You are currently viewing चिंधी

चिंधी

एकदा कृष्ण इंद्रप्रस्थात पांडवांच्या घरी राहायला गेला होता. तेव्हा नारद मुनी तिथे कृष्णाला भेटायला आले. 

कृष्णाची सख्खी धाकटी बहीण सुभद्रा हिचे लग्न अर्जुनाशी झाले होते. आणि पाचही पांडवांशी लग्न झालेली द्रौपदीसुद्धा कृष्णाला बहिणीसमानच जवळची होती. त्यांचे नाते मानलेल्या भावा बहिणीचे होते. 

नारदाचे डोके बऱ्याचदा तिरकस चालत असे. त्यांनी कृष्णाला विचारले “प्रभु तुम्हाला आधीच एक सख्खी बहीण असताना तुम्ही द्रौपदीला कशासाठी बहीण मानता?”

कृष्ण तेव्हा आपले सुदर्शन चक्र साफ करून ठेवत होते. त्यांनी नारदाला प्रात्यक्षिकच दाखवायचे ठरवले. त्यांनी सुदर्शन चक्राने बोटाला जखम झाल्याचे भासवले आणि जखमेने विव्हळत नारदाला पटकन बोटावर बांधायला चिंधी आणायला सांगितले. 

नारद त्वरेने आधी सुभद्रेच्या दालनात गेले आणि तिला कृष्णाला लागले आहे आणि चिंधी हवी आहे म्हणुन सांगितले. 

सुभद्रेने आपल्या दालनात चिंधी शोधायला सुरु केलं पण फक्त भरजरी साड्या आणि उंची शालु मिळत होते. चिंधी काही सापडत नव्हती. 

नारद तिथुन धावत पळत द्रौपदीकडे गेले. द्रौपदी आपल्या मुलांशी खेळत होती. नारदाने कृष्णाला लागले आहे आणि त्याला बांधायला चिंधी हवी आहे हे सांगता क्षणी द्रौपदीने आपल्या अंगावर नेसलेल्या साडीचा पदर घेतला आणि टर्रकन एक मोठा तुकडा फाडला आणि नारदाला दिला. 

नारद तो तुकडा घेऊन आश्चर्याने कृष्णाकडे परत गेले. कृष्णाच्या सख्ख्या बहिणीने भावाच्या जखमेसाठी पटकन कपडा न देता चांगले कपडे सोडून चिंधी शोधण्यात वेळ घालवला होता आणि मानलेली बहीण द्रौपदीने मात्र पुढचा मागचा विचार न करता पटकन आपल्या किंमती साडीला फाडुन आधी कृष्णाचा विचार करत चिंधी दिली होती. 

ते परत गेले तेव्हा कृष्ण हसत त्यांचीच वाट बघत होते. “मिळाले का उत्तर तुम्हाला? सख्खे असो वा परके त्याने फरक पडत नसतो. मनातलं प्रेम महत्वाचं. आणि मी नेहमीच प्रेमच शोधत असतो.” 

पुढे या एका चिंधीची परतफेड कृष्णाने कौरवांनी द्रौपदीचे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला तेव्हा हजार पटीने केली. दुःशासनाने द्रौपदीची साडी ओढुन काढण्याचा प्रयत्न केला, पण ती साडी कृष्णाच्या कृपेने अखंड होती, कितीही ओढले तरी संपत नव्हती. 

“देव भावाचा भुकेला” म्हणतात ते उगाच नाही. पुढे द्रौपदीच्या घरी खाल्लेल्या एक कण अन्नाच्या बदल्यात कृष्णाने तिच्याकडे अचानक आलेल्या दुर्वास मुनी आणि त्यांच्या हजारो शिष्यांचे पोट आपल्या लीलेने भरले. सुदाम्याकडुन एका पुरचुंडीतले पोहे खाऊन त्याला समृद्ध करून टाकले. 

ज्याने अवघी सृष्टी निर्माण केली त्याला त्याच्याच सृष्टीतल्या गोष्टी देणारे आपण कोण? आपल्याकडे फुले वाहणे, नैवेद्य दाखवणे, चांगली गोष्ट आधी देवासमोर ठेवणे ह्या गोष्टी प्रतीकात्मक असतात. आपल्याला मिळणाऱ्या गोष्टींबद्दल कृतज्ञता म्हणुन, आपल्या चांगल्या प्रसंगात कुटुंबातल्या सदस्यांप्रमाणे देवाला सहभागी करून घेण्याची ईच्छा असते. 

हा अर्पण करण्याचा भाव महत्वाचा.

मंदिरे, गणेश मंडळ, वेगवेगळे उत्सव अशा ठिकाणी फक्त भव्यदिव्य काहीतरी करून दिखावा करण्याची चढाओढ करणाऱ्या लोकांनी आपल्याच पुराणातल्या अशा गोष्टींमधुन बोध घ्यावा. 

देवाला असल्या गोष्टींनी काही फरक पडत नाही. त्याला आपल्या सदाचारी भक्तांनी अर्पण केलेली साधी चिंधीसुद्धा मोलाची असते. 

लेखक: आकाश खोत

व्यवसाय एक (संगणक अभियंता) 
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )

माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा! 

वैयक्तिक ब्लॉगskyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल:  Thats My Take

प्रतिक्रिया व्यक्त करा