महाभारत हे भारतीय महाकाव्य रचणारे ऋषी वेदव्यास हे सर्वश्रेष्ठ ऋषींपैकी एक होते. त्यांचे मुळ नाव होते कृष्ण द्वैपायन. ते रंगाने काळे असल्यामुळे कृष्ण आणि त्यांचा जन्म द्वीपावर म्हणजेच बेटावर झाला होता म्हणून द्वैपायन. पराशर मुनी आणि सत्यवती हे त्यांचे आई वडील होते.
त्यांनी वेदांचा अभ्यास केला. भारतात अनेक वर्षे मौखिक परंपरेनेच ज्ञान पुढच्या पिढीला दिले जात होते. मौखिक परंपरेचा अर्थ पाठांतरानेच हे ग्रंथ लोक लक्षात ठेवत होते आणि मग पुढच्या पिढीलाही पाठ करायला लावून त्यांना पिढ्यानुपिढ्या जिवंत ठेवत होते. पण अशा पद्धतीत मानवी स्मरणशक्तीवर विसंबून राहिल्यामुळे ते विस्कळीत झाले होते.
कृष्ण द्वैपायन यांनी वेदांचे श्लोक गोळा केले त्यांना त्यांच्या वापर आणि प्रकारानुसार चार वेदांमध्ये विभागले. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद अशी विभागणी त्यांनी केली. आपल्या पैल, वैशंपायन, जैमिनी आणि सुमंतु अशा चार शिष्यांना प्रत्येकी एक वेद शिकवून त्याच्या प्रसाराची जबाबदारी दिली.
वेदांचे विभाजन करून सुसूत्रीकरण केल्यामुळे त्यांना वेदव्यास किंवा नुसते व्यास असे नाव पडले. व्यास म्हणजे विभाजन करणारा.
त्यांनीच महाभारत सुद्धा लिहिले. ह्या कुरुवंशाच्या इतिहासात ते एक प्रमुख पात्र सुद्धा होते. कौरव पांडवांचे वडील धृतराष्ट्र, पांडू आणि त्यांचा भाऊ विदुर हे व्यासांचे नियोग पद्धतीने झालेले पुत्र होते.
त्यामुळे कौरव पांडव हे व्यासांचे या पद्धतीने नातू लागत होते. त्यामुळे एक प्रकारे आपल्याच वंशात झालेल्या युद्धाचा वृत्तांत त्यांनी सविस्तर लिहिला.
महाभारतामध्ये चांगले वाईट, शूर आणि भेकड, न्यायी आणि अन्यायी, जातीभेद, भेदांच्या परे असलेले नातेसंबंध, मित्र अशा हर प्रकारची पात्रे आहेत. आणि त्यासोबतच पौराणिक कथा, अनेक उपकथानके, तत्वज्ञान, प्रेम, युद्ध, राजकारण, मनुष्य स्वभाव, भारत देशाचा भूगोल, इतिहास इत्यादी अनेक विषयांवर वर्णन आहे.
त्यामुळेच “व्यासोच्छिष्ट्म जगत सर्वम” असे म्हटले जाते त्याचा अर्थ व्यासांनी जगातला कुठलाच विषय सोडला नाही असा होतो. व्यास अत्यंत विद्वान होते त्यामुळेच त्यांच्यासाठी महाभारत लेखनाची जबाबदारी गणपतीनेसुद्धा स्वीकारले व्यासांनी महाभारत सांगितले आणि ते गणपतीने लिहून घेतले.
भारताचे युद्ध थांबवण्याचा त्यांनी छोटा प्रयत्न करून पाहिला पण तोवर कौरव-पांडवांचे शत्रूता फार वाढलेली होती आणि युद्ध अटळ होते हस्तिनापुरात बसून धृतराष्ट्राला कुरुक्षेत्रावर च्या युद्धाचा वृत्तान्त कळावा म्हणून व्यासांनीच संजयला धृतराष्ट्राजवळ बसवून दिव्य दृष्टी दिली. व्यासांच्या कृपेने संजयने धृतराष्ट्राला युद्धातली प्रत्येक घटना ऐकवली.
व्यासांनी वेदांच्या विभाजनास सोबतच वेद समजायला सोपे जावे म्हणून त्यांच्यावर सूत्रे लिहिली, आणि असे म्हणतात की आपल्याला माहिती असलेली बहुतांश पुराणेसुद्धा व्यासांनी लिहिली.
व्यासांनी जबाली ऋषींची कन्या वारीका हिच्याशी विवाह केला. त्यांना सुख नावाचा हा मुलगा झाला. सुकाने तीव्र योगसाधना करून जिवंतपणीच मोक्ष प्राप्त करून देह सोडला.
व्यासांचा जन्म आषाढ शुद्ध पौर्णिमेला झाला. हीच पौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणून साजरी होते. व्यासांच्या जन्मामुळे तिलाच व्यासपौर्णिमा असेही म्हणतात.
व्यास आपल्या शिष्यांना शिकवताना उच्चासनावर बसुन शिकवायचे त्यामुळे वक्ता ज्या उंच जागी उभे राहून किंवा बसून भाषण देतो त्या जागेला व्यासपीठ हा शब्द रूढ झाला आणि आजही वापरला जातो.
वेद, पुराणे आणि महाभारत ह्या सर्वांचा भारतीय संस्कृतीवर प्रचंड प्रभाव आहे. त्यामुळे त्यांचे रचनाकार व्यास यांची कामगिरी फार मोलाची आहे.
लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take