एके काळी एक महिषासुर नावाचा असुरांचा राजा होता. तो अत्यंत बलवान होता.
त्याला तिन्ही लोकांवर (म्हणजे असुरांचा पाताळलोक, मानवांचा भुलोक आणि देवांचा स्वर्गलोक) अधिपत्य गाजवण्याची ईच्छा होती.
त्याने अमर होण्यासाठी तप सुरु केले. अनेक वर्षे कठोर तप केल्यावर ब्रह्मदेव प्रसन्न झाले.
ब्रह्मदेव प्रकट झाल्यावर त्यांनी महिषासुराला वर मागायला सांगितले.
महिषासुराने मला अमर करा अशी प्रार्थना केली.
ब्रह्मदेवांनी त्याला सांगितले “असा वर मी देऊ शकत नाही. जन्म झालेल्या प्रत्येक जीवाला मरण हे येतेच येते. तुला मरण कसे यावे हे मात्र तु ठरवु शकतोस.”
महिषासुराने सांगितले कि मला एखाद्या स्त्रीच्याच हातुन मरण यावे. अन्य कोणाच्याही नाही.”
ब्रह्मदेव तथास्तु म्हणुन अंतर्धान पावले.
महिषासुर प्रचंड आनंदित झाला. पुरुष योद्धे लढले तर लढले परंतु आपल्याशी लढु शकेल अशी स्त्री अस्तित्वातच नाही, असा त्याला विश्वास होता.
बलवान तर तो होताच पण आता या वरामुळे आपल्याला कोणीही मारू शकत नाही या आत्मविश्वासाने तो पेटून उठला.
त्याने असुरांचे सैन्य घेऊन तिन्ही लोक काबीज केले आणि आपले राज्य प्रस्थापित केले.
पण तो इथेच थांबला नाही.
त्याच्या बळाचा गर्व आता त्याच्यावर हावी झाला होता.
त्याला कमजोर लोकांवर आपल्या बळाचा प्रयोग करून त्रास देण्यात आनंद येत होता.
त्याला रोखायला कोणीही समोर येत नव्हते.
त्याने सूर्य आणि चंद्राच्या नित्यक्रमात सुद्धा अडथळे आणले.
आता दिवस उगवेल कधी, मावळेल कधी, भरती ओहोटी, पाऊस पाणी कशाचाच नेम राहिला नाही.
समस्त मानव त्रस्त झाले होते.
इंद्र देवांना घेऊन ब्रह्मदेवाला भेटायला गेले. तेव्हा भगवान शिव आणि भगवान विष्णु तिथेच होते.
देवांनी सर्वांची व्यथा मांडली.
त्रिदेवांच्या मनात एकाच वेळी महिषासुराला संपवायलाच हवे हा विचार आला आणि त्यातुन एक ऊर्जा प्रकट झाली.
ह्या ऊर्जेने दुर्गादेवीचे रूप घेतले.
महादेवांनी तिला आपल्यासारखे त्रिशुळ दिले. विष्णूंनी आपल्यासारखे चक्र दिले. सर्व देवांनी आपापल्या परीने आयुधे दिली, आणि शक्ती प्रदान केली.
दुर्गादेवी एका वाघावर बसुन निघाली.
महिषासुराच्या महालाजवळ येताच तिने एक महाभयंकर गर्जना केली.
त्या आवाजाने सगळीकडे थरकाप उडवला.
महिषासुराने आपल्या सैनिकांना काय झाले ते बघायला पाठवले.
सैनिकांना दुर्गादेवीकडे पाहुन एवढ्या सुंदर स्त्रीने अशी गर्जना केली असेल असे वाटले नाही.
त्यांनी महिषासुराला जाऊन सांगितले कि बाहेर एक अत्यंत सुंदर स्त्री वाघावर बसुन आली आहे.
महिषासुराला आश्चर्य वाटले. एक सुंदर स्त्री वाघासारख्या प्राण्यावर बसुन यायची हिम्मत करते याचे त्याला कौतुक वाटले.
त्याने आपल्या दूताला पाठवुन देवीला लग्नाची मागणी घातली.
देवीने त्याची मागणी धुडकावुन लावली. ती त्याला म्हणाली “मला महिषासुरासारख्या अत्याचारी राक्षसाशी लग्न करण्याची अजिबात इच्छा नाही. उलट मी त्याचा अत्याचार थांबवण्यासाठी आले आहे.”
महिषासुर हे ऐकुन भडकला. त्याने आपल्या काही वीर योद्ध्यांना तिला बंदी बनवायला पाठवले.
देवीने त्यांचा नायनाट केला.
महिषासुराने आपल्या सैन्याला तिच्यावर आक्रमण करण्याचे आदेश दिले.
सैन्य देवीवर हल्ला करायला चालुन जात असताना देवीची अनेक रूपे प्रकट झाली आणि त्यांनी सैन्याचा दारुण पराभव केला.
आता महिषासुराला स्वतः युद्धात उतरावे लागले.
त्याचे आणि देवीचे युद्ध अनेक दिवस चालले.
महिषासुराने आपली मायावी शक्ती वापरत रेडा (त्याचे नाव महिष म्हणजेच रेडा), सिंह, हत्ती, वाघ अशी रूपे धारण करून देवीवर हल्ले केले.
देवीने त्याचे सर्व हल्ले परतवुन लावले.
शेवटी तो पुन्हा रेड्याचे रूप धारण करून पूर्ण शक्तीनिशी देवीवर धावुन गेला, देवीने त्याचा त्रिशुळाने वध केला.
महिषासुराच्या अन्यायापासुन जगाला मुक्त केल्यामुळे देवीला दुर्गादेवीला महिषासुर-मर्दिनी असे म्हणतात.
लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take
छान माहिती मिळाली
सुंदर …….
महिषासुराचा म्हसोबा कसा झाला.. व लोक त्याला कसे पूजायला लागले तेही सांगावं.
Pingback: दसरा वर निबंध | Essay on Dussehra in Marathi
आम्ही सर्व शेतकरी असुरांचे वंशज आहोत.आम्ही राजा बळी, महसोबा, नाग, सूर्य,महादेव मंदिरातील पिंडीची पूजा करतो.