You are currently viewing मला काम हवंय…

मला काम हवंय…

मला काम हवंय… हे वाक्य असंख्य लोक म्हणतात. आयुष्याच्या सुरुवातीच्या कालखंडात तर नक्कीच. पण हि गोष्ट भारतातले श्रेष्ठ अभिनेते महानायक अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यातली आहे. 

आणि हि त्यांच्या सुरुवातीच्या संघर्षाच्या काळातली सुद्धा नाही. हा प्रसंग स्वतः अमिताभ बच्चन यांनी आपल्या मुलाखतीतून सांगितलेला आहे.

अमिताभ बच्चन यांचा तरुण नायक म्हणून चित्रपट गाजवण्याचा काळ संपला होता. त्यांनी राजकारणात मोठ्या गाज्यावाज्यात प्रवेश केला पण बोफोर्स घोटाळ्यात त्यांच्यावर आरोप झाले आणि त्यांनी राजकारण सोडले.

त्यानंतर त्यांचे काही चित्रपट गाजले पण बरेच आपटले. त्यांना आता मुख्य नायक म्हणून घेऊन केलेले चित्रपट चालत नव्हते.

त्यांनी स्वतःची एक कंपनी सुरु केली. अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड. ABCL या नावाने हि कंपनी प्रसिद्ध झाली कारण या कंपनीचे प्रचंड नुकसान झाले. चित्रपट निर्मिती आणि इव्हेन्ट मॅनेजमेंट अशा क्षेत्रात चांगली सुरुवात झाली तरीही नंतर हि कंपनी रसातळाला गेली. त्यांनी दुसऱ्या नटांना घेऊन निर्मिती केलेले चित्रपटही आपटायला लागले. 

त्यांच्या आजुबाजुला खुशमस्करे लोकांची गर्दी असावी. त्यांना चांगला सल्ला मिळाला नाही. कंपनीवर प्रचंड कर्ज झालं. देणेकरी तगादा लावायला लागले. शेवटी कंपनीला नाव अमिताभ बच्चन यांचं होतं. त्यामुळे लोक त्यांच्याच मागे लागत होते. 

कर्जबाजारी झाल्यामुळे अमिताभजी प्रचंड तणावात होते. अनेकांनी त्यांना दिवाळखोरी जाहीर करण्याचा सल्ला दिला. दिवाळखोरी जाहीर केल्यावर कर्जबाबतीतच्या कायदेशीर जबाबदाऱ्या कमी होतात. बच्चन साहेबांनी दिवाळखोरी जाहीर करायला नकार दिला. त्यांना तसे करून आपल्या आई वडिलांच्या नावाला बट्टा लावायचा नव्हता. 

बच्चन साहेबांनी आपले जुने मित्र यश चोपडा यांच्याकडे जायचे ठरवले. यश चोपडा म्हणजे एक प्रख्यात निर्माते आणि दिग्दर्शक. त्यांनी सोबत काम केले होते. त्यांचे घनिष्ट संबंध होते. 

यशजींचा बंगला अमितजींच्या अगदी जवळच होता. बच्चन साहेबांभोवती नेहमी चाहत्यांचा गराडा होत असल्यामुळे ते गाडीशिवाय कुठेही फिरत नसत. यावेळी मात्र मदत मागण्यासाठी जाताना गाडीत बसुन जाणे अमितजींना प्रशस्त वाटत नव्हते. 

ते पायी पायी यशजींच्या घरी गेले. अमिताभ बच्चन चालत चालत घरी आल्यामुळे त्यांच्या घरचे नोकर चाकर गोंधळले. त्यांनी यशजींना वर्दी दिली. यशजींनी अमितजींचे स्वागत केले. दोघे बोलत बसले. अमितजींनी त्यांना आपली परिस्थिती सांगितली. 

अमिताभ बच्चन यांची तेव्हाची परिस्थिती सतत वर्तमानपत्रात छापुन येत होती. सर्वांनाच त्याची कल्पना होती. यशजींनी त्यांना विचारले किती पैशांची गरज आहे? 

अमितजींनी पैसे घ्यायला नकार दिला. ते म्हणाले यशजी असे पैसे तर मला खुप जणांकडून मिळतील पण मला ते नकोत. मला काम हवंय. तुम्ही मला एखाद्या चित्रपटात काम देऊ शकता? 

यशजी चमकले. अमिताभ बच्चन यांनी आपल्या चित्रपटात काम करावं, आपण अमिताभ बच्चन सोबत काम करावं असं अनेक निर्माते, कथालेखक, अभिनेते, अभिनेत्री यांची वर्षानुवर्षे इच्छा असायची. आज ते अमिताभ बच्चन स्वतः त्यांच्या दारी येऊन चित्रपटात काम मागत होते. 

