आदित्य राणूबाई, तुमची कहाणी ऐका.
आटपाट नगरात एक ब्राह्मण राहात होता. तो रोज समिधा, फुलं, दूर्वा आणावयास रानात जात असे. तिथं नागकन्या, देवकन्या वसा वसत होत्या.
ब्राह्मणाने त्यांना विचारले, “कसला वसा वसता ? तो मला सांगा.”
“तुला रे वसा कशाला हवा ? उतशील, मातशील; घेतला वसा टाकून देशील.”
ब्राह्मण म्हणाला, “उतणार नाही, मातणार नाही; घेतला वसा टाकणार नाही.”
तेव्हा त्या म्हणाल्या, “श्रावणमासी पहिल्या आदितवारी न बोलता उठावं. सचैल वस्त्रासहित स्नान करून, अग्रोदक पाणी आणावं. विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्यराणूबाई काढावी. सहा रेघांचं मंडळ करावं, सहा सुतांचा तातू करावा. त्यास सहा गाठी द्याव्यात, पानफूल वाहावं. पूजा करावी, पानाचा विडा, फुलांचा झेला, दशांगांचा धूप, गूळ-खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. सहा मास चाळावी, सहा मास पाळावी, माघी रथसप्तमीस संपूर्ण करावं. संपूर्णास गुळाच्या पोळ्या, बोरण्यांची खीर, लोणकढं तूप असावं. मेहूण जेवू सांगावं. असेल, तर चिरगोळी द्यावी; नसेल, तर जोडगळसरी द्यावी. तेही नसेल, तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं.”
असा वसा ब्राह्मणाने केला. त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला. भाग्यलक्ष्मी आली, तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणास बोलावणं पाठविले. ब्राह्मण खूप घाबरला, थरथर कापू लागला.
तेव्हा राणी म्हणाली, “घाबरू नका. कापू नका, तुमच्या मुली आमच्या येथे द्या.”
“’आमच्या गरिबाच्या मुली तुमच्या घरी कशा द्याव्यात ? दासी कराल, बटीक कराल.”
राणी म्हणाली, “बटीक करीत नाही. राजाची राणी करू. प्रधानाची राणी करू. “
मार्गेश्वराच्या महिन्यात ब्राह्मणाने लग्न करून मुली दिल्या. एक राजाच्या घरी दिली, एक प्रधानाचे घरी दिली; पण गेल्या पावली मुलीचा समाचार घेतला नाही. बारा वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला.
राजाच्या घरी लेकीनं बसावयास पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. म्हणाली, “बाबा, गूळ खा, पाणी प्या.”
ब्राह्मण म्हणाला, “गूळ खात नाही. पाणी पीत नाही. आधी माझी कहाणी करावयाची आहे, ती तू ऐक!”
“तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही. राजा पारधीला जाणार आहे. त्याला जेवायला उशीर होईल.”
त्याच्या मनात राग आला. तोच राग मनात धरून ब्राह्मण तिथुन निघाला आणि प्रधानाच्या घरी आला. वडिलांना पाहताच लेकीने बसावयास पाट दिला, पाय धुवायला पाणी देऊन गुळ-पाणी दिलं.
“गुळ खात नाही, पाणी पीत नाही. माझी कहाणी करायची आहे, तू अगोदर ऐक !”
“तुमची कहाणी नको, ऐकू तर कोणाची ऐकू ?” ती घरात गेली. उतरंडीची सहा मोत्ये आणली. तीन आपण घेतली व तीन वडिलांच्या हातांत दिली. वडिलांनी सांगितलेली कहाणी मन लावून एकाग्रतेने ऐकली नंतर जेवून खाऊन वडील आपल्या घरी आले.
बायकोनं मुलींचा समाचार विचारला. जिनं कहाणी ऐकली नाही, ती गरीब आणि दु:खी कष्टी झाली; आणि जिनं कहाणी ऐकली, ती मोठ्या सुखात आहे.
