आटपाट नगर होते.
तिथे एक पंधरा माणसांचे कुटुंब राहत होते. सात मुलगे व त्यांच्या सात पत्नी आणि आई वास्तव्य करत होती.
सहा मुलगे आपापला काम-धंदा करून पैसे मिळवीत होते; पण सातवा मुलगा काही कामधंदा करत नव्हता. तो आळशी होता.
जे सहा मुलगे मिळवते होते, त्यांना आई रोज गरम भोजन करून वाढत होती. सातव्या मुलाला मात्र शिळे, उष्टे वाढत होती.
सातव्या मुलाच्या लक्षात ही गोष्ट आली. तो अतिशय नाराज झाला. आपल्या आईचे आपल्यावर प्रेम कमी आहे, हे त्याने जाणले. त्याने आपल्या पत्नीला हातातली आंगठी दिली आणि तो घर सोडून बाहेर पडला.
फिरत-फिरत हा सातवा मुलगा एका गावात आला. तेथे एका व्यापाऱ्याच्या दुकानात तो काम करू लागला. प्रामाणिकपणे काम केल्यामुळे त्याने मालकाचा विश्वास संपादन केला. मालकाने त्याच्यावर सारे काम सोपवून तो तीर्थयात्रेला निघून गेला.
इकडे सातव्या मुलाची पत्नी दुःखात दिवस कंठत होती. पती मात्र दुकानात रंगून गेला होता. त्याला कामाची कमतरता नव्हती. बघता-बघता १२ वर्षे निघून गेली.
एके दिवशी लाकडाची मोळी आणण्यासाठी सातव्या मुलाची पत्नी रानात गेली होती. त्या वेळी तिला संतोषीमातेचे व्रत करणाऱ्या काही स्त्रिया दिसल्या. त्या वेळी तिने विचारले, “बायांनो! तुम्ही काय करता? कोणत्या देवाची पूजा करता? हे व्रत केल्याने काय प्राप्त होते ?”
व्रत करणाऱ्यांपैकी एक स्त्री म्हणाली, “आम्ही हे संतोषीमातेचे व्रत करीत आहोत. या व्रतामुळे दुःख, गरीबी नाहीशी होते. आपली संकटे दूर होऊन आपणास यश प्राप्त होते.”
त्या वेळी ती म्हणाली, “माझी हे व्रत करण्याची इच्छा आहे, तरी आपण मला ते व्रत समजावून सांगा.”
तेव्हा ती स्त्री म्हणाली, “आपल्या ऐपतीप्रमाणे गूळ व हरभरे आणावेत. दर शुक्रवारी संतोषीदेवीची मनापासून पूजा करावी, तिला प्रार्थना करावी. त्या दिवशी उपवास करावा. संतोषीमातेची कहाणी करावी. ऐकणारा कोणी न भेटल्यास तुपाचे निरंजन लावून कहाणी सांगावी. आपले काम पूर्ण होईपर्यंत दर शुक्रवारी संतोषीमातेचे व्रत करावे. त्यानंतर व्रताचे उद्यापन करावे.”
हे ऐकून तिने लाकडाची मोळी विकली. त्याचे चार पैसे आले. तिने संतोषीमातेचे व्रत केले. व्रताचे चार शुक्रवार पूर्ण झाले.
तिकडे तिच्या पतीच्या स्वप्नात जाऊन संतोषीमातेने त्याला आपला प्रपंच करण्यासाठी गावाला परत जाण्याचा आदेश दिला. त्या आदेशाप्रमाणे पती घरी आला.
संतोषीमातेच्या व्रतामुळे प्रपंच पुनः सुखाचा सुरू झाला.
ही साठा उत्तराची कहाणी पांचा उत्तरी सुफळ होवो.