यशजींनी सांगितले कि मी सध्या स्वतः कोणता चित्रपट बनवत नाहीए, पण माझा मुलगा आदित्य त्याच्या नव्या चित्रपटावर काम करतोय, मी त्याला सांगतो. त्या चित्रपटाचं नाव मोहोब्बते. 

एका अति प्रतिष्ठित कॉलेजचा मुख्याध्यापक जो कडक शिस्तप्रिय असतो, आपल्या विद्यार्थ्यांनी अजिबात प्रेम बीम वगैरे भानगडीत लक्ष न घालता आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं अशा मताचा असतो. आणि त्याच्या तत्वांना आव्हान देणारा, खुल्या मनाने प्रेम करावं असं सांगणारा बंडखोर संगीत शिक्षक. 

अशा दोन मुख्य पात्रांच्या संघर्षाची कहाणी सांगणारा चित्रपट. डेड पोएट सोसायटी या हॉलिवूड चित्रपटाला टिपिकल हिंदी मसाला लावुन बनवलेला. 

अमितजींनी यात जीव ओतुन काम केलं. शाहरुख खान समोर एक तगडी भूमिका उभी केली. दुसरं कोणीही असतं तर शाहरुख खान समोर एवढं उठून दिसलं नसतं. अमितजी होते म्हणूनच हि भूमिका एवढी स्मरणीय झाली. मला हा चित्रपट विशेष आवडत नाही, पण अमितजी म्हणजे कमाल. 

या चित्रपटात दर दोन सिननंतर गाणी होती. म्युझिकल हिट. पण यात एक लक्षात राहणारा डायलॉग म्हणजे “परंपरा, प्रतिष्ठा और अनुशासन”. अमिताभ बच्चन यांच्या आवाजाशिवाय इतर कोणाची कल्पनाही करवत नाही. 

या चित्रपटामुळे अमितजींचं वयस्कर रूप प्रेक्षकांनी स्वीकारलं आणि त्यांना पुढे पुन्हा अनेक उत्तम  भुमीका करण्याचा मार्ग मोकळा झाला. पुन्हा खास त्यांच्यासाठी भूमिका लिहिल्या जाऊ लागल्या. 

कौन बनेगा करोडपती हा शो मिळाला, अनेक जाहिराती मिळाल्या. म्हातारपणातही अमितजी दुप्पट उमेदीने काम करायला लागले. 

आपलं सगळं कर्ज त्यांनी फिटवलं आणि पुन्हा एकदा भारतातले सर्वात जास्त टॅक्स भरणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत त्यांचे नाव येऊ लागले. 

मी सहसा गोष्टींच्या खाली तयार बोध लिहुन ठेवत नाही. प्रत्येक गोष्टीवरून आपण आपला बोध लावला तर छान लक्षात राहतो. प्रत्येकाची विचार पद्धती वेगळी असते त्यामुळे दुसऱ्याचे समजून घेतलेला बोध वाचला तर आपण आपला विचार करणं थांबवतो. 

पण यामधुन इतकं शिकण्यासारखं आहे, कि मला स्वतःला ते लिहावं वाटलं. 

  • अमितजींनी दिवाळखोरीचा सोपा मार्ग टाळला. आता झटपट ताण कमी करण्याऐवजी त्यांनी आई वडील आणि स्वतः आयुष्यभर कमावलेल्या प्रतिष्ठेची किंमत राखली. 
  • मोक्याच्या क्षणी अमितजींनी पैसे मागण्याचा मोह टाळला. ते केलं असतं तर आज यांच्याकडून उद्या त्यांच्याकडून असे पैसे घेण्याच्या चक्रात ते अडकु शकले असते. 
  • पैशाने प्रश्न तात्पुरता सुटतो. आपण आपल्याला जे चांगल्या प्रकारे करता येतं त्याकडे लक्ष दिलं, काम करून पैसे मिळवण्यावर लक्ष दिलं तर एक शाश्वत पर्याय उभा राहु शकतो. 
  • अमितजींनी गरज पडली तेव्हा आपला इगो बाजूला ठेवुन मोकळेपणाने काम मागितलं. पैसे मागण्या पेक्षा काम मागणं कधीही बरं आणि त्यात लाजायला नको. अडचणीच्या वेळी आपण आपले इगो कुरवाळत बसलो तर त्यातुन बाहेर येण्याच्या संधी दूर जाऊ शकतात. 
  • उत्तम काम करण्यासाठी, आयुष्यात पुन्हा भरारी घेण्यासाठी वयाला बंधन नसतं. 

तुम्हाला यात अजुन काही शिकण्यासारखं दिसलं तर खाली कमेंट मध्ये नक्की कळवा.

लेखक: आकाश खोत

व्यवसाय एक (संगणक अभियंता) 
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )

माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा! 

वैयक्तिक ब्लॉगskyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल:  Thats My Take

प्रतिक्रिया व्यक्त करा