महाराष्ट्रातल्या भक्ती मार्ग शिकवणाऱ्या सर्वच संतांचं पंढरपुरातल्या पांडुरंग विठ्ठलाशी फार घट्ट नातं आहे. सर्वच संतांनी या विठोबाची आणि रखुमाईची (रुक्मिणी) मनोभावे भक्ती केली. त्यांच्यावर अभंग, ओव्या, भजन अशा वेगवेगळ्या प्रकाराने काव्य रचले.
देवधर्म हा रुढी परंपरा, जातीभेद, अस्पृश्यता, कर्मठ रीती यांच्यात बंदिस्त झाला होता. सामान्य लोक देवाला पारखे होत होते. या विठोबाने मात्र कुठलेही भेद न पाहता आपल्या भक्तांचे लाड केले. त्यांच्या इच्छा पूर्ण केल्या. त्यांच्या घरातला सदस्य होऊन राहिला. त्यामुळे सर्व संतांनी आणि भक्तांनी विठोबावर अपार प्रेम केले.
त्याचे दर्शन घ्यायला त्यांना पुन्हा पुन्हा जावे वाटायचे. दर्शन व्हावे, पुन्हा पुन्हा विठ्ठलाची भेट व्हावी, त्यानिमित्ताने इतर भक्तांचा, संतांचा सहवास लाभावा म्हणुनच दर वर्षीची वारी सुरु झाली.
वारकरी संप्रदायातले आद्य संत ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडे अर्थातच विठ्ठलाचे भक्त होते. त्यांच्याच काळात संत नामदेव, संत गोरा कुंभार, संत चोखा मेळा असे इतरही संत होऊन गेले.
संत नामदेव हे तर लहानपणापासुन विठ्ठलाचे परमभक्त होते. त्यांनी दाखवलेला नैवेद्य खायला स्वतः विठ्ठलाला यावे लागायचे, त्याशिवाय ते जेवायचे नाहीत. त्यांनी सुद्धा असंख्य अभंग आणि भजने लिहिली होती. ते विठ्ठलाचे इतके मनापासुन आणि प्रेमाने कीर्तन करत कि साक्षात मूर्तिरूपाने उभा विठ्ठलसुद्धा मान डोलावत असे.
त्यांच्या कीर्तनाचा आनंद घ्यायला निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपान आणि मुक्ताबाई गेले. मन लावुन कीर्तन ऐकले. कीर्तनानंतर ते नामदेवांना भेटायला गेले. निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपान सर्वांनी त्यांना एक एक करत नमस्कार केला. त्यांनी मात्र परतुन नमस्कार केला नाही.
विठ्ठलाशी त्यांची जी जवळीक झाली होती त्यामुळे त्यांच्या मनात थोडा अहंकार उत्पन्न झाला होता. आपणच विठ्ठलाचे सर्वात मोठे भक्त आहोत तेव्हा दुसऱ्या संतांनी आपला आदर करावाच पण आपण दुसऱ्या संतांना आदर देण्याची काय गरज अशी काहीशी त्यांची भावना होती.
मुक्ताबाईने हे ओळखले आणि त्यांना नमस्कार केला नाही. ती म्हणाली नामदेवांचं ज्ञान अर्धवट आहे. त्यांना नमस्कार करण्याची गरज नाही.
हे ऐकुन तिचे भाऊ तर चमकलेच पण नामदेवसुद्धा व्यथित झाले. त्यांच्यात वाद झाला.
संत गोरा कुंभार या सर्वांना वरिष्ठ होते. ते सर्वजण निवाडा करायला त्यांच्याकडे गेले. गोरा कुंभारांनी त्या सर्वांच्या डोक्याला हात लावून मडके तपासल्यासारखे तपासले. ते कुंभाराच्या परिभाषेत म्हणाले मुक्ताई म्हणते ते खरंय, नामदेवांचं मडकं कच्चं आहे.
नामदेव दुःखी होऊन आपल्या विठ्ठलापाशी गेले. विठ्ठल म्हणाले ते लोक म्हणतायत ते खरं आहे. तु मला फक्त मला माझ्या विठ्ठल ह्या एकाच रूपात जाणतोस आणि पूजतोस. तुला एका गुरुची गरज आहे. ज्ञानेश्वराकडे जा तेच तुला मार्ग दाखवतील.
नामदेव ज्ञानेश्वरांकडे गेले. त्यांनी नामदेवाला विसोबा खेचर ह्यांना भेटायला सांगितले. हे तेच विसोबा खेचर जे आधी ज्ञानेश्वर आणि त्यांच्या कुटुंबाचा मत्सर करत होते पण ज्ञानेश्वरांची पाठीवर मांडे भाजण्याची लीला पाहून त्यांचे भक्त झाले होते.
त्यांनी नामदेवाला शिष्य करून उपदेश केला आणि नामदेवांचं ज्ञान पूर्ण केलं.