You are currently viewing मंगळागौर

मंगळागौर

आटपाट नगर होतं. नगरात एक वाणी राहत होता. त्यांना अपत्य नव्हतं. त्याच्या घरी रोज एक गोसावी भिक्षा मागण्याकरता येत असे. पण भिक्षा घालायला वाण्याची बायको समोर गेलो कि “मी निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही” असे म्हणुन निघुन जात असे. वाण्याची बायको दुःखी होत असे. 

 तिने आपल्या नवऱ्याला हा रोजचा प्रकार सांगितला. नवऱ्याने तिला गोसावी येण्याच्या वेळेला भिक्षा घेऊन दाराआड तयार रहावे असे सुचवले. ती त्याप्रकारे तयारीत उभी राहिली आणि गोसावी घरासमोर येताच पटकन त्याला भिक्षा घातली. 

गोसाव्याचा निपुत्रिकाच्या घरी भिक्षा न घेण्याचा नेम मोडला म्हणुन तो फार रागावला. वाण्याने आणि त्याच्या बायकोने त्याचे पाय धरून त्याची क्षमा मागितली. गोसावी शांत झाला. त्याने नवऱ्याला सांगितले “निळ्या घोड्यावर निळे कपडे घालुन बस. रानात जा. जिथं घोडा एडेल तिथे खणायला लाग. देवीचं देऊळ लागेल. तिची प्रार्थना कर. तीच तुझी इच्छा पूर्ण करेल.” 

वाण्याने तसंच केलं. त्याला देऊळ सापडलं. त्याने देवीची मनापासुन प्रार्थना केली. देवी प्रसन्न झाली आणि वर मागायला सांगितले. वाण्याने सांगितले माझ्या आयुष्यात एक अपत्य सोडलं तर दुसरी काही कमी नाही. एक मुल द्यावं. 

देवीने सांगितले कि “तुझ्या नशिबात मुल नव्हते पण मी वर दिला आहे त्यामुळे मुल होईल पण काही अटींवर, अल्पायुषी मुलगा घेतलास तर गुणी होईल, दीर्घायुषी घेतलास तर जन्मांध होईल, कन्या घेतलीस तर तिला फार लवकर वैधव्य येईल. बोल तुझी काय इच्छा आहे?”

वाण्याने अर्थातच अल्पायुषी परंतु गुणी मुल मागितलं. देवीच्या आशीर्वादाने मुलगा झाला. उभयतांना मोठा आनंद झाला. तो हळू हळू मोठा होऊ लागला. त्याची आठव्या वर्षी मुंज केली. दहाव्या वर्षी त्याची आई ह्याचे आता लग्न करूया म्हणाली. मुलगा म्हणाला काशीयात्रे शिवाय लग्न करायचं नाही असा माझा संकल्प आहे

मग त्या मुलाला त्याच्या आई वडिलांनी काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठविलं. मामाभाचे काशीला जाऊ लागले. वाटेनं एक गाव लागलं. तिथं काही मुली खेळत होत्या. त्यातल्या दोघींचं भांडण झालं. मग एक मुलगी दुसऱ्या मुलीला रागारागात म्हणाली. “कसली नीच मुलगी आहे”. 

तेव्हा ती मुलगी म्हणाली, ‘माझी आई मंगळागौरीचं व्रत करते, आमच्या कुटुंबात कोणी नीच होणार नाही. मग मी तर तिची मुलगी आहे.” 

हे बोलणं मामानं ऐकलं. त्याला वाटलं अशा चांगल्या पुण्यवान घरच्या मुलीशी भाच्याचं लग्न झालं तर हा दीर्घायुषी होऊ शकतो. पण हे कसं घडवुन आणावं? त्या दिवशीं त्यांनीं त्याच गावी धर्मशाळेत मुक्काम केला. 

योगायोग म्हणजे दुसऱ्याच दिवशी त्या मुलीचं लग्न होतं. लग्नाच्या वेळेस नवरा मुलगा आजारी पडला. मुलाच्या आईबापांना प्रश्न पडला. त्यांनी विचार केला कोणी तरी प्रवासी मिळेल तर बरं होईल, त्याला पुढं करून वेळ साजरी करता येईल. त्यांना धर्मशाळेत गेल्यावर मामाभाचे दिसले. त्यांनी भाच्याला सोबत नेलं. गोरज लग्न लाविलं.

नवरा बायकोला गौरीहरापाशी निजवलं. दोघं झोंपीं गेलीं. मुलीला देवीनं दृष्टांत दिला. “अगं अगं मुली, तुझ्या नवर्‍याला चावायला एक साप येईल, त्याला पाजण्याकरता दूध ठेव. एक मडकं ठेव. दूध पिऊन साप मडक्यात शिरेल. एका कपड्याने मडक्याचे तोंड बांधून टाक. सकाळीं उठल्यावर  आईला तें वाण दे.” 

