महाराष्ट्रात कुठल्याही जाहीर कार्यक्रमात “जय हिंद, जय महाराष्ट्र” असे म्हणतात. बऱ्याचशा इतर राज्यांमध्ये जय हिंद नंतर राज्याचेही नाव घ्यायची पद्धत नाही. त्यामुळे त्यांना महाराष्ट्रात एखादा कार्यक्रम पाहिला कि या गोष्टीचे आश्चर्य वाटते.
ह्याचे कारण त्यांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नसतो. त्यांनाच काय, बऱ्याच महाराष्ट्रीय लोकांनासुद्धा तो माहित नसतो.
आपले महाराष्ट्र राज्य हे आज जसे दिसते, तसे ते सहजासहजी घडले नव्हते. ब्रिटिशकालीन प्रांत रचना फार वेगळी होती. भारतात बरीच संस्थाने तिथले संस्थानिक चालवत असत. उदाहरणार्थ, महाराष्ट्राचा आजचा मराठवाडा भाग हा हैदराबाद च्या निजामाच्या अधिपत्याखाली होता. उरलेल्या प्रदेशाची ब्रिटिशांनी आपली प्रशासकीय किंवा राजकीय सोय पाहुन विभागणी केली होती.
स्वातंत्र्यानंतर एक एक करत सर्व संस्थाने भारत राष्ट्रात विलीन झाली. सरकारने भाषावार प्रांतरचना करत राज्यांची विभागणी केली. यात मराठी भाषिकांसाठी मात्र वेगळे राज्य नव्हते. विदर्भ हे वेगळे राज्य असावे, उरलेला प्रांत आणि गुजराती प्रदेश यांचे एकत्र द्वैभाषिक राज्य असावे अशी शिफारस केली गेली.
त्यानुसार राज्ये अस्तित्वात येऊन मोरारजी देसाई या द्वैभाषिक राज्याचे मुख्यमंत्री झाले. मराठी भाषिकांची सर्व मराठी प्रदेश, मुंबईसह एकाच राज्यात यावा हि मागणी होती. या मागणीसाठी तीव्र आंदोलन करावे लागले.
मोरारजी देसाईंनी हे आंदोलन कडक कारवाईने दाबण्याचा खुप प्रयत्न केला. त्यात मुंबईमध्ये निदर्शकांवर गोळीबार झाला आणि १०७ लोक धारातीर्थी पडले.
अखेर सरकारला लोकांची मागणी मान्य करावी लागली. १ मे १९६० ला यशवंतराव चव्हाण नवीन महाराष्ट्र राज्याचा मंगल कलश घेऊन आले. ते या राज्याचे पहिले मुख्यमंत्री झाले.
तेंव्हापासून १ मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणुन साजरा होतो. या दिवशी सरकारी सुट्टी असते. महाराष्ट्रभरात झेंडावंदन केले जाते. या राज्यासाठी जीव दिलेल्या हुतात्म्यांचे स्मरण केले जाते.
ह्या हुतात्म्यांचे एक स्मारक मुंबईमध्ये फ्लोरा फाउंटन येथे आहे. हि जागा हुतात्मा चौक म्हणुन ओळखली जाते.
जसे आपल्याला स्वातंत्र्यासाठी लढावे लागले तसेच या राज्याच्या निर्मितीसाठीही लढावे लागले. त्यामुळे महाराष्ट्रात जय हिंद इतक्याच अभिमानाने जय महाराष्ट्र असे म्हटले जाते. पण जय हिंद म्हणजेच राष्ट्र हे राज्याच्या अगोदरच येते हे सर्वांना माहित असते.
लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take