एक मुलगा तलावात पोहायला गेला. त्याला नुकताच पोहायला शिकला होता, त्याला पोहण्याचा फार काही अनुभव नव्हता.
पोहता पोहता तो तलावात जरा आत गेला जिथे खोली जास्तच होती. त्याला जेव्हा हे लक्षात आले तेव्हा तो फार घाबरला आणि हातपाय मारायला लागला. पण भीतीमुळे त्याला नीट पोहता येईना. तो ओरडायला लागला.
एक वाटसरू तिथुन जात होता. त्या मुलाने त्याला जोरात हाक मारून वाचवायची विनंती केली. तो वाटसरू मुलाला पाहुन तावातावाने बोलायला लागला.
“अरे मूर्खां तुला पोहता येत नव्हतं तर इतक्या आत गेलास कशाला? कोणी सोबत नसताना तू एकटा तलावावर आलासच कशाला?”
त्याच्या मागुन अजुन एक वाटसरू आला, पण त्यानं मुलाला पाहुन लगेच तलावात उडी मारली आणि पोहत जाऊन त्या मुलाला घेऊन बाहेर आला.
पहिला वाटसरू अजुन तिथेच होता.
दुसरा वाटसरू पहिल्याला म्हणाला.
“दादा, तुम्ही जे काही ओरडत होतात, ते बरोबरच आहे. पण ते सांगायची हि वेळ नव्हती. आधी जीव वाचवणे महत्वाचे. जीव वाचला तर ज्ञान द्यायला पुढे आयुष्य पडलं आहे. मुलगा बुडाला असता तर तुमच्या उपदेशाचा त्याला काही एक उपयोग नव्हता.”
लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take