इकडे जी गरीब झाली होती, तिनं आपल्या मुलाला श्रीमंत मावशीकडून काही दिलं, तर घेऊन येण्यास सांगितले. पहिल्या आदितवारी पहिला मुलगा उठला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. तेथे प्रधानाच्या दासी होत्या.
“प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा की, तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे.”
“कसा आला आहे. काय आला आहे ?”
“फाटकं नेसला आहे. तुटकं पांघरला आहे. तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे.
“परसदारानं घेऊन या.”
परसदारानं घेऊन आल्या. न्हाऊ-माखू घातलं. पीतांबर नेसायला दिला. जेवू-खाऊ घातलं. कोहळा पोखरून होन-मोहोरा भरल्या व सांभाळून घरी घेऊन जाण्यास सांगितलं.
वाटेनं जात असता सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला व हातातल्या कोहळा काढून नेला.
घरी जाताच आईनं विचारलं, “मावशीनं काय दिलं?”
“दैवान दिलं; पण कर्मानं नेलं. कर्माचं फळ पुढं उभं राहिलं. मावशीनं दिलं; पण ते सर्व गेलं.”
दुसऱ्या आदितवारी दुसरा मुलगा गेला. प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेलं. न्हाऊ-माखू घातलं. नेसायला पीतांबर दिला. जेवू-खाऊ घातलं, काठी पोखरून होन-मोहरांनी भरून दिली व न विसरता सांभाळून घरी नेण्यास सांगितली. वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपानं आला व काठी काढून घेतली.
घरी गेला. घडलेली गोष्ट राणीला सांगितली. दैवानं दिलं; पण कर्मानं नेलं.
तिसऱ्या आदितवारी तिसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही पहिल्यासारखंच प्रधानाचे घरी नेऊन त्याचा योग्य आदरसत्कार केला. व नारळ पोखरून होना-मोहोरांनी भरून दिला व सांभाळून घरी नेण्यास सांगितले.
घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला विहिरीत उतरला, तोच नारळ गडगडत विहिरीत पडला. घरी जाऊन आईला म्हणाला, ‘आई गं, मावशीनं दिलं; पण दैवानं ते सर्व बुडालं.”
चौथ्या आदितवारी चवथा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही पहिल्यासारखंच राणीनं घरी नेलं. त्याचा योग्य आदर-सत्कार केला. त्याला दह्याची शिदोरी होना-मोहोरा घालून बरोबर दिली. सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला व शिदोरी घेऊन गेला. घरी येऊन आईला सांगितलं, “आई, मावशीनं दिलं; पण दैवानं ते सर्व नेलं. “
पाचव्या आदितवारी आपण उठली. तळ्याच्या काठी उभी राहिली. दासींनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नेलं. न्हाऊ-माखू घातलं. साडी-चोळी नेसायला दिली. प्रधानाची राणी आदितवाराची कहाणी करू लागली.
“काय वसा करतेस, ते मला सांग.”
बहीण म्हणाली, “वडिलांची कहाणी ऐकली नाहीस; म्हणून तुला दारिद्र्य आलं.”
राजाच्या राणीनं यावर उपाय विचारला, तेव्हा तिनं वसा सांगितला. ती बहिणीच्या घरी राहिली. श्रावणात सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजाने छत्र-चामरं देऊन बोलावणं केलं. राजा येताच ती घरी जायला निघाली.
एकमेकींना बहिणी-बहिणींनी अहेर केले. वाटेने निघाली. पहिल्या मजलेस स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं, तोच कहाणीची आठवण झाली.
हाकारा केला, डांगोरा पिटला, कोणी उपाशी आहे का, शोधण्यास सांगितले. कोणी उपाशी नव्हता.
वाटेनं एक मोळीविक्या चालला होता. त्याला कहाणी ऐकायला बोलावलं. तो मोळी म्हणाला “तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ ? माझं पोट भरलं पाहिजे” अस म्हणून तो राणीकडे आला. राणीनं सहा मोत्ये घेतली. तीन त्याला दिल्ली व तीन आपल्या हातात ठेवली व मनोभावे कहाणी सांगितली.
