You are currently viewing सोमवतीची कहाणी

सोमवतीची कहाणी

एका आटपाट नगरात एक गरीब ब्राह्मण राहत होता. 

त्याला सात मुलगे व एक मुलगी होती. बायकोचे नाव धनवंती; तर मुलीचे नाव गुणवंती होते. 

घरी आलेल्या ब्राह्मणाची पूजा करून त्याला भिक्षा घालावी व नमस्कार करावा, ही त्याच्या घरची चाल होती.

एके दिवशी सूर्यासारखा तेजस्वी ब्राह्मण आला. सगळ्यांनी त्याची पूजा केली. साती मुलांनी व सुनांनी त्याला भिक्षा घातली आणि नमस्कार केला. ‘सुख, संपत्ती, संतती वाढो व सौभाग्य अक्षय राहो,’ असा त्याने आशीर्वाद दिला. 

मुलीने भिक्षा पातली, तेव्हा तिला ‘धर्मिणी हो’ असा आशीर्वाद दिला. तिने आईला सांगितले की, मला वहिनीप्रमाणे आशीर्वाद दिला नाही. तेव्हा आईने तिला पुनः भिक्षा घालण्यास सांगितले. तेव्हाही तोच आशीर्वाद दिला. 

ते पाहून तिच्या आईने विचारले, “हिला असा का आशीर्वाद देता ?” ब्राह्मण म्हणाला, “हिला लग्नातच वैधव्य येणार आहे.” हे ऐकताच तिने ब्राह्मणाचे पाय धरले व आपल्या एकुलत्या एक मुलीच्या सौभाग्याविषयी उपाय विचारला.

ब्राह्मण म्हणाला, “साता समुद्रापलीकडे एक बेट आहे. तेथे सोमा नावाची स्त्री आहे. तिला मुलीच्या लग्नाला आणा; म्हणजे तुमचे संकट दूर होईल. लग्न होताच तिला निरोप द्या.’

ही गोष्ट धनवंतीने आपल्या पतीला सांगितली. कोणी तरी जाऊन सोमेला घरी आणणं आवश्यक होते. त्यासाठी त्यानं मुलांना विचारलं; पण मुलं काही साता समुद्रापलीकडे जायला तयार होईनात. तेव्हा वडील स्वतः जायला निघाले. 

हे पाहताच धाकट्या मुलाला आपल्या कर्तव्याची जाणीव झाली. आणि आई-वडिलांना नमस्कार करून गुणवंतीसह तो सोमेला आणायला निघाला.

वाटेत समुद्र आला. सोसाट्याचा वारा सुटला. लाटा उसळू लागल्या. पलीकडे कसं जावं, हे काही त्यांना समजेना. संकटकाळी परमेश्वरचा धावा केला, तर तो भक्तांचे संकट निवारण करतो. शुद्ध अंतःकरणाने त्यांनी देवाचा धावा केला. 

तिथं एक वडाचं झाड होतं. त्याच्या खाली ती जाऊन बसली. दिवसभर उपास पडला होता. त्या झाडावर गिधाड पक्ष्यांचं घरटं होतं. त्यात पिलं होती. संध्याकाळी गिधाड पक्षी घरी आले. घरट्यातील पिलांना चारा देऊ लागले. तेव्हा ती पिलं म्हणाली, “झाडाखाली दोन पाहुणे उपाशी बसले आहेत. त्यांना टाकून आम्ही जेवणार नाही.” 

तेव्हा ते पक्षी खाली आले. त्या ब्राह्मण बहीण-भावांची विचारपूस केली. खावयास फळे दिली. उद्या सकाळी तुम्हाला घेऊन जातो व सोमा बाईच्या घरी नेऊन सोडतो, असे त्यांनी सांगितले. देव भक्ताच्या हाकेला धावून आला. त्यांनी देवाला मनोभावे नमस्कार केला व दोघं झाडाखाली झोपली.

सकाळी पक्षी आले. बहीण-भावांना आपल्या पाठीवर बसवून सोमेच्या घराशी नेऊन सोडले. पुढं दोघा बहीण-भावांनी सोमेची सेवा करायची ठरवले. ते रोज पहाटे उठत, सोमा बाईचं अंगण झाडत, सडा-सारवण करत. असं एक वर्ष निघून गेलं. 

एके दिवशी सोमेनं आपल्या मुलांना, सुनांना विचारलं, “रोज सकाळी सडा-सारवण कोण करतं ?” पण त्यांच्यापैकी कोणीच करत नाही, हे कळताच तिला आश्चर्य वाटलं. त्याचा शोध घेण्यासाठी दुसरे दिवशी सोमा स्वतः जागत बसली. 

