नेवाश्यात ज्ञानेश्वरी लिहुन झाल्यावर काही दिवसांनी ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडे पुन्हा प्रवास करत आळंदीत पोहोचले. आळंदीतुन नेहमी अपमान सहन करून, वाळीत टाकलेले आयुष्य जगून ते बाहेर पडले होते. आता परत आले तेव्हा मात्र परिस्थिती बदलली होती. त्यांचं आता उत्साहात स्वागत झालं.
ज्ञानेश्वरांच्या काळात एक चांगदेव नावाचे योगी होते. हे योगी चक्क चौदाशे वर्षांचे होते. लहानपणापासुन तपसाधना करून त्यांनी अनेक दिव्य शक्ती, सिद्धी प्राप्त केल्या होत्या. त्यामुळेच त्यांना इतके दिवस जगणं शक्य झालं होतं. त्यांना कुठल्याही सजीवांवर नियंत्रण मिळवता येत असे.
सामान्य माणसे घोड्यावर, हत्तीवर फिरतात. पण हे चांगदेव वाघावर फिरायचे. वाघ सिंहासारखे हिंस्त्र प्राणी वाहन म्हणून वापरणाऱ्या फक्त देव्याच. त्यानंतर हे चांगदेव. आपल्या योगशक्तीने त्यांनी हे शक्य केले होते. त्या वाघाला चाबुक म्हणुन ते साप वापरायचे.
इतकी वर्षे योगसाधना करून आणि सिद्धी प्राप्त करूनसुद्धा ते समाधानी नव्हते. त्यांना आपल्याला अजुनही परब्रह्म म्हणजे देव कळला नाही असे वाटे.
जेव्हा त्यांच्या कानी ज्ञानेश्वरांची कीर्ती गेली तेव्हा त्यांना उत्सुकता वाटली. कोण असेल हा इतका तरुण योगी? एवढ्या कमी वयात याने गीतेवर भाष्य लिहिलं, लोकांना अध्यात्म शिकवतो.
त्यांनी ज्ञानेश्वरांना पत्र लिहायचं ठरवलं. पण काय लिहावं हेच सुचेना. मायना म्हणजे पत्राच्या सुरुवातीला आपण पत्र ज्याला उद्देशुन लिहितो तो आपल्या पॆक्षा वयाने मानाने लहान मोठा किंवा बरोबरीचा असेल त्यानुसार लिहितात. चांगदेवांना ज्ञानेश्वरांना आपल्या बरोबरीचा समजावा कि लहान समजावा कि मोठा समजावा हे कळत नव्हते. शेवटी त्यांनी आपल्या एका शिष्यासोबत कोरा कागदच पत्र म्हणुन पाठवला.
ज्ञानेश्वरांकडे ते पत्र पोहोचलं. चांगदेवांसारख्या ख्यातनाम तपस्वी योग्याचे पत्र म्हणुन सर्वांना उत्सुकता होती. त्यातला कोरा कागद पाहुन सर्वजण आश्चर्यचकित झाले. मुक्ताई लगेच उद्गारली “दादा शेकडो वर्षे तपस्या करूनही चांगदेव कोरा तो कोराच राहिला.”
मोठे भाऊ निवृत्तीनाथांच्या सुचनेवरून ज्ञानेश्वरांनी त्याच कागदावर मावल्या तेवढ्या पासष्ट (६५) ओव्या लिहुन उत्तरादाखल पाठवल्या. ह्या ओव्यांमध्ये वेगवेगळ्या उपमा वापरून देव किंवा परमात्मा हा आणि जग हे कसं एकच आहे आणि एकमेकांचं रूप आहे असं दाखवलं होतं.
चांगदेवांनी ते पत्र वाचलं तेव्हा त्यांना फार समाधान वाटलं. आपल्याला चांगला उपदेश देईल असा गुरु सापडला याचा आनंद त्यांना झाला. त्यांना आता ज्ञानेश्वरांना भेटण्याची तीव्र इच्छा झाली.
आपला शिष्यांचा ताफा घेऊन ते निघाले. सापाचा चाबुक घेऊन वाघावर बसलेले चांगदेव आणि त्यांचे भरपूर शिष्य असा लवाजमा आळंदी जवळ पोहोचला. ज्ञानेश्वरांच्या ओव्या वाचुन त्यांच्याबद्दल आदर उत्पन्न झालेला असला तरी त्यांनीही आपण किती पोहोचलेले योगी आहोत हे बघावे अशी एक सुप्त इच्छा चांगदेवांच्या मनात होती.
त्यांच्या अशा विलक्षण आगमनाची वर्दी कोणीतरी ज्ञानेश्वरांपर्यंत पोहोचली. आता एवढा मोठा योगी आपल्याला भेटायला येतोय म्हटल्यावर त्यांनी त्यांच्या स्वागताला समोर जायचं ठरवलं. तेव्हा ते एका भिंतीवर आपल्या भाऊ बहिणीशी गप्पा मारत बसले होते.
त्यांनी तसेच भिंतीला इशारा केला आणि त्यांच्या इशाऱ्यावर चक्क भिंत हवेत उडाली. त्या भिंतीवर बसुन ते चांगदेवांच्या स्वागताला गेले. उडणारी भिंत आजवर कोणीही बघितली नव्हती. चांगदेवांनीसुद्धा नाही. सगळ्यांनी आ वासला.
ती भिंत चांगदेवांसमोर खाली आली आणि त्यावरून ते चौघे खाली उतरले. चांगदेवांनी एका वाघावर नियंत्रण मिळवले असले तरी तो एक चालता फिरता सजीव प्राणी होता. इथे ज्ञानेश्वरांनी त्यांना सामोरे यायला एका निर्जीव स्थिर वस्तुला गतिमान केले होते.
चांगदेवांचा आता उरला सुरला अहंकार गळुन पडला. त्यांनी ज्ञानेश्वरांसमोर लोटांगण घातले. ज्ञानेश्वरांनी त्यांना हात धरून उठवले.
चांगदेवांनी त्यांना आपला गुरु होण्याची विनंती केली. ज्ञानेश्वरांनी त्यांना मुक्ताईचा शिष्य व्हायला सुचवले. त्यांच्या मनाची अवस्था पत्रावरून मुक्ताईनेच पटकन ओळखली होती. चांगदेवांनी तिला आपला गुरु केले.
काही दिवस आळंदीत या भावंडांच्या सहवासात राहुन चांगदेव आपल्या तापी नदीवरच्या आश्रमात परत गेले. ज्ञानेश्वर मुक्ताईमुळे ते हि आता अहंकारमुक्त होऊन भक्तीच्या मार्गावर आले.
ज्ञानेश्वरांनी चांगदेवांसाठी लिहिलेल्या त्या ओव्या “चांगदेव पासष्टी” म्हणुन प्रसिद्ध आहेत.
लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take
Good information keep it up
Kharch chan Vatle