने पाहिला असावा आणि त्यातुन वाचणाऱ्यांनी देवाची कृपा समजुन त्यावर वेगवेगळ्या कथा रचल्या असाव्यात असे म्हणतात.
या मत्स्यरूपातल्या विष्णूची भारतात काही मोजकी मंदिरे आहेत. जगाला वाचविणारा रक्षक म्हणुन मत्स्याची पूजा होते.
नारायण नारायण!!!
लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take
👌
धन्यवाद 🙂