स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ह्यांनी अनेक प्रकारे स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला होता. अगदी तरुण वयात त्यांनी अभिनव भारत संघटनेची स्थापना केली. लोकमान्य टिळकांच्या जहाल मतवादी विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्यांनी पुण्यात लकडी पुलावर विदेशी कपड्यांची होळी केली होती.
पुढे ते लंडनला शिकुन बॅरिस्टर (वकील) होण्यासाठी गेले. तिथेही स्वस्थ बसले नाहीत. इंडिया हाऊस, फ्री इंडिया चळवळीत सहभाग घेतला. ते तिथुन गुप्त रित्या भारतातल्या क्रांतिकारकांसाठी हत्यारे सुद्धा पाठवत होते.
त्यांनी १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धावर एक तेजस्वी पुस्तक लिहिले. त्यांची भाषणे आणि लिखाण याचा प्रभाव ब्रिटिशांना चांगलाच माहित असल्यामुळे त्यांनी भारतात या पुस्तकावर प्रकाशनाआधीच बंदी आणली. ते पुस्तक इंग्लंडमधेही प्रकाशित होऊ दिले नाही आणि पॅरिसमध्ये ते प्रकाशित होऊ नये म्हणुन फ्रान्सवर दबाव आणला.
तरीही सावरकरांच्या सहकाऱ्यांनी हार मानली नाही. नेदरलँड्समध्ये ते पुस्तक इंग्रजीत प्रकाशित केले आणि बाहेर इतर लोकप्रिय इंग्रजी पुस्तकांचे वेष्टण आणि आतमध्ये हे पुस्तक अशा प्रकारे युक्ती लढवुन त्याच्या अनेक प्रती भारतात आणुन वितरित केल्या. बंदी असुनही वेगाने त्या पुस्तकाचा प्रसार झाला. अनेक तरुणांना त्या पुस्तकाने प्रेरित केले.
शेवटी सावरकरांना अशा उपक्रमांमुळे लंडन मध्ये अटक केली आणि जहाजाद्वारे भारतात आणून देशद्रोहाचा खटला चालवला. तेव्हा ब्रिटिशांचे राज्य असल्यामुळे ब्रिटिश सरकार विरुद्ध काही करणे म्हणजे त्यांच्या लेखी देशद्रोह होता.
भारतात आणत असताना त्यांनी जहाजातुन जगप्रसिद्ध उडी मारत सुटकेचा साहसी प्रयत्न केला, पण तो फसला. ती एक वेगळीच गोष्ट आहे.
खटल्यामध्ये त्यांना दोषी ठरवुन २ जन्मठेपांची शिक्षा सुनावण्यात आली. त्यांना फाशी करण्याइतपत त्यांच्यावर आरोप सिद्ध झाले नव्हते. पण तरीही ब्रिटिशांना त्यांना कठोर शिक्षा द्यायची होती. एक जन्मठेप म्हणजे २५ वर्षांचा कारावास. अशा दोन जन्मठेपा म्हणजे ५० वर्षांचा कारावास.
आणि या शिक्षेची जागा त्याहुन भयंकर. अंदमान बेटावरचा तुरुंग. आज अंदमान निकोबार फिरायला जाण्यासाठी लोकप्रिय असला तरी तिथे त्याकाळी फक्त शिक्षेसाठी पाठवत असत. भारताच्या मुख्य भुमीपासुन बरेच लांब असलेल्या या बेटावर ब्रिटिशांनी वसाहत करून एक तुरुंग बांधला होता. तिथे अतिशय खतरनाक अपराध्यांना पाठवत असत. तिथे कैद्यांकडुन फार सक्त मजुरी करून घेतली जात असे. बरेच कैदी तिथेच मरत असत. त्यामुळेच या जागेला काळ्या पाण्याची शिक्षा म्हटले जात असे.
आज मी हे लिहितोय (२०२१) तेव्हा कोरोनाचा काळ चालु आहे. मागच्या वर्षी आणि यावर्षी महामारीमुळे पुन्हा पुन्हा लॉकडाऊन करावे लागतेय. सतत घरात राहावे लागल्यामुळे लोकांच्या मानसिकतेवर परिणाम होतोय अशा बातम्या वाचायला मिळतात.
विचार करा, जर एक साधे लॉकडाऊन लोकांवर इतका परिणाम करू शकते. ज्यांना माहित आहे कि हि खबरदारी तात्पुरती आहे, आपल्याला महामारीवर नियंत्रण मिळाले कि पुन्हा बाहेर जात येईल, खाण्या पिण्याच्या गोष्टी मिळत आहेत, मोबाईलवर मनोरंजनाचे असंख्य पर्याय आहेत, आपल्याच घरी आपल्या लोकांसोबत राहायचे आहे. हे सर्व असतानाही लोक परेशान होतात.
तेव्हा एका व्यक्तीला सांगितले कि त्याला ५० वर्षे आपल्या देशापासून दूर, आपल्या माणसांपासुन दूर एका बेटावर तुरुंगात सक्त मजुरी करायला पाठवले जात आहे, तेव्हा त्याच्या मनावर काय परिणाम होऊ शकतो?
याउलट जेव्हा सावरकर अंदमानला पोहोचले तेव्हा तिथल्या अधिकाऱ्याने त्यांना ५० वर्ष शिक्षा झाल्यावरून खिजवले. तेव्हा सावरकरांनी बाणेदार उत्तर दिले. “५० वर्षे ब्रिटिश सत्ता भारतात राहील असे मला वाटत नाही.”
खरोखरीच भारतातली ब्रिटिश सत्ता त्याआधीच संपुष्टात आली आणि भारताला स्वातंत्र्य मिळाले.
प्रतिकुल परिस्थितीतही असे धैर्य दाखवणाऱ्याला वीर म्हणतात ते उगीच नाही.

लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take