चौथ्या प्रहरी ब्राह्मणाची मुलगी अंगण झाडते आहे, तिचा भाऊ ते सारवतो आहे, हे पाहून तिनं विचारलं, “तुम्ही आमची सेवा का करता?” तेव्हा ब्राह्मण मुलाने सर्व हकीगत सांगितली. “तुला लग्नाला आलंच पाहिजे. तू प्रसन्न होऊन यावीस; म्हणून आम्ही तुझी सेवा करतो.” 

हे ऐकताच सोमा म्हणाली, “तुम्ही सेवा करू नका. मी तुमच्याबरोबर येते.” घरी सुनांना सांगितलं. “मी ह्या ब्राह्मणाबरोबर जाते. ह्या मुलीचं लग्न झालं, म्हणजे परत येते. तोपर्यंत घरात किंवा सोयऱ्या-धायऱ्यांत कोणाचं निधन झालं, तर त्याला दहन करू नका.” असं सांगून ती निघाली.

सोमेला घेऊन ती घरी आली. सर्वांना खूप आनंद झाला. धनवंतीने सोमेची पूजा केली. धाकट्या बहिणीसाठी उज्जयनीहून अनुरूप असा नवरा पाहुन आणला. सुमुहूर्तावर लग्न लावलं. वधू-वरांवर अक्षता टाकल्या. इतक्यात नवरा मुलगा बेशुद्ध होऊन खाली पडला. तो निपचित पडलेला पाहुन सगळे घाबरून गेले. 

सोमेने मुलीला धीर दिला. “मी तुला सोमवतीचं पुण्य देते. त्यान तुझा पती जिवंत होईल. ” तिनं हाती उदक घेतलं च संकल्प केला आणि आपलं पुण्य गुणवंतीला दिलं. गुणवंतीचा पती जिवंत झाला. सर्वांना खूप आनंद झाला. सोमा आपल्या घरी जायला निघाली.

इकडे सोमेच्या घरी पहिल्या मुलाचं निधन झालं. नंतर पतीचं, नंतर जावयाचंही निधन झालं. सोमा आपली घराची वाट चालतच होती. वाटेत सोमवती-अवस पडली. त्या दिवशी एक वृद्ध स्त्री वाटेत भेटली. तिच्या डोक्यावर कापसाचा भारा होता. तिने सोमेला भारा उतरण्यास मदत करण्यास सांगितलं. तेव्हा सोमा म्हणाली, “आज सोमवती-अवस. मला नेम आहे; धर्म आहे. मला कापसाला शिवायचं नाही.” पुढे जाता-जाता नदीकाठी आली. पिंपळाला प्रदक्षिणा घातल्या. केलेल्या व्रत-नेमधर्माचं पुण्य मिळालं. तिच्या घरी मुलगा, पती, जावई सारे जिवंत झाले.

सोमा घरी आली. सुनांनी घरची हकीगत सांगितली व विचारलं, “हा चमत्कार कशानं झाला?” 

सोमा म्हणाली, “मी सोमवतीचं पुण्य ब्राह्मण मुलीला दिलं. तिचा पती जिवंत झाला. माझ्या जवळचं पुण्य संपलं; म्हणून इकडे अशुभ झालं. वाटेत मला सोमवती-अवस पडली. मी पुनः हे व्रत केलं. कापसाला शिवले नाही, मुळ्याला शिवले नाही, पिंपळाला एकशे आठ प्रदक्षिणा घातल्या, श्रीविष्णूची पूजा केली. त्या पुण्यानं माणसं जिवंत झाली. तुम्हीही ह्या व्रताचं आचरण करा; म्हणजे तुम्हांस अखंड सौभाग्य लाभेल, संतती, संपत्ती लाभेल.” 

सुनांनी विचारलं हे व्रत, “कसं करावं?” 

ती म्हणाली, “सोमवारी अवस येईल. सकाळी उठून स्नान करावं. मौनानं (न बोलता) वस्त्र नेसावं. पिंपळाच्या पारावर जावं. श्रीविष्णूची पूजा करावी. श्रीमंतांनी हिरे, माणकं, मोती, पोवळी घ्यावीत. सोन्या-रुप्यांची भांडी घ्यावीत. गरिबांनी आपली तांब्या-काशांची घ्यावीत. चांगली चांगली फुलं-फळं घ्यावी. जशी अनकूल असतील, तशी एकशे आठ मोजून घ्यावी. तितक्याच प्रदक्षिणा घालाव्या आणि घेतलेलं पिंपळाला अर्पण करावं. मग सारं ब्राह्मणाला द्यावं. सर्वांनी ब्राह्मणाला जेवू घालावं. आपण न बोलता जेवावं. ह्या व्रताने अखंड सौभाग्य लाभेल. वैधव्य प्राप्त होत नाही. मनोकामना पूर्ण होते. विपुल संपत्ती-संतती मिळते.”

ही साठा उत्तराची कहाणी, पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

प्रतिक्रिया व्यक्त करा