तिनं सगळी तयारी केली. सारं काही दृष्टांताप्रमाणंच घडलं. साप मडक्यात बंद झाला. कांही वेळानं तिचा नवरा उठला. त्याला भूक लागली होती. तिनं त्याला लाडू खायला दिले. फराळ झाल्यावर त्यानं तिला आपली अंगठी दिली. पहाटेस उठून ताट घेऊन पुन्हा धर्मशाळेत गेला. मामाभाचे काशीच्या दिशेने मार्गस्थ झाले. 

दुसऱ्या दिवशी मुलीनं सकाळीं उठून स्नान केलं, आणि देवीने सांगितलं तसं आपल्या आईला वाण दिलं. आई उघडून पाहूं लागली, तर सापाच्या ऐवजी हार निघाला. आईनं मुलीच्या गळ्यांत हार घातला. 

मग मुळ वर मंडपात आला. मुलीला समोर आणलं. ती म्हणाली, “हा माझा नवरा नाही. मी त्याच्याबरोबर जाणार नाही.” रात्रीची लाडवांची व अंगठीची खूण पटत नव्हती. तिच्या आईबापांना आता हीच नवरा कसा सापडेल असा प्रश्न पडला. त्यांनी अन्नछत्र चालू केलं. शेंकडो लोक येऊन जेवूं लागले.

इकडे मामाभाचे काशीस गेले. आणखी तीर्थांची यात्रा केली. एके दिवशी भाच्याला मूर्च्छा आली. यमदूत प्राण न्यायला आले. त्यांना मंगळागौर आडवी आली. त्यांचं युद्ध झालं. यमदूत पळून गेले. गौर अदृश्य झाली. 

भाचा जागा झाला, तसा आपल्या मामाला सांगूं लागला, “मला असं असं स्वप्न पडलं.” मामा म्हणाला, “ठीक झालं. तुझावरचं विघ्न टळलं. उद्यां आपण घरी जाऊ.” 

ते परतीच्या मार्गावर लग्नाच्या गावी आले. तळ्यावर स्वयंपाक करू लागले. दासींनीं येऊन सांगितलं. “इथं अन्नछत्र आहे तिथं जेवायला जा.” ते म्हणाले, “आम्ही परान्न घेत नाहीं.” 

दासींनीं यजमानणीस सांगितलं. त्यांनी पालखी पाठवली. आदरातिथ्यानं घरी नेलं. पाय धुतांना मुलीनं नवर्‍याला ओळखलं. नव-यानं आंगठी ओळखली. आईबापांनीं विचारलं. “तुझ्याजवळ खूण काय आहे?” त्यांनं लाडवांचं ताट दाखवलं. 

सर्वांना आनंद झाला. भोजनसमारंभ झाला. मामाभाचे सून घेऊन घरीं आले. सासूनं सुनेचे पाय धरले. “तुझ्यामुळं माझा मुलगा वाचला,” असं म्हणाली. तिनं सांगितलं. “मला मंगळागौरीचं व्रत असतं. ही सगळी तिची कृपा.” सासर माहेरचीं घरची दारची माणसं एकत्र आली, आणि त्या व्रताचं उद्यापन केलं.

तिला जशी मंगळागौरी प्रसन्न झाली, तशी तुम्हां आम्हां होवो, आणि आपलं सौभाग्य अखंड राहो, इतकीच देवाची प्रार्थना करा. ही धर्मराजाला कृष्णानं सांगितलेली साठा उत्तरांची कहाणी, पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

वर दिलेली गोष्ट हि मंगळागौरीच्या व्रताच्या महत्वाची पारंपरिक गोष्ट आहे. महाराष्ट्रात स्त्रिया लग्नानंतर पाच वर्ष मंगळागौरीचे व्रत करतात. गौरी म्हणजे पार्वती. शंकर आणि पार्वतीची जोडी आदर्श समजली जाते. पार्वतीने तप करून शंकराला प्राप्त केले होते. अशीच साथ आपल्याला मिळावी, आपल्या नवऱ्याला दीर्घायुष्य लाभावं म्हणुन हि पूजा केली जाते. 

ह्या पूजेच्या निमित्ताने इतर नुकत्याच लग्न झालेल्या मुलींना आवर्जुन बोलावले जाते. तसेच सर्व वयोगटातल्या बायकांना हळदी कुंकवाला बोलावुन उत्साहाने कार्यक्रम होतो. ह्या कार्यक्रमात बायका फुगडीसारखे अनेक पारंपरिक खेळ खेळुन मजा करतात. 

हल्ली बायकांच्या अनेक पारंपरिक खेळांचा विसर पडत चालला आहे. हे खेळ नियमित खेळण्यात येत नाहीत. त्यामुळे हे खेळ माहित असलेल्या बायकांच्या मंडळांना आजकाल मोठी मागणी असते. त्या कार्यक्रमात येऊन स्वतः हे खेळ खेळुन दाखवतात आणि इतर इच्छुकांकडून खेळून घेतात. 

लेखक: आकाश खोत

व्यवसाय एक (संगणक अभियंता) 
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )

माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा! 

वैयक्तिक ब्लॉगskyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल:  Thats My Take

प्रतिक्रिया व्यक्त करा