त्याने मोठ भक्तीने ऐकली. त्याची मोळी सोन्याची झाली. तो म्हणाला, “कहाणी ऐकल्याच एवढ फळ; मग वसा घेतल्यास किती मोठं फळ मिळेल! काय वसा आहे, तो सांगा. राणीनं तो उतरणार नाही मातणार नाही, याची कबुली करून घेतली व वसा सांगितला.
दुसऱ्या मजलेस राणीनं स्वयंपाक केला. मुलांना, राजाला वाढलं. आपलं पान वाढून घेताच कहाणीची आठवण झाली. हाकारा करून कोणी उपाशी नाही ना, याचा शोध घेतला. माळ्याच्या विहिरीला पाणी लागत नव्हत. त्याचा मळा पिकत नव्हता. असा एक माळी चिंता करीत बसला होता.
त्याला कहाणी ऐकण्यास बोलावलं. तो आला. राणीनं सहा मोत्ये घेऊन तीन आपण घेतली; तीन माळ्याला दिली. राणीनं मनोभावे कहाणी सांगितली. त्याने चित्तभावे ऐकली. मळा पिकू लागला. विहिरीला पाणी आलं. तो म्हणाला, “कहाणी ऐकल्यावर एवढं फळ; मग वसा घेतल्याचं काय फळ ? काय वसा असेल, तो मला सांगा.” मग राणीनं त्याला वसा सांगितला.
तिसऱ्या मजलेस स्वयंपाक केला. मुलांना वाढलं, राजाला वाढलं. आपलं पान वाढून घेताच कहाणीची आठवण झाली. नगरात कोणी उपाशी नाही ना, याचा शोध घेतला. एक म्हातारी व तिचा मुलगा वनात गेला होता. एक डोहात बुडाला, तर एक सर्पानं खाल्ला; म्हणून ती चिंताक्रांत होऊन बसली होती. तिला कहाणी ऐकण्यास बोलावलं. राणीनं तिला पहिल्याप्रमाणे कहाणी सांगितली. तिची दोन्ही मुलं आली. कहाणी ऐकण्यास एवढं फळ; तर वसा घेतल्याचं फळ मोठंच असणार, तेव्हा वसा सांगण्यास सांगितले. मग राणीनं तिलाही वसा सांगितला.
चौथ्या मजल्यास स्वयंपाक करून मुलाना, राजाला वाढलं. आपल वाढून घेताच कहाणीची आठवण झाली. कोणी उपाशी नाही. ना, याचा शोध घेतला. काणा डोळा, मांसाचा गोळा, हात नाहीत, पाय नाहीत, असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं. पाल्या होता, तो उताणा केला. सहा मोत्ये होती. तीन मोत्ये त्याच्या बेंबीवर ठेवली. तीन मोत्ये आपण घेतली. राणीने सांगितलेली कहाणी त्याने ऐकली. त्याला हांत-पाय आले. देह दिव्य झाला. त्यानेही राणीस वसा विचारताच राणीने त्यास वसा सांगितला.
पाचव्या मुक्कामास घरी स्वयंपाक केला. सूर्यनारायण जेवायला आले. साती दरवाजे उघडले. लोह-घंगाळं पाणी तापवलं. षड्रस पक्वान्नं जेवायला केली. सूर्यनारायण भोजनास बसले. त्यांना पहिल्या घासाला केस लागला. ते रागावले, राजाच्या राणीला बारा वर्षं दरिद्र आलं होतं. तिनं आदितवारी वळचणीखाली बसून केस विंचरले. “काळं चवाळं, डोईचा केस. वळचणीची काडी, डाव्या खांद्यावरून टाकून दे.” राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला, तसा कोणाला होऊ नये.
ब्राह्मणाला, मोळीविक्याला, राजाच्या राणीला, माळ्याला, म्हातारीला, काणाडोळा मांसाचा गोळा, सर्वांना सूर्यनारायण जसा प्रसन्न झाला, तसा तुम्हां-आम्हां होवो.
ही साठा उत्तराची कहाणी पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण.