भारतात प्राचीन काळापासून अनेक कवी होऊन गेले. वाल्मिकींनी रामायण आणि व्यासांनी महाभारत हे काव्याच्याच स्वरूपात लिहिलं आहे. कालिदास हा याच परंपरेतला एक सर्वश्रेष्ठ संस्कृत भाषक कवी आणि नाटककार होता. कालिदासाला कविराज, कविकुलगुरू असे आदराने म्हटले जाते.
त्याच्यानंतर होऊन गेलेल्या दिग्गज संस्कृत कवी मंडळींनीच त्याला हि उपमा बहाल केली आहे. आपल्याच क्षेत्रातल्या लोकांकडून आदर आणि सन्मान कमावणारे लोक दुर्मिळ असतात.
दुर्दैवाने आपल्याकडे इतिहास चांगल्याप्रकारे लिहून ठेवण्याची परंपरा नव्हती. त्यामुळे असे महान लोक होऊन गेले तरी त्यांच्या आयुष्याबद्दल नेमकी माहिती उपलब्ध नसते. कालिदासाचेही असेच आहे. त्याने एकास वरचढ एक काव्ये आणि नाटक लिहिले असले तरी पद्धतशीर आत्मचरित्र लिहिले नाही. त्यामुळे त्याचा जन्म मृत्यू आणि आयुष्याचा घटनाक्रम आपल्याला नेमका माहित नाही.
आणि असे असेल तर अनेक दंतकथा पसरतात तशाच कालिदासाबद्दल सुद्धा काही समज आहेत. त्याच्याच साहित्यातले वर्णन आणि मजकुराचा आधार घेऊन लोकांनी त्याचे जन्मस्थान, तो जास्त करून कुठे राहिला असेल याबद्दल अनेक अंदाज बांधले आहेत पण त्यात एकवाक्यता नाही.
त्याचे नाव पण खरे तेच होते कि तो कालीचा भक्त असल्यामुळे त्याने ते नाव घेतले हे पक्के माहित नाही. बरेच लेखक आणि कवी आपल्या साहित्यकृतींवर काहीतरी वेगळे नाव लावतात.
त्याच्याविषयी एक लोकप्रिय दंतकथा अशी आहे.
या कथेनुसार कालिदास खरं तर अजिबात विद्वान किंवा बुद्धिमान नव्हता. तो एक साधा मेंढपाळ होता. तो जिथे राहत होता त्या राज्यात राजाला एक सुंदर आणि बुद्धिमान राजकन्या होती.
राजाच्या प्रधानाला असे वाटत होते कि आपल्या मुलाचे लग्न राजकुमारीशी व्हावे. त्याने राजासमोर तसा प्रस्ताव मांडला. राजाने तो धुडकावुन लावला. मला राजकुमारीसाठी “सकल विद्यासंपन्न” बुद्धिमान वर हवा आहे असे सांगितले.
प्रधानाने हे मनाला लावुन घेतले. राजाने आपल्याला आणि आपल्या मुलाला मूर्ख ठरवले असे त्याला वाटले. त्याने याचा सूड घ्यायचे ठरवले.
राजकुमारिला हवा त्याविरुद्ध असा कालिदास त्याने बघितला आणि त्याला पढवुन तयार केले. राजा आणि राजकुमारी काय बोलतील याचा अंदाज घेऊन चांगली उत्तरे द्यायला त्याला तयार केले.
चक्क कालिदास राजकुमारिला आवडला, आणि त्यांचे लग्न झाले. पण काही दिवसातच आपली फसवणुक झाली हे राजकुमारीला कळले आणि तिने कालिदासाचा फार अपमान केला. हा अपमान कालिदासाच्या जिव्हारी लागला आणि तो बदलला.
कालिदासाच्या काही कथांमध्ये हा अपमान लग्नाच्या आधीच झाला. लग्न झालेच नव्हते. अपमान झाल्यावर उद्विग्न होऊन तो निघुन गेला.
गोविंदाच्या “कुली नंबर वन”शी मिळतीजुळती कथा आहे ना? त्यात नायिकेच्या (करिष्मा कपूर) बापाला (कादर खान) अतिश्रीमंत माणसाशी आपल्या मुलीचं लग्न करायचं असतं. तो एका पुजाऱ्याने (सदाशिव अमरापूरकर) आणलेल्या स्थळाचा अपमान करतो. अपमानाचा बदला घ्यायला पुजारी एका हमालाला (गोविंदा) एक श्रीमंत व्यावसायिकाचं सोंग घेऊन पाठवतो आणि त्यांचं लग्न लावुन देतो. पुढची कथा अर्थात वेगळी आहे.
राजकुमाराने अपमान करून तिथुन निघुन गेल्यावर कालिदासाने शास्त्रे पुराणे वाचली, अभ्यास केला. देवीची साधना केली. देवीने त्याला प्रतिभा बहाल केली. त्याला हळुहळु लिहिण्याची इच्छा व्हायला लागली. त्याने मग सुंदर काव्ये लिहिली. त्याच्या काव्य आणि नाटकांमध्ये पुराणातल्या घटना छान रंगवुन फुलवुन सांगितल्या आहेत.
तो राजकुमारीकडे परत आला तेव्हा तिने त्याला संस्कृतमध्ये विचारले “अस्ति कश्चित् वाग्विशेष?” याचा शब्दशः अर्थ असा कि आता तुझ्याकडे काही चांगलं विशेष (हुशारीचं) बोलण्यासारखं आहे का? म्हणजे तो अपमानित होऊन गेला आणि आता परत आला तर त्याने काही ज्ञान मिळवले कि तसाच परत आला आहे?
तर उत्तरादाखल कालिदासाने ह्या वाक्यातले तिन्ही शब्द केले आणि एका एका शब्दापासुन सुरु होणारी कलाकृती निर्माण करून दाखवली.
अस्ति या शब्दापासुन “कुमारसंभव” सुरु होते. कश्चीत या शब्दापासुन “मेघदूत” सुरु होते. आणि वाग्विशेष या शब्दापासुन “रघुवंश” सुरु होते.
“कुमारसंभव” या काव्यात शंकर पार्वतीचा विवाह आणि कुमार कार्तिकेयाच्या जन्माची कथा आहे. “रघुवंश” मध्ये राम ज्या वंशात जन्मले त्या रघुवंशाची कथा आहे. हे दोन महाकाव्य म्हणजे आकाराने मोठे काव्य आहेत.
मेघदूत हे कालिदासाच्या स्वतःच्या कल्पनेचा अविष्कार आहे. यात एक यक्ष आपल्या प्रिय पत्नीपासुन दुरावला असतो. त्याला बायकोची फार आठवण येत असते. तिच्याशी बोलावं वाटत असतं. पण तो तिच्यापासुन फार दूर असतो. मग तो समोर एका ढगाला विनंती करतो कि माझा संदेश तुच आकाशात फिरत फिरत माझ्या गावी जा आणि माझ्या प्रियेला दे.
ढग म्हणजे मेघ. मेघाला दुत बनवले म्हणुन मेघदूत. मग तो ढगाला आपल्या मनातल्या भावना सांगतो. बायकोसाठी संदेश सांगतो. ढगाने कसे त्याच्या गावी जावे त्यासाठी रस्ता सांगतो. त्या रस्त्यातल्या जागांचे सुंदर वर्णन करतो.
एवढी वेगळी आणि सुंदर कल्पना कालिदासच करू जाणे.
कालिदासाने संस्कृत मध्ये नाटके सुद्धा लिहिली. “अभिज्ञान शाकुंतलम्” मध्ये ऋषिकन्या शकुंतला आणि राजा दुष्यंत यांची गोष्ट आहे. “मालविकाग्निमित्रम” हि मालविका आणि अंगमित्राची कथा, “विक्रमोर्वशियम” हे राजा पौरवस आणि उर्वशी यांची कथा असलेली नाटकेसुद्धा त्याने लिहिली आहेत.
मराठी रंगभूमीवरचे पहिले संगीत नाटक म्हणजे “संगीत शाकुंतल”. हे कालिदासाच्याच नाटकावर आधारित होते. त्याचे अण्णासाहेब किर्लोस्करांनी मराठी नाट्यगीते आणि संवाद लिहुन मराठीत रूपांतर केले. ह्या नाटकाने इतिहास घडवला, संगीत नाटकांचा सुवर्णकाळ सुरु केला.
ह्या नाटकाची सुरुवात एका नांदीने व्हायची. “पंचतुंड नरगुंडमालधर” हे गीत फार लोकप्रिय आहे. बालगंधर्व चित्रपटामुळे ते आजच्या पिढीपर्यंतही पोहोचले.
पंचतुंड नररुंडमालधर पार्वतीश आधीं नमितों ।
विघ्नवर्गनग भग्न कराया विघ्नेश्वर गणपति मग तो ॥
कालिदासकविराजरचित हें गानीं शाकुंतल रचितों ।
जाणुनियां अवसान नसोनि हें महत्कृत्यभर शिरीं घेतों ॥
ईशवराचा लेश मिळे तरि मूढयत्न शेवटिं जातो ।
या न्यायें बलवत्कवि निजवाक्पुष्पीं रसिकार्चन करितो ॥
ह्या गाण्यात सुरुवातीला गणपतीची स्तुती करून नंतर व्यक्त केलेली भावना अशी आहे कि कविराज कालिदासाने रचलेले हे शाकुंतल मी गीते रचुन सादर करण्याचे धाडस करत आहे. देवाचा थोडाजरी आशीर्वाद मिळाला तर मूर्खाचे प्रयत्नसुद्धा सफल होतात. तसंच माझ्यावरही कृपा होईल या भावनेने मी हि कलाकृती रसिकांना अर्पण करतो.
