एकदा सूर्यदेव आणि वायुदेव यांचा कोण जास्त शक्तिशाली आहे यावरून वाद सुरु झाला.
त्यांनी एकमेकांना आव्हान देऊन पैज लावायचे ठरवले.
पैजेची अट अशी होती कि त्यांना एक कोट घालुन निघालेला प्रवासी रस्त्यात दिसला. जो कोणी आपल्या शक्तीने त्या प्रवाशाला आपला कोट काढायला भाग पाडेल तो जास्त शक्तिशाली मानला जाईल असे ठरले.
पहिली पाळी होती वायुदेवाची. त्यांनी त्या प्रवाशाभोवती सोसाट्याचा वारा वाहवायला सुरु केला. त्या प्रवाशाने कोट आणखी आवळुन धरला.
वायुदेवाने प्रचंड जोरात वादळ सदृश परिस्थिती निर्माण केली. त्या प्रवाशाला थंडी वाजायला लागली त्याने कोटाची सगळी बटणे लावली, कॉलर वर केली अगदी अंग घट्ट मिटुन तो कुडकुडत बसला.
वायुदेव थांबले आणि सूर्यदेवाची पाळी आली.
वारं सरलं आणि तो प्रवासी पुन्हा वाटेला लागला. ऊन पडलं.
हळू हळु सूर्याने उष्णता आणि उन्हाची प्रखरता वाढवत नेली.
प्रवाश्याला गर्मी व्हायला लागली. त्याने कोटाची बटणे उघडली.
काही वेळातच तो घामेघुम झाला. त्याने कोट तर काढलाच पण गर्मी असह्य झाल्याने शर्टाची बटणे सुद्धा उघडली आणि एका झाडाच्या सावलीत जाऊन थांबला.
सगळी कामे केवळ भयंकर जोर लावुन होत नसतात. सूर्यदेवाची पैजेत सरशी झाली.

लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take