कालिदासानंतर हजारो वर्षांनी त्याच्या कलाकृतीवर दुसऱ्या एका महान कलावंताने नाटक बसवले आणि त्याला अशी भावपूर्ण मानवंदना दिली.
पूर्वीच्या काळी आजसारखी प्रकाशन व्यवस्था, पुस्तकांतुन उत्पन्न असे प्रकार नव्हते. अशा प्रतिभावान कलावंतांचा त्याकाळातले राजे आपल्या दरबारात सत्कार करत, त्यांना राजकवी, राजगायक अशा पदव्या बहाल करून दरबारात ठेवुन घेत. त्यावरच त्यांचा चरितार्थ चालत असे.
असे म्हणतात कि कालिदास राजा विक्रमादित्याच्या दरबारात होता. किंवा राजा भोजाच्या दरबारात होता. ह्या दोन्ही नावाच्या राजांबद्दल अनेक कथा दंतकथा आहेत त्यामुळे ते फक्त एका खऱ्या राजाचे नाव होते कि चक्रवर्ती सम्राट सारखी विक्रमादित्य हीसुद्धा अनेक राजांनी धारण केलेली एक पदवी होती याबद्दलही संभ्रम आहे.
कालिदास आणि भोज राजाची एक कथा वाचा इथे: ठंठं ठठंठं ठठठं ठठंठ:।
कालिदासाच्या मृत्यूबद्दल अशी दंतकथा आहे कि श्रीलंकेचा राजा कुमारदास हाही एक कवी होता. त्याने एक कवितेची ओळ लिहुन त्याच्या पुढची समर्पक ओळ लिहिणाऱ्याला बक्षीस जाहीर केले होते. ती ओळ अर्थातच कालिदास सोडून दुसऱ्याला जमणे शक्य नव्हते.
कुमारदासाच्या एका दरबारातल्या व्यक्तीने कालिदासाकडून ती ओळ लिहुन घेतली आणि बक्षिसाच्या हावेने कालिदासाला मारले. कुमारदासाने त्याचा बनाव ओळखला आणि त्याला कालिदासाच्या मृत्यूबद्दल समजले तेव्हा त्याला प्रचंड दुःख झाले. दुःखाच्या भरात त्याने पळत जाऊन कालिदासाच्या चितेत उडी घेत स्वतःसुद्धा जीव दिला.
कालिदासाच्या जन्म मृत्यू आणि खऱ्या आयुष्याबद्दल असे अनेक मतप्रवाह, कथा दंतकथा असल्या तरी त्याच्या कार्याच्या महानते विषयी कोणालाही शंका नाही.
इंग्रज भारतात आले तेव्हा त्यांच्यातल्या अभ्यासकांनी भारताच्या संस्कृती, भाषा आणि साहित्याचा सखोल अभ्यास केला. तोवर त्यांना शेक्सपिअर हाच सर्वश्रेष्ठ साहित्यिक असल्याचे वाटत होते. कालिदासाचे साहित्य वाचुन ते प्रभावित झाले.
त्यांनी कालिदासाला भारताचा शेक्सपिअर असे संबोधले. खरेतर कालखंड पाहता कालिदास फार आधी होऊन गेला आहे. त्यामुळे शेक्सपीअरला इंग्लंडचा कालिदास म्हणावे. पण इतिहास हा जेते लिहितात. त्यामुळे शेक्सपिअर ऑफ इंडिया हि एक कालिदासाची अलीकडच्या काळात रूढ झालेली अजुन एक ओळख आहे.
मेघदूताच्या सुरुवातीला आषाढ महिन्याचा उल्लेख आहे. “आषाढस्य प्रथम दिवसे” म्हणजे आषाढाच्या पहिल्या दिवशी, असा तो उल्लेख आहे. कालिदासाच्या जन्माबद्दल नेमकी माहिती नसल्यामुळे त्याच्याच मेघदूतातल्या ह्या ओळींचा आधार घेऊन आषाढाचा पहिला दिवस कालिदासाचा जन्मदिन साजरा होतो.
लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take
Khupach chhan watla wachun. Excellent work🙂
खुप छान.. थोडक्यात पण खुप काही सांगणारी लेखणी आहे तुझी
खुप खुप शुभेच्छा